गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

isalute u steve

आज दसरा सर्वत्र सणासुदीची धामधूम सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना माझे मन उदास होते कोणाला शुभेच्छा द्यायची इच्छा होत नव्हती, कारण होते सकाळी ऐकलेली बातमी स्टीव जॉबचे निधन :( 
सकाळी नेहमीप्रमाणे twitter उघडले आणि पहिलीच ट्विट दिसली #RIPSTEVEJOBS आणि मला धक्काच  बसला काही सुचेनासे झाले. २ दिवसापूर्वीच मी अॅपलचे मेडिया इवेन्ट लाइव ब्लॉगवर पहिले होते. त्यावेळी खरी उत्सुकता होती आयफोन ५ ची जो स्टीव स्वता सर्व जगासमोर आणेल याची परंतु आयफोन ५ हि आला नाही आणि स्टीवसुद्धा. मी खूप निराश झालो आणि आज अचानक त्याच्या जग सोडून जाण्याची बातमी वाचली. तसा तो खूप दिवसापासून कर्करोगाने आजारी होता परंतु स्टीव असा अचानक जाईल असे वाटले नव्हते. 
 स्टीवच्या आयफोन ने मला एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे एक वेगळाच आनंद मला आयफोन वापरताना मिळाला आहे. आयफोन ५ आल्यानंतर तो मी कोणत्याही परिस्थितीत घेणार होतो आणि माझा जुना आयफोन विकणार होतो परंतु आता मी तो  जुना आयफोन विकेल असे वाटत नाही  कारण तो स्टीवने बनवला आहे.
आयपॉड,आयफोन , आयपॅड , आयक्लाउड हि स्टीवने जगाला दिलेली देणगी आहे आणि यासाठी आम्ही त्याचे कायम ऋणी राहू.

माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याला बौद्धिक सुखाचे एक नवीनच परिमाण देणाऱ्या , सर्व ज्ञानेंद्रियांना सुखाची एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या आणि माझे छोटेसे आयुष्य समृद्ध करणाऱ्या " स्टीव जॉब्स " ना शतशा प्रणाम .

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

महागाईमधील स्वस्ताई

मागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यात पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते.तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु मागील १० वर्षात एक गोष्ट महाग झाली नाही याबाबत कोणीही काही बोलत नाही किंवा चर्चाहि करत नाही ती माणसाची सवयच  आहे म्हणा ;) असो तर ती गोष्ट कोणती हे तुमच्या लक्षात आले कि नाही ? तुम्ही म्हणत असाल कि मागील १० वर्षात महाग झाली नाही अशी गोष्ट असणे शक्यच  नाही परंतु तसे आहे. त्या गोष्टीवर सर्व प्रकारच्या भाववाढीचे परिणाम होतात जसे डीझेल,कागद,शाई,मनुष्यबळ या सर्वांचे परिणाम त्या गोष्टीवर होत असतात परंतु तरीही ती मागील काही वर्षात वाढली नाही परंतु काही वेळा ती स्वस्त झाली. तर ती गोष्ट म्हणजे 'वर्तमानपत्र'. यात कधी भाववाढ झालेली तुम्हाला आठवते का? उलट काही वर्षापूर्वी २ रुपयात दिले जाणारे वर्तमानपत्र आता १ रुपयात तेही भरपूर पाने आणि रंगबेरंगी पुरवण्यासहित  मिळत आहे.हे कसे शक्य होत असावे? फक्त जाहिरातींच्या जोरावर ? कि समाजसेवेच्या भावनेतून ते स्वता तोटा सहन करून हे करत आहेत? ज्या गोष्टीला तयार होण्यासाठी किमान ४-५ रुपये खर्च येत असावा परत त्यावर वाहतूक खर्च ,विक्रत्यांचे कमिशन आलेच अशी गोष्ट फक्त १ रुपयात देणारे रोज लाखो रुपये तोटा सहन करून अजून तग धरून कसे काय टिकू शकतात ?
 व्यावसायिक स्पर्धेतून हे होत आहे हे जरी मान्य केले तरी हि वर्तमानपत्र कोणत्याना कोणत्या समूहाची बांधील आहेत आणि ते समूह कोणत्यातरी राजकीय पक्षाशी बांधील आहेत हे लक्षात येईल.त्यामुळेच ते इथे तोटा सहन करून दुसरीकडे कोठेतरी याहून जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असावेत का ? स्वस्तात अंक देऊन ते सर्वसामान्य माणसाला आकर्षित करतात आणि एकदा सवय लागली कि जे त्यांना हवे आहे तेच वाचायला लावतात म्हणजेच ते आपलीच मते लोकांच्या मनावर बिंबवतात !
म.टा. पुण्यात आला त्यावेळी त्याने काय केले आठवा जरा किती रुपयात तो लोकांना दिला गेला.आता विदर्भात 'दिव्य मराठी' येत आहे १९९ रुपयात वर्षभर म्हणजे १ रुपयासुद्धा नाही दिवसाला. काही दिवसापूर्वी वृतपत्र १ रुपयाला देण्यास काही विक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यावेळी 'लोकमत' ने काय केले हेही आठवत असेलच.
जनतेपर्यंत कुठली माहिती कोणत्या स्वरुपात पोहचवायची हा निर्णय वरून घेतला जातो आणि त्याप्रमाणे गलेलठ्ठ पगार घेणारे संपादक, मिंधे झालेले पत्रकार राग आवळतात आणि सामान्य माणूस तेच सत्य आहे याच समजुतीत वाचत राहतो. यात तसा सामान्य माणसाचाही दोष आहेच स्वस्तात मिळणाऱ्या भरपूर पाने असणाऱ्या आणि रंगीत पुरवण्यांच्या मोहात अडकून आपण त्यांच्या आहारी जातो व सत्याचा पाठपुरवठा करणारी पत्रकारिता कचऱ्याच्या टोपलीत जाते.अशी किती तरी चांगली वृतपत्रे मागे पडली किंवा बंद झाली आहेत या स्पर्धेमध्ये हे तुमच्या लक्षात येईल.
 स्वस्तातील दारू,स्वस्तातील औषधे शेवटी प्राणघातक असतात. मग स्वस्तातील वर्तमानपत्र कितीही पानांचे आणि रंगीत असलेतरी ते भेसळयुक्त असणारच ना ? त्यातून खरी,प्रबोधन करणारी माहिती कशी मिळणार ? आपणच विचार करा.
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातून घेतले आहेत)
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

बुधवार, २७ जुलै, २०११

राजमाची... एक जोड किल्ला


राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे.त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य. श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत.कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो.लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते,तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता येते.उढेवाडी एक छोटे टुमदार गाव आहे.'राजमाची ग्रामसहाय्य योजना' या मुंबईच्या संस्थेने या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी बर्याच योजना राबवल्या आहेत.
 समोरच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे.दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये जवळच पाण्याची टाकी आहेत.मनरंजन या बालेकिल्ल्यापेक्षा श्रीवर्धनची उंची थोडी अधिक आहे.दुर्गात लेणी आहेत.वरून मोठा प्रदेश पाहता येतो.विसापूर,लोहगड,धक,माहुली,माथेरान असा चौफेर प्रदेश दृष्टीपथात येतो.
 राजमाचीचे हे दोन बालेकिल्ले स्वतंत्र दुर्ग मानले जात.या दोघांचे हवालदार वेगवेगळे असत. शिवाजीमहाराजांनी इ.स.१६६१ मध्ये महिनाभर श्रीवर्धन गडावर मुक्काम केला होता.गडाभोवती दाट झाडी आहे.त्यात बिबट्याचा वावर आहे.एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे.
राज्यवहारकोषात बालेकिल्ल्याचा 'अधित्यका' असा शब्दप्रयोग केला आहे.दोन बालेकिल्ले हे एकमेकास पूरक आहेत,म्हणून बांधून काढावेच लागले.अर्थात,दोन्ही अधित्यकांचा पसारा मोठा असल्याने स्वतंत्र गड म्हणूनही गणले जाऊ लागले.दोन अधित्यका आणि तेच दोन स्वतंत्र गड असे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.पाण्याची टाकी ,लेणी,दरवाजे,तटबंदी अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत.खंडाळ्याच्या घाटातून एका बोगद्यातून दुसर्या बोगद्यात जाणार्या आगगाड्या न्याहाळताना फारच मजा येते.
  

मंगळवार, २१ जून, २०११

प्रत्येकालाच वेगळा कायदा करायचा का ?

समाजात लोकोपयोगी  कार्य,व्यवसाय,व्यवहार करणारे फक्त पत्रकारच आहेत का ? डॉक्टर,वकील,शिक्षक,दुकानदार,संशोधक,इतिहासकार,कलाकार,पत्रकार  इत्यादी असे अनेक पेशे आहेत जे लोकोपयोगी कार्य करत असतात.त्यातल्या प्रत्येकालाच कधीना कधी समाजाच्या रोषाला या न त्या कारणाने सामोरे जावे लागते.त्यातल्या प्रत्येकालाच जमावाने कधीतरी झोडपलेले असते.कारण सामान्य  माणूस  त्यांच्यावर  जेवढे  प्रेम  करतो  तेवढाच  काही  प्रसंगी  संतप्तही होतो.अशा प्रसंगाला व्यावसायिक धोका असे म्हणतात.त्यात पत्रकारसुद्धा येतात मग त्यांना खास संरक्षण किंवा कायदा  याची गरज का असावी ?
 पत्रकारितेवरील हल्ला आणि पत्रकारावरील हल्ला यात फरक आहे.मिड डे चे पत्रकार जे.डे आणि निखील वागळे यांच्यावरील झालेले एखाद्या संघटनेचे हल्ले यात फरक आहे.डे यांनी समाजातील अपप्रवृत्ती आणि गुन्हेगारी यांचा मुखवटा फाडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांच्यावर समाजातील खरया गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.त्यामुळे अशा हल्ल्यांकडे गुन्हा म्हणून पाहण्यास हवे.परंतु एखाद्या  व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला लक्ष बनवून हेतुपूर्वक हैराण किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न लिखाणातून होतो तेंव्हा होणारा हल्ला हा त्याची प्रतिक्रियाच असते.त्यामुळे त्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे असते.
पत्रकारिता आणि पक्षीय राजकारण यातील रेषा धूसर असते आणि ती पत्रकाने ओलांडू नये.अलीकडे काही लोकांकडून त्याचे भान न ठेवले गेल्याने अशे हल्ले वाढले आहेत.
 तसेच आजकाल पत्रकारांच्या सुरक्षेसाठी किंवा होणार्या हल्ल्यासंदर्भात खास कायदा करण्याची मागणी होत आहे.विशेष म्हणजे समतेचे पुरस्कार करणारे विचारवंत आणि पत्रकार यासाठी आग्रही आहेत.एकीकडे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या समतेचे डोस पाजायचे आणि दुसरीकडे अशा कायद्याने सामान्य माणूस आणि पत्रकार अशी दरी निर्माण करायची हे मोठे चमत्कारिक आहे. हा विरोधाभास नाही  का ?
 समता म्हणजे सर्व समान किंवा सर्वांसाठी समान.मग तो कायदा असो न्याय असो किंवा वागणूक.पूर्वीच्या काळी असे
होते उच्चवर्णीय,सत्ताधारी लोकांना वेगळी आणि पिडीत शोषित लोकांना वेगळी वागणूक दिली जात असे.त्यामुळेच पूर्वीच्या काळी वर्णवाद,वर्णवर्चस्ववाद फोफावला होता.त्या लोकांना आम्ही श्रेष्ठ,विचारवंत,बुद्धिवंत म्हणून खास वागणूक मिळाली होती आणि व्यवहारी श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते आणि कनिष्ठ,शोषित यांना दुय्यम ठरवण्यात आले होते.आणि त्याच विषमतेला संपवण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर यांनी त्यांची पूर्ण हयात घालवली होती.हि विषमता मोडून पुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी शेकडो लढे द्यावे लागले कितीतरी वर्ष खर्च करावी लागली.आणि आता पुन्हा अशीच वेगळ्या प्रकारची विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 पत्रकार हा समाजाचा घटक नाही का ? तोही देशाचा एक सामान्य नागरिकच आहे.त्यावरील हल्ला आणि सामान्य नागरिकावरील हल्ला यात फरक का असावा ? पत्रकारांना विशेष कायदा करण्याचा अर्थ सामान्य माणसाला दुय्यम ठरवणे नाही का ? असेच असेलतर लोकोपयोगी  व्यवहार  करणाऱ्या बाकी लोकांनीही अशाच  वेगळ्या कायद्याची मागणी करायची का ? कारण त्यांच्यावरही असे हल्ले झालेले आहेत.

पत्रकार खूप मोठे समाजकार्य करतो असे मानायची गरज नाही.तो लोकोपयोगी सेवा पुरवणारा एक घटक आहे.परंतु त्यांचा समाजात जो दबदबा असतो त्याचा गैरवापर करणारे हि भरपूर आहेत.खंडण्या उखळनारे ,हप्ते मागणारे काही पत्रकार नाहीत का ? २ जी स्पेक्ट्रम मध्ये सौदेबाजी करण्यात काही लोक पुढे होतेच ना ? अशा प्रकरणात पत्रकार सापडल्यावर त्यांच्यावर  कारवाई करावी म्हणून कोणती पत्रकार संघटना कधी पुढे येत का? जर पत्रकारांनी प्रामाणिकपणे अलिप्त राहून काम केले तर असे हल्ले होणार नाहीत.
 डे यांच्यावरील हल्ल्याचा तपास पोलीस त्यांच्या पद्धतीने करतीलच परंतु त्यांच्या आडून पत्रकारांनी त्यांच्यासाठी वेगळ्या कायद्याची मागणी लाऊन
धरू नये.त्यामुळे समाजात विषमता निर्माण होईल आणि मी पत्रकार म्हणजे वेगळा कोणी व सामान्य  माणूस म्हणजे दुय्यम अशी भावना वाढीस लागेल.
जय हिंद !
जय महाराष्ट्र !
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातील आहेत )

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

रेवणीचे अवशेष आढळणारा ... कंधार

मराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे.त्याची तटबंदी शाबूत आहे.खंदक पाण्याने भरलेला आहे.खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे.तीस मीटर्स तरी असेल.खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते! काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी.राष्ट्रकुट,यादव,खलजी,तुघलक,बहमनी,बरीद्शाही,निजामशाही,मुघल,निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून  राज्य केले.
 कंधारच्या या स्थलदुर्गात जुने अवशेष इतस्ततः पडलेले आहेत.राणीमहाल,बुरुज,तटबंदी,तोफांचे गाडे,दगडी जिने,बारादरी,मशीद,मूर्तीचे अवशेष,बारुदखाना,शीशमहाल,हौद,कारंजी असे बरेच कंधारमध्ये बघण्यासारखे आहे.
 लालमहाल आणि जवळची विहीर हि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.मूर्तीचे जे अवशेष आहेत,त्यापैकी एका मूर्तीचा एक पायाचा पंजाच काय तो राहिला आहे.पण त्यावरून ती मूर्ती किती विशाल असेल याची कल्पना आपल्याला येते.ती मूर्ती अंदाजे २२ मीटर्स उंच असावी !
  कंधार दुर्गाची उभारणी,तोफा हिंदुस्तानात येण्याच्या आधीची अस्लुअने त्याच्या प्रवेश्द्वाराविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.हा द्वारसमूह देखणा आणि बळकटहि आहे.लाकडी दरवाजा हा पूर्वी बाहेरून दिसत असल्याने ज्यावेळी शत्रुजवळ तोफा आल्या आणि दरवाज्यावर मारा होऊ लागला,त्यावेळी त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली.त्या लाकडी दरवाजासमोर एक अतिशय भक्कम भिंत उभारण्यात आली.अशा बांधकामाला जीभी अथवा हस्तीनख असे म्हणतात.असे बांधकाम कंधारच्या दुर्गाला आहे.
 दुर्ग अभ्यासकांनी कंधार अवश्य पाहिलाच हवा.स्थलदुर्गाला आवश्यक अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गबांधणीचे आवशेष पाहावेत.एक गोष्ठी इथेच आहे परंतु खूप शोध घेतल्यावर दिसते.खंदकाच्या भोवतीच वलय म्हणजे रेवणी.रेवणीचे अवशेष येथे आढळतात.ते पाहण गरजेचे आहे.इंग्रजीमध्ये त्याला 'कव्हर्ड वे' असे म्हणतात .

सोमवार, २५ एप्रिल, २०११

कूछ तो बात हें बॉस...

जगभरातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सत्यसाईबाबा यांचे काल निधन झाले. त्यावेळी त्यांची संपत्ती,त्यांचे अनुयायी  आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचीही चर्चा झाली.अशा बाबागिरीवर आम्हा मित्रांमध्ये यापूर्वीही खूपवेळा चर्चा वाद झाले आहेत. परंतु एका गोष्टीचे आश्चर्य राहून राहून वाटते ते म्हणजे बाबांचे अनुयायी सेलेब्रिटीज,खेळाडू,उद्योगपती,राजकारणी,गायक,संगीत क्षेत्रातले दिग्गज कोण कोण म्हणून सांगू सगळी बाप मानस.
 ज्या लोकांना भेटण्यासाठी लोक महिनोन महिने त्यांच्या ऑफिसचे उंबरे झिझवतात असे मंत्री,राजकारणी या बाबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून रांगेत उभे राहतात त्यांचे पाय धरतात. काय कमी असते या लोकांना पैसा,प्रसिद्धी,अधिकार सर्व काही मनासारखे असते तरीही यांना बाबांची गरज का भासत असावी ?
 बरे आपल्या देशातीलच सोडा बाहेरील देशातील लोकसुद्धा यांचे अनुयायी तेही एक दोन नाही हजारो लाखो तेही कित्येक देशामधले या गोष्टीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
 आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोदुगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो युटूबवरील त्याचे विडीओ शेअर करतो या गोष्टी या लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का? अशोक चव्हाण , सचिन तेंडूलकर,रतन टाटा यांना तरी कळायला हव ना, बर गेला बाजार अब्दुल कलाम यानाही हे समजत नसावे का ? कि या चमत्कारा व्यतिरिक्त दुसरी अशी काही गोष्ट असावी जी या लोकांना बाबांपर्यंत घेऊन जात असावी ? कारण हि सर्व लोक एवढी मूर्ख वाटत नाहीत. काय असावी ती गोष्ट... 'मानसिक समाधान' ?
 मी सत्य साई बाबांचा एक कार्यक्रम 'आस्था'वर पाहिला होता त्यात कितीतरी आलिशान आणि लाखो करोडो किंमत असलेल्या नवीन गाड्या घेऊन मोठ मोठे उद्यागपति उभे होते फक्त बाबांनी त्यांच्या गाडीत बसावे म्हणून बाबा यायचे आणि फक्त जास्तीत  जास्त आर्धा फुट गाडी चालली कि थांबवून उतरायचे कि लगेच पुढील गाडीत तिथेही सेम त्यानंतर सर्वजण येऊन त्यांच्या पायावर डोके टेकायचे ... अरे याला काय म्हणावे बाबा त्या माणसाची नाहीतर त्या गाडीची तरी किंमत ठेवा ना राव. त्यानंतर बाबा चालत चालत प्रसाद वाटत होते वाटत कसला फेकत होते आणि सर्व लोक तो मिळवण्यासाठी उड्या  मारत होते जणू सलमानने आपला शर्ट काढून फेकावा आणि मुलीनी तो मिळवण्यासाठी उड्या माराव्यात.
 अशा बाबांकडे आणि त्यांच्या अनुयायांकडे पाहिल्यावर मला त्या बाबांना दाद द्यावीशी वाटते त्यांच्यात असे काहीतरी वेगळे आहे, माणसे आपल्याकडे खेचण्याची ताकत आहे हे नक्की IAS ,IPS अधिकारीही उगीच आपली नोकरी सोडून यांची सेवा करत असतात का ? कूछ तो बात हें बॉस.
तसेही आपणही साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जातोच कि तेही बाबाच  आहेत त्यांनीही त्याकाळी चमत्कारच दाखवले  होते. स्वामी समर्थ हि बाबाच आणि गोंदवलेकरहि बाबाच ! आज आपल्या काळात सत्य साई होऊन गेले म्हणून नाहीतर आपणही शिर्डीला जातो तसे त्यांच्या समाधीच्या दर्शनाला गेलोच असतो कि किंवा काही वर्षानंतर आपली पुढची पिढी त्यांच्या समाधीच्या दर्शनाला जाणार नाही कशावरून ?
 बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहत आलो आहोत आणि पहार राहणार आहोत असेच दिसून  येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहुयात.

सोमवार, ११ एप्रिल, २०११

मास्टर माइंड... अरविंद केजरीवाल

जन लोकपाल विधेयकासाठी आण्णा हजारे यांनी जे आंदोलन जंतर मंतर येथे केले त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे पूर्ण देशात आण्णांचा गाजावाजा सुद्धा झाला परंतु हे सर्व होत असताना एक साध्या वेशातील उत्कृष्ट इंग्लिश आणि हिंदी बोलणारा कार्यकर्ता लक्ष वेधून घेत होता.त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे नाव अरविंद केजरीवाल आहे असे समजले तेच ते केजरीवाल ज्यांना २००६ साली सामाजिक कार्यासाठी मैग्सेस पुरस्कार मिळाला आहे.
 अरविंद केजरीवाल यांनी माहितीच्या अधिकारामध्ये खूप मोठे काम केले आहे आणि जन लोकपाल विधेयाकासाठीची व्युव्हरचना सुद्धा त्यांचीच होती त्यांनीच आण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या आंदोलनात भाग घ्यायला लावला व आंदोलन दिल्लीमध्ये घेऊन गेले.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला नाहीतर आण्णांनी महाराष्ट्रामध्ये असे आंदोलन करून पाहिजे असा परिणाम साध्य झाला नसता. केजरीवाल यांच्यामुळेच हे आंदोलन फेसबुक,ट्विटर तसेच सर्वत्र नेटवर पोहचले.सरकार बरोबरील वाटाघाटीतहि केजरीवाल सर्वात पुढे होते एवढेच काय पत्रकार परिषदमध्ये  सुद्धा ते आण्णांना मार्गदर्शन करताना दिसून येत होते.
 केजरीवाल यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यावर समजले कि त्यांनी १९८९ साली आईआईटी खडगपूर येथून मेकेनिकलची बीटेक डिग्री घेतली आहे आणि ते मुळचे हिसार हरियाना येथील आहेत.त्यानंतर ते १९९२ मध्ये सिव्हील सर्विसेस मध्ये गेले आणि दिल्लीचे सहायक आयकर आयुक्त झाले.त्यावेळी त्यांचा खरा संबंध सरकारी व्यवस्थेशी आला आणि तेथूनच त्यांचा संघर्ष सुरु झाला.आयकर विभागात चालू असलेल्या गैरकारभाराला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्याची बदली करण्यात आली आणि त्यामुळे त्यांचे मन सरकारी नोकरीवरून उठले व ते सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचाराची भरपूर प्रकरणे बाहेर काढली आणि त्याच वेळी त्यांनी लोकपाल विधेयक पास करून घेण्यासाठीचे प्रयत्न चालू केले परंतु सरकार घेऊन येत असलेले लोकपाल विधेयकात खूप त्रुटी आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी जन लोकपाल बिलाची मागणी लावून धरली आणि त्याचा मसुदा तयार केला आणि आण्णा आणि समविचारी कार्यकर्त्यांना घेऊन जंतर मंतरवर आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश मिळाले असून  लवकरच जन लोकपाल विधेयक पास होईल अशी आशा करूयात आणि त्यामुळे देशातील भ्रष्टाचार कमी होऊन भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा मिळावी हीच इच्छा.
 केजरीवाल यांच्या सारख्या लोकांमुळेच हे आंदोलन एवढे भव्य रूप घेऊ शकले आणि त्याला यश मिळू शकले साधी राहणी आणि उच्च विचार असणारया या सामाजिक कार्यकर्त्याला सलाम !

रविवार, ३ एप्रिल, २०११

याच क्षणाची तर वाट पाहत होतो ...

काल श्रीलंकेला हरवून आपण क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले. आपला त्याच्यावर हक्क होताच अजून किती दिवस वाट पहायची होती ? सचिन सारखा महान खेळाडू संघात असूनहि आपल्याला हे मागील ६ विश्वकप मालिकांमध्ये साध्य करता आले नव्हते.तसेच सचिनच्याही मनात याची सल होतीच. या मालिकेपूर्वी धोनी बोललाही होताच कि 'सचिनसाठी आम्हाला हा कप जिंकायचाच आहे' आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यावर युवी सुद्धा म्हणाला कि 'माझी सर्व कामगिरी हि सचीनसाठीच होती'.
 भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि तमाम क्रिकेटप्रेमीना सचिनच्या  कारकिर्दीत विश्वकप जिंकलेला पहायचा होता.तसे या लंकेमुळेच  हे स्वप्न १९९६ मध्ये भंगले होते आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली होती व ती जुनी देणी 'सुत'समेत वापस केलीही. अंतिम सामना जिंकल्यावरचा देशाचा आणि सचिनचा जल्लोष पाहता  'याच क्षणाची तर वाट पाहत होतो' हे तर त्यांना सांगायचे नाही न असे वाटून गेले.
  विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते आपल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. युवीला आणि भज्जीला त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता जणू 'यासाठीच केला होता सर्व अटहास' असेच त्याला भासवायचे  होते.
 १९८३ चा विश्वकप जिंकलेला मी पाहिलेले नाही परंतु विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते मी काल अनुभवले आहे त्या क्षणाचा  आनंद घेतला आहे आणि मी त्या इतिहासातील सोनेरी पान  होणारया    क्षणाचा भाग्यवंत साक्षीदार आहे :)
त्यामुळे  मला याचा अभिमान असेल - ' I was alive when India lifted the world cup २०११'.
(काही छायाचित्रे )
 

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

'दे घुमाके ' .... विश्वकप घेऊनच या !

काल ढाका येथील बांगबंधू स्टेडीयमवरील रंगारंग कार्यक्रमाने विश्वकप २०११ ची औपचारिक सुरवात झाली.उद्घाटन सोहळा बांगलादेशने अतिशय चांगल्या प्रतीने सर्व आशिया खंडातील संस्कृतीचे दर्शन घडवत 'दे घुमाके' प्रकारे  हजारो चाहत्यांच्या उपस्थित केला याबद्दल त्यांचे कौतुक  करायला हवे.
 आशिया खंडातील या विश्वकपचा हिंदुस्तान एक प्रबळ दावेदार आहे आणि हिंदुस्तान संघसुद्धा जोरदार जोशात आहे . हिंदुस्तान संघाने १९८३ ची पुनरावृत्ती करावी हि देशभावना आहे आणि आपला संघ देशाच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल अशी मला आशा आहे. तसेच हा आपल्या आवडत्या सचिनचा शेवटचा विश्वकप असण्याची शक्यता असल्याने त्याला  विश्वचषक उंचावताना पाहण्याची सर्व सचिन चाहत्यांप्रमाणे माझीही इच्छा आहे.
हिंदुस्तानच्या सांघाला एवढेच सांगणे आहे कि 'दे घुमाके' आणि विश्वकप घेऊनच या... सारा देश तुमचे अभिनंदन करण्यासाठी उस्तुक आहे.
क्रिकेटच्या या कुंभमेळ्यासाठी माझ्यातर्फे आणि तमाम मराठी ब्लॉगर आणि वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा !

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

केंजळगड ...राजांचा मनमोहन

केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर  धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.
 वैराटगड,केंजळगड,पांडवगड,कमळगड,पाचगणी,महाबळेश्वर,कोल्हेश्वर,रायगड,लिंगाणा,राजगड,तोरणा,सिंहगड,रोहीडा,पुरंदर,वज्रगड, हे दुर्ग दिसायला लागतात,तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून  प्रतापगड,चंद्रगड,मंगलगडहि दिसायला लागतात.केंजळगड नजीकच आहे.त्याचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड.हे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे.भोरहून कोरले,वडतुम्बीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपार्यंत चालत यायचं.इथे देवळात मुक्कामाला जागा आहे.गडावर मुक्कामाला जागा नाही.इथून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते.इथूनच त्या आश्चर्याला सुरवात होते.इथून दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. एक अतिशय उत्तम जिना दगडात कोरला आहे.डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छीन्नी लावून व्यवस्थित केली आहे.दुसर्या बाजूला मात्र दरी आहे.या अशा रानात पायरया कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते.त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत;पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत.पण केंजळगड केवळ ह्या पायर्यासाठी पाहायला जायला हवे.या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
( छायाचित्र- गुगल )

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

आजच्या मराठीची उत्पत्ती...सर्वकाही समष्टीसाठी

उत्तर राजस्थानात अल्वर गुरगाव, भरतपूर हे या क्षेत्रात येतं. मेवो जातीच्या गावात त्यांना मेवाती पण म्हणतात. यांची एक मिश्र बोली अहिरवाटी आहे. ती गुरगांव, दिल्ली, कर्नालच्या क्षेत्रात बोलली जाते. याच्यावर हरियाणीचा प्रभाव आहे. मेवातीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे. उत्तरी राजस्थानाचा निर्माण शौरसेनी अपभ्रंशाने झालेला आहे.
पूर्वी राजस्थानी : राजस्थानच्या पूर्व भागात जयपूर, अजमेर, किशनगड यात ही बोली बोलली जाते. ही बोली जयपुरी आहे. याचं केंद्र जयपूर आहे. जयपूरला धुंडानी पण म्हणतात, कारण त्या क्षेत्राचे नाव धुंडाणं आहे. शौरसेनी अपभ्रंशांनी विकसित या बोलीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे.
दक्षिणी राजस्थानी : इंदौर, उज्जैन, देवास, रतलाम, भोपाळ, हुशंगाबाद आणि त्यांच्या आजूबाजूची गावं या क्षेत्रात येतात. याची प्रतिनिधी बोली माळवी आहे. याचे मुख्य क्षेत्र माळवा आहे. शौरसेनी अपभ्रशांनी विकसित या बोलीमध्येसुद्धा पुरेसे लोकसाहित्य आहे.
पश्‍चिम पहाडी : जौनसार, सिरमऊ, शिमला, मंडी, चंबा आणि याच्या आजूबाजूची गावे यामध्ये येतात. यांच्या बोलीत केवळ लोकसाहित्य आहे.
मध्यवर्ती पहाडी : शौरसेनी अपभ्रंशानं विकसित या बोलीचं क्षेत्र गडवाल, कुमाऊ आणि याच्या आजूबाजूची गावं येतात. वस्तुत: गडवाली आणि कुमाऊ या दोन बोलीभाषांचे हे सामूहिक नाव आहे. यात साहित्य आणि लोकसाहित्य दोन्ही आहेत.
भोजपुरी : बिहारच्या शाहाबाद जिल्ह्याच्या भोजपूर गावच्या नावामुळे या बोलीचं नाव भोजपुरी पडलं आहे. मागधी अपभ्रंशांच्या पश्‍चिम रूपाच्या विकसित या बोलीमध्ये बनारस, जौनपूर, मिरजापूर, गाजीपूर, बलिया, गोरखपूर, देवरीया, आजमगड, बस्ती, शाहबाज, चंपारन, सारन आणि याच्या आजूबाजूची गावे आहेत. हिंदी प्रदेशाच्या बोलीभाषेत भोजपुरी बोलणारे सर्वात अधिक आहेत. भोजपुरीमध्ये मुख्यत: लोकसाहित्यच आहे. शिष्ट साहित्य फार कमी आहे. भारतेंदू, प्रेमचंद, प्रसाद या ठिकाणचे असूनही त्यांनी या भाषेचा साहित्यात कधी वापर केला नाही.
मगही : संस्कृत मगधपासून विकसित शब्द मगह हे नाव यावर आधारित आहे. ही बोली पटणा, गया, पलामू, हजारीबाग, मुंगेर, भागलपूर आणि याच्या आजूबाजूच्या गावात ही भाषा बोलली जाते. यांच्यात लोकसाहित्य व ललित साहित्य भरपूर प्रमाणात आहे.
मैथिली : मागधी अपभ्रंशाच्या मध्यवर्ती स्थाने विकसित ही बोली हिंदी आणि बंगालच्या सीमेवर मिथीलमध्ये बोलली जाते. दरभंगा, मुजकफ्फरपूर, पूर्णिया आणि मुंगेर हे यात येतं. लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून मैथिली भाषा फार संपन्न आहे आणि यातल्या साहित्य रचना अत्यंत प्राचीन काळापासून लिहिल्या गेल्या आहेत. हिंदी साहित्याला विद्यापतीसारखे प्रभावी कवी देण्याचं श्रेय मैथिलीलाच आहे. याव्यतिरिक्त गोविंददास, रणजीतलाल, हरीमोहन झा हेही चांगले साहित्यकार आहेत. आपण मराठी भाषेविषयीचे विवरणा करण्यापूर्वी अपभ्रंशी हिंदी भाषेचा विचार केला. आता मराठीचा करूया.
 अपभ्रंश हा संस्कृत शब्द आहे. अपभ्रंश म्हणजे उत्क्रांत. संस्कृतपासून भिन्नत्व पावणे म्हणजे अपभ्रंश पावणे. परिस्थिती परिमानाने व कालमानाने सुधारत जाऊन बदल होणे यालाच अपभ्रंश म्हणतात. अशा अपभ्रंशासाठी दोन शतकांचा काळ पुरेसा ठरतो. जो अपभ्रंश झाला. पुढे त्याचाही अपभ्रंश होण्यासाठी आणखी अवधी लोटावा लागतो. शके ८०० मध्ये महाराष्ट्री होती. शके १२०० मध्ये तिचे रूप मराठी होते. याचा अर्थ महाराष्ट्री अपभ्रंशित भाषा शके १००० मध्ये असावी. हिंदी भाषेसाठी शौरसेनी, मागधी, पैशाची अपभ्रंशित होत्या. महाराष्ट्राची अपभ्रंश, मात्र कुठल्याही महाराष्ट्री काळात अथवा तद्नंतरच्या काळात एखाद्या ग्रंथात सापडत नाही. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात त्यानुसार
ज्या प्रांताला हल्ली आपण ‘मथुरा मंडळ’ म्हणतो त्या प्रांताला पूर्वी ‘शूरसेन’ म्हणत असत. या प्रांतातल्या लोकांच्या मूळच्या भाषेला ‘शौरसेनी’ भाषा असे स्वतंत्र व निराळे नाव लोक योजू लागले. त्याचप्रमाणे गयेच्या आसपासचा जो मुलूख त्याला ‘मगध’ देश अशी संज्ञा होती. या प्रांतातल्या भाषेला ‘मागधी’ असे म्हणत. ‘बुखारा’, ‘पंजाब’ वगैरे प्रदेशांतल्या लोकांस ‘बाल्हीक’ असे म्हणत व हे ‘बाल्हीका’ लोक पिशाच्चांची संतती होय, असे महाभारताच्या कर्णपर्वात सांगितले आहे. म्हणजे या प्रदेशाला प्राचीन काळी ‘पैशाच देश’ असे म्हणत, हे उघड होते. या प्रदेशाची राजधानी ‘पैशाचपूर’ ऊर्फ ‘पेशावर’ ही होती. पैशाच देशाच्या राजधानीच्या शहरात व त्याच्याभोवती जी भाषा किंवा संस्कृत भाषेचे जे स्वरूप शिष्टांच्या भाषणात येई त्याला ‘पैशाची’ भाषा असे म्हणू लागले आणि त्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र’ या नावाने समजल्या जाणार्‍या प्रांतांत जी भाषा लोक वापरू लागले किंवा संस्कृताचे जे रूप शिष्ट लोक आपल्या व्यवहारात योजू लागले ते रूप ही ‘महाराष्ट्री’ भाषा होय.
वर सांगितलेल्या सर्व भाषा एकेकाळी या हिंदुस्थान देशात चालू होत्या, परंतु इतर बाबींप्रमाणे देशकालपरत्वे नित्यव्यवहाराच्या भाषेतही फेरबदल होऊ लागतो.
१. काही ग्रंथकारांच्या मते पेशावर ही प्राचीन राजधानी नसून ते शहर याहून अगदी भिन्न होते.
ती ‘स्थिर’ किंवा ‘कायमची’ अशी केव्हाही जिवंत राहू शकत नाही. या नियमानुसार ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या सर्व भाषांत निरनिराळे फरक झाले. यामुळे भाषेच्या रूपाहून भिन्न अशी नवी रूपे या भाषांस प्राप्त झाली. या नवीन व भिन्न रूपास त्या त्या भाषांचा ‘अपभ्रंश’ असे म्हणू लागले म्हणजे ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या चारही भाषांपासून ‘शौरसेनी-अपभ्रंश’, ‘मागधी-अपभ्रंश’, ‘पैशाची -अपभ्रंश’ व ‘महाराष्ट्री-अपभ्रंश’ असे चार अपभ्रंश सिद्ध झाले.
हे ‘अपभ्रंश’ किंवा या ‘अपभ्रंश-भाषा’ कालांतराने शिष्टत्व पावून त्या प्रदेशाची मूळ भाषा म्हणून मानल्या जाऊ लागल्या आणि हे झाले तेव्हा मूळ भाषांचा लोप होऊन गेला. त्या जनपदलोकातून अगदी नाहीशा झाल्या. या चार अपभ्रंशांपैकी महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासून म्हणजेच महाराष्ट्र अपभ्रंशापासून आपली आजची ‘मराठी’ भाषा उत्पन्न होऊ लागली. हळूहळू ‘महाराष्ट्री-अपभ्रंशा’चा लोप होऊन त्याची जागा ‘मराठी’ने घेतली व जनपदलोक जास्त जास्त वापरू लागल्यामुळे आणि अनेक बुद्धिमान ग्रंथकारांनी तिचा आदर केल्यामुळे ती शिष्टसंमत असे भिन्न धातूच्या रूपापासून ‘मराठी’ या नावाने प्रसिद्ध झाली. याच भाषेला मराठी ग्रंथकार ‘प्राकृत’ आणि ‘देशी’ अशी आणखी दोन नावे देतात.
- नामदेव ढसाळ


मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

हा 'उत्सव' चूक कि बरोबर ?

काही दिवसापूर्वी २६ जानेवारीला A WEDNESDAY हा चित्रपट  परत पाहण्याचा  योग आला थोडासा 'डोंबिवली फास्ट' धाटणीचा  हा सुद्धा, सामान्य माणूस सरकारी यंत्रणेला वैतागल्यावर काय करू शकतो किंवा त्याच्या  भावना काय असू  शकतात याची  उत्तम पद्धतीने मांडणी केलेले हे दोन चित्रपट. परंतु असे खरच होऊ शकते का ? किंवा सामान्य माणूस या पातळीवर उतरू शकतो का ? सामान्य माणसाने असे  काही केलेतर योग्य होईल का ? असे प्रश्न मनामध्ये  येत होते.
 आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज  आली आरुषीचे वडील राजेश तलवार यांच्यावर न्यायालय परिसरात एका माथेफिरूने धारदार  शस्त्राने डोक्यावर वार केले. सुरवातीला वाटले कोणीतरी माथेफिरूच असावा परंतु त्याचे नाव ऐकल्यावर ते ओळखीचे वाटले 'उत्सव शर्मा ' हाच तो ज्याने  या अगोदर असेच कृत्य केले होते. हरयाणाचा  माजी पोलिस महासंचालक एसपीएस राठोड चंडीगढ न्यायालयातून बाहेर येत असतानाच असाच  त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याचा अर्थ हे त्याने जाणून बुजून केले होते.त्याने असे का केले असावे या दोन्ही केसशी त्याचा दुराय्न्वे हि संबंध नाही मग त्याने असे पाऊल का उचलावे ? कोण हा उत्सव शर्मा ?

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन या संस्थेत अॅनिमेशन फिल्म डिझाईनचा विद्याथी असलेला उत्सव शर्मा हा एक हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. हा फक्त तो भावनिक  आहे. परंतु आपल्या देशात एवढ भावनिक राहून चालत का हो ? पण त्याला त्याची जाण नसावी अजून शिकत आहे ना त्यामुळेच. रुचिका प्रकरणावर तो एक डॉक्युमेंटरी बनवत होता त्यावेळी तो या केस शी जोडला गेला. रुचिका गिरहोत्रा या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या आणि तिच्या कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना राहते घर सोडण्यास भाग पाडणाऱ्या राठोडचा १९ वर्षांनीही न्याय झालेला नाही. पोलिस यंत्रणेत उच्चपदावर असलेल्या राठोडला वाचविण्यासाठी अख्खी व्यवस्था कशी कामाला लागली होती. न्यायालय त्याला शिक्षा देण्यास असमर्थ ठरत होते हे पाहूनच उत्सवने त्याच्यावर हल्ला केला होता.
 असाच काही  प्रकार आरुषी-हेमराज खून प्रकरणात झाला आहे. राजेश तलवार यांच्यावर स्वताच्या मुलीच्या खुनाचा आरोप आहे परंतु पुराव्या अभावी हि केस उभी राहू शकत नाही असे कारण देऊन सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.आणि राजेश तलवारची सुटका करण्यात आली आहे.सीबीआयलाही गुन्हा सिद्ध करता येत नाही आणि न्यायालयाला पुरावे हवे आहेत.ज्याच्याकडे पैसा,ताकत,सत्ता आहे तो काहीही करू शकतो आणि सुटू शकतो हे यावरून दिसून येते.
 मग न्याय कुठे आहे आणि सामान्य माणसाला तो कसा मिळणार ? कि पैसेवाले लोकशाहीची चेष्टा करत राहणार आणि सामान्य माणूस फक्त पाहत राहणार ?
 या अशाच घटनांमुळे आपल्या मनात हि चीड निर्माण होते आणि उस्तव सारखे लोक त्या रागाला अशाप्रकारे वाट मोकळी करून देतात त्याची पद्धत चुकीची जरूर असेल परंतु त्या सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत असे तुम्हाला वाटत नाही का ? जश्या त्या वरील २ चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 तलवार यांच्या हल्ल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता  पत्रकारांना तो म्हणाला 'मी भावनाप्रधान आहे.त्यामुळे या हल्ल्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.तुम्ही सर्वजण सध्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहतच आहात.आरुषी खुनाबद्दलही सर्वाना चांगलेच माहिती आहे.मात्र पुरावे नाहीत त्यामुळे इथे न्याय मिळणार नाही.सीबीआय  ने क्लोजर रिपोर्ट दिला आहे त्यामुळे पुढे काहीच होणार नाही.न्याय आपल्या मार्गाने जातो आणि आपण सर्वजण केवळ पाहत बसतो !या केसमध्ये तलवार चुकीचा आहे.रुचिका सारखीच हि केस हि अनेक वर्ष चालेल.मात्र हाती काहीच लागणार नाही. '
 उत्सव माथेफिरू आहे मानसिक रुग्ण आहे फक्त असे सांगून या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याने असे का केले,त्याच्यावर अशी वेळ का आली याचाही विचार होण्याची गरज आहे.आज अनेक गुन्हे करूनही कितीतरी लोक उथळ माथ्याने समाजात फिरत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा न्यायपालीकेवरील विश्वास कमी होत चालला आहे.सीबीआय सारख्या संस्थाही लाचार होत आहेत.त्यामुळे न्यायालयात अन्याय झालेल्याला न्याय मिळतो कि त्याच्यावर अजून अन्याय होतो असा प्रश्न पडायला लागला आहे.
 रोजच्या अशा घटनांमुळे  सामान्य माणसाचे मन मरून गेले आहे त्यांना याचे आता काहीच वाटत नाही आणि ज्याला काही वाटते तो असा 'उस्तव' बनतो.
मलातरी हा उस्तव चूक वाटत नाही तुम्हीच तुमच्या मनाला विचार आणि ठरवा हा 'उत्सव' चूक कि बरोबर.

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

माय नेम इज सेन...


हक्क या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला कळतो आणि प्रत्येक जण आपापल्या हक्कांसाठी झगडत असतो. कधी कुटुंबाशी, कधी समाजाशी तर कधी स्वत:शी. काही असेही या जगात जन्माला येतात, जे फक्त स्वत:च्याच नाही तर संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी आपले आयुष्य वेचतात. गरीब व वंचित लोकांच्या प्रश्‍नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ, जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर्वी. तिथेच त्यांनी सामाजिक आरोग्यासाठी आपले जीवन झोकून दिले. त्यांनी त्यांच्या पत्नी एलिनासोबत मुक्ती मोर्चाच्या शहीद रुग्णालयाच्या उभारणीत फार मोठे योगदान केले. जनस्वास्थ्य संघटनेचेही ते सल्लागार आहेत. सुवर्ण पदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत. ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरचा हा अत्यंत हुशार डॉक्टर शपथ घेताना ताठ मानेने उभा होता. ‘मानवसेवा हा माझा पहिला धर्म’ असे प्रत्येकाने म्हटले पण सेनने या एका वाक्याला आपले जीवन बनवले. मोठ्या कंपन्या व हॉस्पिटल त्यांना बोलावत असतानाही त्यांचा निश्‍चय दृढ होता. दवाखान्याच्या नावाखाली छापखाना न टाकता खरंच समाजाची सेवा करायची याच हेतूने त्यांचा प्रवास सुरू झाला. 2004 मध्ये कॉलेजतर्फे त्यांना पॉल हॅरिसन पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या समाजकार्यासाठी मिटानीन व आशा हे दोन सरकारी उपक्रम रचताना सेन यांनी जीव ओतला. छत्तीसगड सरकारचे हे उपक्रम फारच उपयोगी ठरले. अजित जोगींच्या वर्तुळात सरकारच्या अनेक विषयांवर त्यांना सल्लागार म्हणून ओळखले गेले. छत्तीसगडमधील दुर्गम परिसरामध्ये राहून जनहिताचे कार्य करण्याचे धाडस या डॉक्टरने केले. कारण तेच त्याच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम सुरू केले. ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करायचे. छत्तीसगडमध्ये आरोग्याचे धडे देत ते सर्वांचे ‘हीरो’ झाले. त्यांना मिळणारा पाठिंबा आणि प्रेम हेच त्यांचे भांडवल होते. उपेक्षितांचा त्यांच्यावर वाढत चाललेला विश्‍वास अनेकांना खटकत होता. डॉ. सेन हे सामाजिक समतेचे आणि समाजवादी मूल्यांचे अनुयायी. एवढ्यावर त्यांना नक्षलवादी म्हणणे बरोबर नाही. दुर्दैवाने नक्षलवाद आणि ‘सलवा जुडूम’ या वावटळीत होरपळ डॉ. सेन यांच्या चळवळीची झाली. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीजचे रा्रीय सरचिटणीस म्हणून तुरुंगातील कैद्यांना भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग होता. या भेटी पोलिसांच्या परवानगीनेच व्हायच्या. तरीही 15 मे 2007 रोजी सेन यांना बिलासपूर येथे अटक करण्यात आली. नक्षलवाद्यांचा नेता नारायण सनयाल आणि उद्योगपती पीयूष गुहा यांच्यात जोडणार्‍या कडीचे काम केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. 25 मे 2007 पर्यंत रायपूर सेशन कोर्टाने त्यांचा ‘बेल’ नामंजूर केला. 26 मे ते 4 जून 2007, सेन यांच्या समर्थकांनी जागोजागी मोर्चे काढले. दिल्ली, रायपूर, कोलकाता, मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये लोक त्यांना मुक्त करावे यासाठी रस्त्यावर आले. संपूर्ण जगभरातील लोक या अटकेची दखल घ्यायला लागले. सेन यांच्या पत्नीने सर्व दरवाजे ठोठावले. नॅशनल ह्युमन राईटस् कमिशनलादेखील त्यांनी आपल्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची माहिती पटवण्याचा प्रयत्न केला पण सारे व्यर्थ. प्रत्येक वेळी कोर्टाची पायरी चढताना सेन हसतच चढले. त्यांचे म्हणणे असे की ‘‘मी खरेपणाने जगलो म्हणून मी हसत आहे. ही परीक्षा माझी नाही, ही परीक्षा या देशातील लोकशाहीची व मानवाधिकारांची आहे.’’ 15 मार्च 2008 पासून ते 11 एप्रिल 2008 त्यांना एकटे एका अंधार कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना वृत्तपत्रं देण्यात यायची पण महत्त्वाच्या घडामोडींची पाने काढून. जेलमधील लोकांनाही त्यांचे व्यक्तिमत्त्व जरा ‘हटकेच’ वाटायचे. एवढ्या प्रेमाने ते सर्वांशी बोलत की तुरुंगातील अधिकारीदेखील दुविधेत असायचे. 29 मे 2008 मध्ये जॉनेयन मॅन पुरस्कार त्यांच्या पदरी पडला. आरोग्य आणि मानवाधिकार या कार्यात मिळणारा हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. पण हिंदुस्थान आणि चायनातले साम्य इथे दिसून आले. त्यांना तो घेण्याकरिता जाऊ नाही दिले. नोबल पुरस्कार मिळालेल्या 22 महान व्यक्तींनी आपल्या रा्रपती व पंतप्रधानांना पत्र लिहून सेन यांना पुरस्कार घेऊ द्यावा अशी विनंती केली. सेन म्हणतात, ‘मानवाधिकारांची जाण समाजाला होणे हेच माझे ध्येय आणि हाच माझा पुरस्कार. सेशन कोर्टातून हायकोर्ट, तेथून सुप्रीम कोर्ट हा संपूर्ण प्रवास डॉ. सेन यांनी धैर्याने पार पाडला. 25 मे 2009 मध्ये त्यांना ‘बेल’ मिळाली. तब्येत खराब होत असल्यामुळे सुप्रीम कोर्टातील मार्कंडेय कतजु आणि जसटीस दीपक वर्मा यांनी सेन यांचा ‘बेल’ स्वीकारला. वर्ष उलटले, चित्र काही फार वेगळे नाही. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे तसेच प्रतिबंधित माओवादी संघटनेला मदत केल्याप्रकरणी रायपूर कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांचे वकील सुरेंद्र सिंग होते. ‘‘माझ्या घरात माओवादी’वरील पुस्तके मिळाली म्हणून जर मी माओवादी असेन तर स्वातंत्र्यावर लिहिलेली पुस्तके घरात असली म्हणजे ते स्वातंत्र्यसैनिक झाले का?’’ अशी थट्टा करत सेन यांनी सिंग यांच्याकडे केली. या सर्व केसमधील अनेक पुरावे ‘जर-तर’वर आधारित असले तरी आता निकाल लागलाय. अफझल गुरू व कसाब यांना दहशतवाद माजवताना आपण टीव्हीवर पाहिले तरी ते अजून आपले पाहुणे बनून राहिले आहेत. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक कसाबच्या केसमधील एक ‘विटनेस’ आहे. बहुतेक सरकारप्रमाणे हा ‘मानवाधिकार’ असावा कसाबकरिता मानवाधिकार म्हणजे काय हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे. उत्कृ डॉक्टर, आयुष्य वाहणारा मानवाधिकार कार्यकर्ता व उपेक्षांचा ‘हीरो’ डॉ. विनायक सेन हे आता आयुष्यभर तुरुंगात राहतील. पण या जन्मठेपेची बातमी कळल्यानंतरचे स्मितहास्य मात्र कुणी विसरू शकणार नाही. मानवाधिकार म्हणजे एकाचा अधिकार काढून दुसर्‍यास देणे नाही. प्रत्येकाने हे समजून वागावे. एखाद्याच्या अधिकारांसाठी लढताना सर्वांचा विचार असावा हेही तेवढेच खरे. सर्वांचे अधिकार महत्त्वाचे. देशाचेसुद्धा. डॉ. विनायक सेन यांच्या जन्मठेपेच्या बातमीने अनेकांचे डोळे भिजवले. पण निकाल ऐकल्यावर सेन यांचा शांत व हसरा चेहरा जणू म्हणत होता, ‘‘माय नेम इज सेन ऍण्ड आय एम नॉट अ टेररिस्ट.’’
(Article in Samana by dr.swapnapatker@gmail.com)