मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

Marathi History: दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते

Marathi History: दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते: "daसंशोधन आणि अभ्यासशुन्य असलेल्या संभाजी ब्रिगेडने सभ्यतेचा निच्चांक गाठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची असामी असणार्‍या दादाजी कोंडदेवांना एक सामान्य चाकर म्हणुन संबोधले आणि त्यांना दादोजी म्हणण्याऐवजी दादु असे निर्लज्जपणे म्हणतात. शिवाजी महाराजही त्यांना दादाजी म्हणत. पण संभाजी ब्रिगेड मजाल पहा ! यातून संभाजी ब्रिगेडच्या व्यक्तीमत्वाच्या निच्चांकाची स्पष्टोक्ती होते.
खाली अस्सल पत्रांचे ४ नमूने दिले आहेत. या पत्रांच्या मूळ प्रती भारत इतिहास संशोधक मंडळ, १३२१ सदाशिवपेठ, भरतनाटयमंदीरा शेजारी, पुणे – ४११०३०. दुरध्वनी – (०२०) २४४७२५८१ येथे जतन करून ठेवल्या आहेत. बोरी केंद्रामधील शिवाजी महाराजांच्या पत्राच्या अस्सल प्रती संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी जशा जाळून टाकल्या होत्या तसे पुन्हा होऊ नये म्हणुन या पत्रांची मायक्रोफिल्मींग करून ठेवण्यात आली आहे.
अ] (खालील पत्रात दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते हे अगदी स्पष्ट होते. त्याच बरोबर एखद्याचे इनाम सरदेशमुखीस दिले आणि पर्यायी त्यास अन्यत्र इनाम देण्याबद्दल उल्लेख आहे. असा इनाम देण्याचा अधिकार तर सरसेनापतीलासुद्धा नव्हता. मग या अधिकारावरून आणि निर्णयावरून दादाजी कोंडदेवांचे स्थान किती मोठे होते हे निर्विवाद स्पष्ट होते. अर्थात, ईर्षाळू संभाजी ब्रिगेडच्या खोटया व बिनबूडाच्या आरोपाप्रमाणे ते सामान्य चाकर नव्हते).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.१०९, पत्र क्र. ५०७
इ.स.१६४५ डिसें.११
शके १५६७ पौष शु.२
सुहूर १०४६ जिल्काद २
खं.१६ ले.२०

अज दि. दादाजी कोंडदेऊ सुभेदार कोंडाणा
बाबाजी जुंझारराऊ देशमुख तर्फ कानदखोरे
तुझे अंतुरली येथील इनाम सरदेशमुखीस दिल्हे. त्याबद्दल तुला दापोडा येथे इनाम देण्याविषयी लिहीलें आहे.


ब] (खालील पत्रात सुभेदार या उल्लेखासोबत त्यांचा प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार स्पष्ट होतो).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.१११, पत्र क्र. ५१३
इ.स.१६४६ एप्रिल.२
शके १५६८ चैत्र व.१२
सुहूर १०४६ सफर २५
सा.ले.८२
वाटपत्र
दादाजी कोंडदेव _________________ महादाजी गोसावी
आपले भांबोरे वगैरे ७ गाव (कुळकर्ण व ज्योतिष) तुम्हास दिधले.

क] (हे खुर्दखत तर स्वयं छत्रपती शिवाजी महराजांनी पाठवले आहे. दादाजींचा उल्लेख स्वत: शिवाजी महाराज सुभेदार दादाजी असा करतात. त्याच सुभेदारांना संभाजी ब्रिगेडच्या म्होरक्यांकडून दिशाभूल केले गेलेली निर्बुद्ध दादू असा उल्लेख करतात. हा तर थेट महाराजांचाच अपमान आहे. त्याच बरोबर दादाजी हे काही सामान्य चाकर नव्हते हे ही या पत्रातून सिद्ध होते. हे अस्सल शिवाजी महाराजांच पत्र असल्याने यालाही खोटे कसे म्हणाचे या करीता ब्रिगेडी डोक्यांची घालमेल उडणार आहे).


शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.११६, पत्र क्र. ५३४
इ.स.१६४७ आक्टो.१५
शके १५६९ आश्विन व.१२
सुहूर १०४८ रम २६
खं.२० ले.२३७

खुर्दखत
मुद्रा व सिक्का ‘प्रतिपच्चंद्र’
अजर.रा. सिवाजी राजे ------ कार. त॥ कडेपठार प॥ पुणे.........
दरीविले गणेशभट बिन मल्लारीभट भगत मोरया हुजूर ...... ....... जे आपणास इनाम जमीन चावर निमे ú॥ú दरसवाद मौजे मोरगौ त॥ म॥ देखील नख्तयाती व महसूल ब॥ फर्मान हुमायूनु व खुर्दखत वजीरानि कारकिर्दी दर कारकिर्दी व ब॥ खुर्दखत माहाराज साहेबु व सनद सुभा त॥ सालगुदस्ता सन सबा चालिले आहे. साल म॥ कारणे दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा जाली. म्हणउनु माहाली कारकूनु ताज्या खुर्दखताचा उजूर करिताति. दरींबाब सरंजाम होए मालूम जाले. गणेशभट बिन मलारीभट भगवत मोरया यासि इनाम जमीन ...... कारकिर्दी दरकारकिर्दी चालिले असेल तेणेप्रमणे मनासि आणउनु दुमाले करणे. दरहरसाल............ तालीक............. मोर्तब सुदु.


ड]
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.२.
पान.३९४, पत्र क्र. १४००
इ.स.१६७१ जून.२६
शके १५९३ ज्येष्ठ व.३०
सुहूर १०७२ सफर २८
त्रै.व.७ पृ.४६

तान्हाजी जनार्दन हवालदार व कारकून त॥ निरथडी प॥ पुणें प्रति राजश्री शिवाजी राजे..... परिंचाचे पाटीलकीसी कान्होजी खराडे नसता कथला करून घर तेथे बांधतात. तरी कथला करू न देणे. वैकुंठवासी साहेबाचे (शहाजीराजे) व दादाजीपंताचे कारकिर्दीस चालिले आहे ते करार आहे. तेणेप्रमाणे चालवणे. नवा कथला करूं न देणे.व परिंच्या कान्होजी खराडे यास घर बाधो न देणे. मोर्तब सुद.
(मर्यादेयं विराजते)

शिवचरित्रसाहित्य – यात असलेले काही संदर्भ.
* ७ ऑक्टोबर १६७५ - मावळचा सुभेदार महादाजी सामराजयाने कर्यात तरफेचा हवालदार महादाजी नरसप्रभू यांना पाठविलेले एक पत्र. यात शिवाजी महाराजांनी महादाजी सामराजांस पाठविलेल्या एक पत्राचा सार आहे..." साहेब (शिवाजी महाराज)कोणाला नवे करु देत नाही, दादोजी
कोंडदेवाच्या कारकीर्दीत चालत आले असेल ते खरे !" असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.

* २३ जुलै १६७१ - पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तर्फे वणपुरी. - "मागे दादोजी कोंडदेवे यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे"

* १ नोव्हेंबर १६७८ - कान्होरे रुद्र यांस - "मागे दादोजी कोंडदेवे यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे"


* दादोजी कोंडदेवांनी बाळ शिवबाचे पहिले लग्न १६-५-१६४० मध्ये लावले असा उल्लेख शिवदिग्विजकार बखरीत येतो.

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

एक वर्ष झाले सुद्धा ...

मी ब्लॉगिंग सुरु केलं अन् बघता बघता एक वर्ष कसं निघून गेलं हे समजलं
सुद्धा नाही. ब्लॉगला सुरुवात करतांना आपण आपल्या वाचनात आलेले चांगले
लेख फक्त इथे टाकायचे, मग ते कोणत्या वृत्तपत्रातील असो किंवा एखाद्या
संकेतस्थळावरील असो... असे माझे नियोजन होते. तसं मला जास्त अलंकारिक,
कथा वगैरे काही लिहिता येत नसल्याने मी स्वतःचे असे काही लिहू शकेल असे
वाटत नव्हते.

ब्लॉगिंगच्या अगोदर मी ऑर्कुटवर पडीक असायचो आणि तेथील सामाजिक
विषयांवरील धाग्यांवर आपले मत नोंदवायचो, भांडायचो... हे रोजचेच होते.
त्यावेळी ब्लॉग हे काय असते, याचे जास्त ज्ञान मला नव्हते. असाच एकदा एक
प्रोफाईल पाहत असतांना मला त्यात एका ब्लॉगची लिंक दिसली. मी उत्सुकतेने
ती पाहिली आणि मला हा प्रकार चांगला वाटला. आपलाही असाच एक ब्लॉग असावा
असे मनात येऊन गेले आणि मी स्वतःचा ब्लॉग तयार केला. नाव काय द्यावे यावर
डोके चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण फक्त सामाजिक विषयांवर, ज्यात बाकी
लोकांना जास्त रस नसतो किंवा एकदा वाचून सोडून द्यायचे असते अशा विषयावर
लिहणार असतांनाही 'जीवनमूल्य' असं उगाच उपदेशात्मक नाव दिलं. त्यानंतर तो
ब्लॉग "मराठी ब्लॉग विश्व"वर लावण्यासाठी मला काय म्हणून कष्ट करावे
लागले, काय सांगू... कारण मला संगणक या गोष्टीतले शून्य म्हणून ज्ञान
होते .कधी व्यवस्थितरित्या हाताळल देखील नव्हता. मी संगणक आणि नेट फक्त
माझ्या शेअर ट्रेडिंग साठी घेतले होते आणि त्या वेळात मी नेटवर भटकत
असायचो, तेवढंच काय ते मला येत होतं. कोणत्याही ब्लॉग धारकाला आपला ब्लॉग
कोणीतरी वाचवा असे वाटत असते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या
असतात. त्यासाठी मी माझ्या नवीन पोस्टची लिंक माझ्या ऑर्कुट मित्रांना
मेसेज करायचो, त्यातील काही वाचायचे, काही प्रतिक्रिया द्यायचे, तेवढाच
थोडासा दिलासा...
ब्लॉग सुरु केल्यानंतर मी बाकीचे मराठी ब्लॉगही वाचायला लागलो. मराठी
ब्लॉग विश्ववरून, काही दिवस असे गेल्यानंतर मला विविध ब्लॉगवरील
टेम्प्लेटने भुरळ घातली. आपलाही ब्लॉग असाच सजवलेला असावा असे वाटू लागले
पण त्यातील अक्कल नसल्याने काही करता येत नव्हते आणि तेवढ्यात
भुंग्याने नवीन टेम्प्लेटबद्दल एक पोस्ट टाकली असावी आणि आम्ही त्याला
प्रतिक्रिया देत त्याबद्दल प्रश्न विचारू लागलो पण HTML मधील काहीही
ज्ञान नसल्याने माझ्या ते डोक्यावरून जात होते, मग 'भुंग्या' दादाला
त्रास सहन होईना, आणि त्याने माझा ब्लॉग स्वतःहून सजवून दिला, तेही
त्याच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आणि मला माझा पहिला ब्लॉग मित्र
मिळाला... त्यानंतर माझ्या पोस्टवरील पहिली प्रतिक्रिया असायची ती
भुंग्या दादाची आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळायचे. मग त्यानंतर ओळख
झाली ती विशल्याची, याने आता आपल्या ब्लॉग ची 'सुरुवात' केलीय की शेवट
केलाय हा प्रश्न आहेच म्हणा, पण याचेही मी खूप डोके खाल्ले आहे आणि आताची
टेम्प्लेट ही याचीच देन आहे. त्यानंतर पंक्याच्या 'भटकंतीने' वेड लावले
याची फोटोग्राफी म्हणजे भन्नाट काम... आपण फिदा आहे त्यावर, रोहनचा तसा
थोडासा परिचय होता ऑर्कुटमुळे पण त्याचे ब्लॉग वाचून आणि महाराजांबद्दलचे
ज्ञान पाहून खरच मानलं या मावळ्याला... एकदम जबरदस्त अभ्यास असणारा
माणूस, त्यात आमच्यासारखाच हुंदडण्यात आनंद मानणारा... महेंद्र काकांच्या
ब्लॉगेस्टिकनंतर त्यांच्या ब्लॉगवर जास्त जाने झाले ते 'काय वाट्टेल ते '
लिहित गेले आणि आम्ही वाचत गेलो अगदी मंत्रमुग्ध होऊन... त्यात त्या
सत्यवानाची 'वटवट' मधेच त्रास द्यायची, कधी हसवायची, तर कधी विचार करायला
लावायची... त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या बाळराजांनी मग काय त्या
ब्लॉगची बातच कुछ और होऊन गेली. कधी कधी 'माझिया मना'ची साद ऐकू यायची
आणि मी तिकडे जायचो.
कधी खूप उदास झालो कि 'माझ्या गजाल्या' असायच्या. कधी सुवासिक 'मोगरा
फुलला
' की तिकडे भटकून यायचो. तुम्ही त्या 'सौरभ'चा ब्लॉग पहिला आहे का
एकदम जबऱ्या माणूस, पाहिजे तसे कशावरही लिहू शकतो तेही माणसाला खेळवून
ठेवत, त्याच्यात खूप काही आहे असे मला सारखे वाटते. याच्या मित्राची
'बक-बक' सुद्धा मस्त असते.

या ब्लॉगिंगमुळेच ट्विटरकडे ओढलो गेलो. आता तिथेच पडीक असतो दिवसभर...
यातून नवनवीन मित्र मिळाले, खूप काही चांगले वाचयला मिळाले. आजकाल मी
आनंदच्या 'मनात काय आहे' ते पाहत असतो तसेच 'बाबाची भिंत' चढून त्यामागे
काय चालले आहे तेही पाहत असतो. कधी निवांत बसायचे असेल तर सागरचा 'सागर
किनारा
' आहेच की...

याच काळात मला मराठी ब्लॉगर्सच्या "पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा" साठी
जाण्याचा योग आला, परंतु जास्त कोणाशी ओळख नसल्याने फक्त भुंग्या दादाशी
गप्पा मारल्या.. पंक्या आपला फोटो काढून घेण्यात व्यस्त होता. दीपक दादा
दिसायला राक्षसासारखा असला तरी खूप प्रेमळ आहे बरं का...!! ;) तर असे
दिवस चालू आहेत कधी काही सुचले तर लिहित असतो... मी साधारण सामाजिक
विषयांवर सडेतोड लिहिण्याचा प्रयत्न करतो... काही लोकांना आवडतं, काहींना
आवडत नसावे, पण आपले मत व्यक्त करत असतो.

तुम्हासारख्या मराठी ब्लॉगर्सचे आणि वाचकांचे प्रेम मिळाले यात खूप
समाधानी आहे. असेच काही-बाही लिहित राहील, वाचत राहा... चुकलो तर चूक
दाखवत जा. तुमचे प्रेम हेच सर्व काही आहे :)

जय महाराष्ट्र!

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे

गेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणात दाखवले जात नाहीत याबद्दल गदारोळ चालू आहे.हा विषय सेनेपासून मनसे आणि मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांच्या दरबारी हजरी लावून आला. मुद्दा भावनिक बनल्याने त्यावर तश्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या परंतु या विषयावर मराठी निर्मात्यांनी स्वता आत्मचिंतन करायची गरज आहे असे मला वाटते.आपण प्रेक्षकांना योग्य दर्जाचे चित्रपट पुरवतो का ? आपण चित्रपट तयार करण्याबरोबर त्याच्या योग्य मार्केटिंगकडे लक्ष देतो का ? कारण आजचा जमाना मार्केटींगचा आहे. मुळात मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहचायला हवा आणि त्यांना आवडायला हवा तरच हा प्रश्न सुटणार आहे.
 नवीन मराठी चित्रपट कधी तयार आणि प्रदर्शित  होतो हे त्या निर्मात्याला आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनाच माहिती असावे असे कधी कधी वाटते काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्यासारखे. एकतर मराठी चित्रपटांमध्ये   व्यावसायिकतेचा  आणि मार्केटींगचा पूर्णपणे अभाव असतो  हे मागे एकदा महेंद्रकाकांनी आपल्या लेखात नोंदवले होतेच. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणत दाखवले जावेत हि अपेक्षा रास्त असली तरी ते दाखवले गेले तरी चित्रपटासाठी प्रेक्षक कोण पुरवणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कि ती जबाबदारीहि कोणा संघटनेने  किंवा सरकारने घ्यावी अशी अपेक्षा मराठी निर्मात्यांची आहे? ५ - १० प्रेक्षकांच्या जोरावर कोणता मल्टीप्लेक्सवाला किंवा थेटरवाला चित्रपट दाखवणार आहे ? यातून त्या खेळाच्या विजेचे बिल तरी वसूल होते का ? चित्रपट त्या दर्जाचा असेलतर तो राज्याच्या सीमा ओलांडूनही यश संपादन करू शकतो हे दक्षिणात्य चित्रपटांनी दाखवून दिले आहे. आजही इंद्र,शिवाजी द बॉस,मास इत्यादी असे कितीतरी दक्षिणात्य चित्रपट विविध वाहिन्यांवर टीआरपी खेचताना दिसून येतात अशी वेळ मराठी चित्रपटांवर का येत नाही ? कि वाहिन्यांनीही मराठी चित्रपट भाषांतरित करून दाखवावेत यासाठी कोणी आंदोलन करावे अशी मराठी निर्मात्यांची अपेक्षा राहील ?
 सगळेच मराठी चित्रपट निष्कृष्ट दर्जाचे असतात असे माझे मत नाही परंतु सगळेच चित्रपट नटरंग,मी शिवाजीराजे बोलतोय,श्वास अशा चित्रपटासारखे  नसतात त्यामुळे असे उत्कृष्ट चित्रपट तयार होत राहिले तर प्रेक्षक आपोआप पाहतात आणि मल्टीप्लेक्सवाले ते दाखवतातहि. प्रदर्शनानंतर २ दिवसहि तग धरू शकणार नाहीत असे चित्रपट बनवले गेलेतर कोण दाखवणार ?
 काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती मराठी चित्रपटांवर आली होती त्यावेळची  दादा कोंडके यांनी कोंडी फोडली होती.रडारडीत अडकलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी वेगळी जाण आणली होती त्यानाही सुरवातीला संघर्ष करावा लागला परंतु प्रत्येकवेळी नाही त्यांनतर त्यांना आणि त्यांच्या निर्मात्यांना कधीच रडण्याची वेळ आली नाही. दादांचे चित्रपट २०-२५ आठवडे चित्रपटगृहात राहणार असाच नियमच बनून गेला होता आणि त्यांचे चित्रपट दाखवण्यासाठी थेटरमालक स्पर्धा करू लागले होते. त्यामुळे चांगले चित्रपट असतील तर कोणत्याही मल्टीप्लेक्स मालकांना जबरदस्ती करण्याची वेळ येणार नाही.शेवटी मालक धंदा करत असतो त्याला कोणत्याही प्रांतवाद व भाषावाद  यात पडायचे नसते चांगला चित्रपट आणि भरपूर प्रेक्षक द्या मालक चित्रपट निर्मात्यांच्या मागे लागतील.
 प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्यास कोणत्याही वेळी मराठी चित्रपट दाखवले जातील. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगल्या चित्रपटांची आणि  अशाच एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे.

जय हिंद
जय महाराष्ट्र

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

क्रांतिकारक खुदिराम बोस

हिंदुस्तानवर जुलमी सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यावर अलौकिक धैर्याने पहिलावहिला बॉम्ब फेकला.शालेय जीवनातच 'वंदे मातरम' या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वताला झोकून दिले आणि अवघ्या १८ व्या वर्षात हातात 'भगवदगीता' घेऊन ज्यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले ,त्या वंगवीर  खुदिराम बोस यांच्या जयंती निम्मित्त त्यांचे पुण्यस्मरण करूयात.
 खुदिराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बाबू त्रैलोक्यनाथ बोस व आई लाक्ष्मिप्रीयादेवी.
फेब्रुवारी १९०६ मध्ये मिदनापूर येथे एक औद्योगिक व शेतकरी प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आजूबाजूच्या प्रांतातील भरपूर लोक येऊ लागले.बंगालमधील एक क्रांतिकारक सत्येंद्रनाथ यांनी लिहलेल्या 'सोनार बांगला' या जहाल पत्रकाच्या प्रती खुदिराम यांनी या प्रदर्शनात वाटल्या.पोलीस शिपाई त्यांना पकडण्यासाठी धावला.खुदिराम यांनी त्या शिपायाच्या तोंडावर ठोसे मारले आणि  शिल्लक  राहिलेली पत्रके काखेत मारून ते त्य्नाच्या हातून निसटून गेले.याप्रकरणी राजद्रोहाच्या आरोपावरून सरकारने त्यांच्यावर अभियोग भरला;परंतु खुदिराम त्यातून निर्दोष सुटले!
 किंग्जफोर्डला ठार मारण्याच्या कामगिरीसाठी निवड -
मिदनापूर इथे 'युगांतर' या क्रांतिकारकाच्या गुप्त संस्थेच्या माध्यमातून खुदिराम क्रांतिकार्यात ओढले गेले.१९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.या फाळणीच्या विरोधात असणार्या अनेकांना त्या वेळचा कोलकात्याच्या म्याजीस्ट्रेट किंग्जफोर्ड याने क्रूर शिक्षा ठोठावल्या होत्या.अन्य प्रकरणात हि त्याने हिंदी क्रांतिकारांना खूप छळले होते. याच सुमारास किंग्जफोर्डला बढती मिळून तो मुझ्झफरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून कामावर रुजू झाला.सरतेशेवटी 'युगांतर' समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्डलाच ठार मारायचे ठरले.यासाठी खुदिराम व प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड करण्यात आली.


खुदिराम यांना  एक बॉम्ब आणि रिव्हॉल्वर देण्यात आले.प्रफुल्लकुमार यानाही एक रिव्हॉल्वर देण्यात आले.मुझ्झफरपुरला आल्यावर या दोघांनी किंग्जफोर्डच्या बंगल्याची टेहळणी  केली.त्यांनी त्याची चारचाकी व तिच्या घोड्याचा रंग पाहून घेतला.खुदिराम तर त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला नीट पाहूनही आला!
 ३० एप्रिल १९०८ रोजी हे दोघे नियोजित कामगिरीसाठी बाहेर पडले आणि किंग्जफोर्ड च्या बंगल्याबाहेर घोडागाडीतून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.बंगल्यावर टेहळणीसाठी असलेल्या २ गुप्त अनुचारानी त्यांना हटकले,पण त्यांना योग्य ती उत्तरे देऊन ते तेथेच थांबले.
 हिंदुस्तानातील पहिल्या बॉम्बचा स्फोट-
रात्री साडेआठच्या सुमारास क्लबकडून किंग्जफोर्डच्या गाडीशी साम्य असणारी गाडी दिसताच खुदिराम गाडीमागून धावू लागले.रस्त्यावर खूपच अंधार पडला होता.गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येताच त्यांनी दोन्ही हातानी बॉम्ब वर उचलला व नेम धरून पुढील चारचाकीवर जोराने आदळला. हिंदुस्तानातील या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज त्या रात्री तीन मैलापर्यंत ऐकू गेला आणि काही दिवसातच त्याचा आवाज इंग्लंड, युरोपलाही ऐकू गेला!
 खुदिराम यांनी किंग्जफोर्ड ची गाडी समजून बॉम्ब टाकला होता.पण त्या दिवशी तो थोड्या उशिराने क्लबबाहेर पडल्यामुळे वाचला.दैवयोगाने गाड्यांच्या साधर्म्यामुळे दोन युरोपियन स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागले! रातोरात खुदिराम व प्रफुल्लकुमार दोघेही २४ मैलावरील वैनी रेल्वेस्थानकापर्यंत अनवाणी धावत गेले.
 दुसर्या दिवशी संशयावरून प्रफुल्लकुमार चाकींना पोलीस पकडण्यासाठी गेले तेंव्हा त्यनी स्वतावर गोळी झाडून घेतली व प्राणार्पण केले.खुदिराम  यांना पोलिसांनी अटक केली.या ताकेचा शेवट ठरलेलाच होता.
 ११ ऑगस्ट १९०८ रोजी भगवदगीता हातात घेऊन खुदिराम धैर्याने व आनानदी वृतीने फाशी गेले!
 किंग्जफोर्ड ने घाबरून नोकरी सोडली आणि ज्या क्रांतीकारकांना त्याने छळले त्यांच्या भीतीने तो लवकरच मरण पावला! त्याचे नावनिशानही उरले नाही.
 खुदिराम मात्र मरूनही अमर झाले !
(साभार-स्थानिक वर्तमानपत्र )