बुधवार, २७ जुलै, २०११

राजमाची... एक जोड किल्ला


राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे.त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य. श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत.कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो.लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते,तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता येते.उढेवाडी एक छोटे टुमदार गाव आहे.'राजमाची ग्रामसहाय्य योजना' या मुंबईच्या संस्थेने या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी बर्याच योजना राबवल्या आहेत.
 समोरच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे.दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये जवळच पाण्याची टाकी आहेत.मनरंजन या बालेकिल्ल्यापेक्षा श्रीवर्धनची उंची थोडी अधिक आहे.दुर्गात लेणी आहेत.वरून मोठा प्रदेश पाहता येतो.विसापूर,लोहगड,धक,माहुली,माथेरान असा चौफेर प्रदेश दृष्टीपथात येतो.
 राजमाचीचे हे दोन बालेकिल्ले स्वतंत्र दुर्ग मानले जात.या दोघांचे हवालदार वेगवेगळे असत. शिवाजीमहाराजांनी इ.स.१६६१ मध्ये महिनाभर श्रीवर्धन गडावर मुक्काम केला होता.गडाभोवती दाट झाडी आहे.त्यात बिबट्याचा वावर आहे.एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे.
राज्यवहारकोषात बालेकिल्ल्याचा 'अधित्यका' असा शब्दप्रयोग केला आहे.दोन बालेकिल्ले हे एकमेकास पूरक आहेत,म्हणून बांधून काढावेच लागले.अर्थात,दोन्ही अधित्यकांचा पसारा मोठा असल्याने स्वतंत्र गड म्हणूनही गणले जाऊ लागले.दोन अधित्यका आणि तेच दोन स्वतंत्र गड असे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.पाण्याची टाकी ,लेणी,दरवाजे,तटबंदी अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत.खंडाळ्याच्या घाटातून एका बोगद्यातून दुसर्या बोगद्यात जाणार्या आगगाड्या न्याहाळताना फारच मजा येते.