शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

हुतात्मा मराठी-अमराठी असतात का ????

काल रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे नेटवर होतो. ओर्कुटवर होतो, माझा आवडता समूह 'मुक्तपीठ' यावर टाइमपास करत बसलो होतो.
बसल्या बसल्या समूहातील धागे चाळत होतो आणि रात्री एका सभासदाने एक नवीन धागा सुरु केलेला दिसला.
धाग्याचे शीर्षक होते 'MNS hoarding forgets non-Marathi heroes' आणि मला थोडे आश्चर्य वाटले आणि थोडा धक्का हि बसला.(http://news.rediff.com/report/2009/nov/26/anniversary-26-11-mns-hoarding-forgets-non-marathi-heroes.htm)
ती बातमी रेडीफ संकेतस्थळावरील होती त्यात असे नमूद केले होते कि मनसे कार्यकर्त्यांनी २६/११ तील शहिदांच्या श्रद्धांजलीसाठी जे पोस्टर्स लावले होते त्यात फक्त मराठी असणार्या शहीदांचीच छायाचित्रे लावण्यात आली होती अमराठी शहिदांची नाही. हे वाचून आणि पाहून मला खरच धक्काच बसला.
जे देशासाठी आपल्या मुंबई,महाराष्ट्रासाठी हुतात्मा झाले ते मराठी-अमराठी कसे धरू शकतात ?


शहीद उन्नीकृष्णन आणि बिश्त हे स्वर्गातून म्हणत असतील यासाठीच केले होते का बलिदान ?कि स्वर्गात सर्व मराठी शहिदांची छाती या गोष्टीने गर्वाने फुलली असेल ?
हि गोष्ट ज्या कोणी कार्यकर्त्याने केली असेल त्यामुळे तळपायाची आग मस्तकात जाते तसेच त्याच्या बुद्धीची कीव येते.
यामध्ये त्या पक्षाचा दोष नसेल असे समजून जरी चाललो तरी अशा गोष्टी घडू नयेत याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे आणि अशा कार्यकर्त्यांना समज द्यायला हवी.

निदान अशा ठिकाणी तरी मराठी अमराठी हा वाद आणू नये.जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा अश्या सगळ्या बाजूला ठेवून पहिला विचार देशाचा व्हायला हवा ..................देशासाठी शहीद होणारा प्रत्येक वीर हा प्रथम भारतीय असतो ..तो कुठल्याही धर्म जात किंवा प्रांताचा नसतो !!!!

जय हिंद
जय महाराष्ट्र
Reblog this post [with Zemanta]

बुधवार, २५ नोव्हेंबर, २००९

आयुर्वेदाच्या इतिहासात

आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे समजावे? यावर गुरुंनी उत्तर दिले की बागेत काम करण्याची खुरपणी घेऊन चारही दिशांनी प्रवास कर व जे औषधी नाही असे द्रव्य घेऊन ये.
जीवक निघाले, काही दिवसांनी परत येऊन म्हणाले, आचार्य मी चारही दिशांना खूप फिरलो पण मला औषधी नाही असे काहीच सापडले नाही. यावर गुरु म्हणाले, तुझे शिक्षण पूर्ण झाले. पुढे हेच वैद्य राजवैद्य झाले.

ही गोष्ट इथे सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याही घरात, आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्या

meditationImage by HaPe_Gera via Flickr

चे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार याप्रमाणे होत.

उन्हाळ्यात पाणी पिऊनही समाधान होत नाही, ओठ, घसा कोरडे पडतात, हातापायाच्या तळव्यांची आग होते, अशावेळी साधारण एक लिटर पाण्यात दोन सुके अंजीर, मुठभर मनुका आणि दोन चमचे धने घालून हे सर्व मिश्रण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रवीने घुसळून, गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यायल्यास ऊन्हाळ्याचे त्रास कमी होतात. ऊन्हाळ्यामधे थकल्यासारखे वाटते तेही कमी होते.

उन्हाळ्यामधे द्राक्षे मिळतात. द्राक्षांचा रस हा उन्हाळ्यातील ऊष्णता कमी करण्यासाठी उत्कृष्ट असतो. द्राक्षाच्या रसात चिमुटभर जीरेपुड आणि चिमुटभर बडिशेपेची पूड टाकुन प्यायले असता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातु पुन्हा टवटवीत होतो. द्राक्षे वार्याने थंड असल्याने अंगाचा दाह, मूत्राचा दाह वगैरे लक्षणे कमी होतात.

बऱ्याच व्यक्‍तींना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे वगैरे त्रास होतात. संगणकावर वा प्रखर प्रकाशात काम करणाऱ्यांना तर उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवणे उत्तम असते. शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा न तापवलेल्या कच्च्या, थंड किंवा तापवून गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.

* उन्हाळ्यात लहान मुलांना तसेच त्वचा असणाऱ्यांना घामोळे येताना दिसते, यावर खरबूजाचा गर लावण्याचा उपयोग होतो.

* उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ होत असल्यास दुधीचा कच्चा कीस बांधून ठेवण्याचा तसेच दूर्वांच्या लॉनवर अनवाणी चालण्याचा उपयोग होतो.

* उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्यक्ष उन्हात जाण्याचे टाळणेच हितकर असते. पण उन्हात जावे लागलेच तर उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये, त्वचा काळवंडू नये यासाठी चेहरा, हात वगैरे उन्हाचा संपर्क आलेल्या ठिकाणी घरचे ताजे लोणी चोळणे उत्तम असते.

* उन्हाळ्यात लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे वगैरे लक्षणे असल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास लघवीला साफ होऊन बरे वाटते.

* उष्णता बाधू नये म्हणून उन्हाळ्यात शीतल द्रव्याची उटणी लावावीत असे आयुर्वेदात सुचविले आहे. अनंतमूळ, वाळा, चंदन, ज्येष्ठमध वगैरे शीतल, सुगंधी व वर्णात हितकर द्रव्यांचे चूर्ण व मुगाच्या डाळीचे पीठ यापासून तयार केलेल्या उटणे लावून स्नान करणे उन्हाळ्यात उत्तम होय.

उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होत असते. शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट असते.

* गवती चहा, आले, तुळशी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतबंध होतो व पचनशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते.

* ओवा, तीळ, ज्येष्ठमध, सैंधव वगैरे द्रव्यांपासून बनविलेली सुुपारीपावसाळ्यात जेवणानंतर खाणे हितावह असते, याने पचनाला मदत होते.

* पावसाळ्यात पुदिना हे सुद्धा मोठे घरगुती औषध आहे. जेवणात पुदिन्याची ताजी पाने, काळी द्राक्षे, जिरे, हिंग, सैंधव, मिरी यापासून बनविलेली चटणी खाण्याचा उपयोग होतो. याने तोंडाला रुची येते, शिवाय पचनास मदत मिळते.

* दुपारच्या जेवणानंतर किसलेले आले व पुदिन्याचा रस टाकून ताक घेण्यानेही पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. विशेषतः जुलाब, आव वगैरे त्रासांना प्रतबंध होतो.

* पावसाळ्यात वातदोष वाढतो. वात वाढला की त्यापाठोपाठ दुखणेआलेच. संधिवात, आमवात वगैरे दुखणे असणाऱ्यांना याचा अनुभव येतोच. अशा व्यक्‍तींनी व इतरांनीही पावसाळ्यात सुंठ-गूळ-तूप यापासून बनविलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते. याने वातदोष नियंत्रित होण्याबरोबर पचनालाही मदत मिळते.

* पावसाळ्यात भूक लागत नसली, पोट जड वाटत असले, गॅसेस अडकून राहिले आहेत असे वाटत असले तर लिंबू व आल्याच्या रसाच्या मिश्रणात थोडी जिरे पूड व सैंधव टाकून तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटणे उत्तम असते.

* हिंग्वाष्टक नावाचे चूर्ण पावसाळ्यात उत्तम होय. त्रास असो वा नसो, प्रकृतीनुसार पाव ते अर्धा चमचा चूर्ण व थोडेसे तूप भाताच्या पहिल्या घासाबरोबर घेण्याने भूक लागायला मदत होते, अन्न व्यवस्थित पचते.

* पावसाळ्यात तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हितावह असते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरणे अधिक हितावह असते.

* जंत होऊ नयेत व झालेले जंत नष्ट व्हावेत यासाठी उपाययोजना करणे एरवीही चांगले असते. पावसाळ्यात मात्र याकडे विशेषतः द्यावे लागते. त्यादृष्टीने महिन्यातून आठ दिवस सकाळी चमचाभर वावडिंगाचे चूर्ण मधासह घेणे चांगले असते. कढीलिंबाची ताजी पाने वाटून केलेली गोळी अधून मधून घेण्याचाही उपयोग होतो.

* पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध होण्याच्या दृष्टीने घर, ऑफिस, दवाखाने वगैरे सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे धूप करणें उत्तम असते. यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, कापूर, ऊद वगैरे द्रव्यांचे मिश्रण वा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येतो.

पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी येणाऱ्या शरद ऋतूत पुन्हा एकदा पित्त वाढत असते किंबहुना पित्ताचा प्रकोप ह्याच काळात होत असल्याने उन्हाळ्यात घ्यायची काळजी पुन्हा या दिवसात घेणे आरोग्यरक्षणासाठी चांगले असते.

तसे पाहता हिवाळा हा आरोग्यदायक काळ असतो. या दिवसात अग्नी प्रज्वलित होतो, शरीरशक्‍ती आपोआपच वाढते. थंडीचा त्रास होऊ नये व निसर्गतः वाढणाऱ्या शरीरशक्‍तीला घरगुती उपायांची जोड मिळून ताकद कमवून ठेवता यावी यासाठी निश्‍चित प्रयत्न करता येतात.

* हिवाळ्यात नियमित अभ्यंग करणे उत्तम असते. यामुळे थंडीचे निवारण होते व शरीरशक्‍ती वाढायला मदत होते.

* थंडीमुळे त्वचा कोरडी होण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी अगोदर अंगाला तेल लावून नंतर अगरू, जटामांसी, केशर, वगैरे द्रव्यांनी युक्‍त “सॅन मसाज पावडर’सारख्या उटण्याने स्नान करण्याने हिवाळ्यात उत्तम असते.

* थंडीमुळे सर्दी, खोकला होऊ नये, तसेच शरीरात कफदोष साठू नये यासाठी हिवाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा टाकणे चांगले असते.

* हिवाळ्यात जेवणानंतर त्रयोदशी विडा म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेला विडा खाण्याचाही उपयोग होतो. याने अतिरिक्‍त कफदोष कमी होऊन पचन चांगले होते.

* हिवाळ्यात बदामाची खीर खाणे चांगले असते. रात्री चार बदाम भिजत घालावेत, सकाळी साले काढून बारीक वाटावेत व दुधात कालवून थोडे आटवावे. यात खडीसाखर व थोडे तूप टाकून तयार झालेली खीर सकाळी खावी.

* डिंकाचे लाडू, कोहळेपाक, गव्हाची खीर आदी धातुपोषक पदार्थांचा आहारात समावेश करणेही हिवाळ्यात हितकर असते.

(By Mail)

Reblog this post [with Zemanta]

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

फॉरेक्‍स ट्रेडिंग

जागतिक मंदीने आज जवळपास सर्वच उद्योग-व्यवसाय अडचणीत आले असून, बाजारातील उलाढाल मंदावल्याचे चित्र आहे. उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार मंडळी सर्वच जण मंदीमुळे हवालदिल झाले आहेत. शेअर बाजार दोलायमान स्थितीत आहे. अशा काळात एक व्यवसाय मात्र वेगाने विस्तारत आहे आणि तो म्हणजे "ऑनलाइन फॉरेक्‍स ट्रेडिंग' अर्थात परकी चलनाचा व्यवहार!


जगभरातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना आज मजबूत चलनामध्ये व कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित वाटत आहे. डॉलर व्यतिरिक्त पौंड, युरो, येन अशा अनेक चलनांमध्ये व सोने, चांदी, कच्चे तेल अशा कमोडिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
आपला देशामध्ये मात्र "फॉरेक्‍स ट्रेडिंग' या व्यवसायाबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. या लेखामधून आपण "फॉरेक्‍स ट्रेडिंग' हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करू या.
फॉरेक्‍स ट्रेडिंग म्हणजे काय?
"फॉरेन एक्‍स्चेंज' या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजे "फॉरेक्‍स' होय. "फॉरेक्‍स ट्रेड'ला "करन्सी ट्रेड' अथवा परकी चलनाचा व्यापार असेही म्हणतात. पूर्णतः ऑनलाइन स्वरूपाचा हा व्यापार २४ तास अविरतपणे जगभर सुरू असतो. जगभरातील विविध बॅंका, गुंतवणूकदार, मार्केटमेकर हे एका चलनाच्या बदल्यात दुसरे एखादे चलन घेतात अथवा विकतात व किमतीमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चढउतारांतून चांगला नफा कमावत असतात. यामध्ये "स्पॉट ट्रेड' व "फ्युचर ट्रेड' अशा दोन पद्धतीने कामकाज चालते. स्पॉट व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त काम होते.
"फॉरेक्‍स'कडे कल का वाढत आहे?
"फॉरेक्‍स मार्केट'ची कार्यपद्धती थोड्याफार प्रमाणात शेअर बाजाराप्रमाणेच असते. "फॉरेक्‍स मार्केट'ची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१) परकी चलनाच्या भावात व त्यातल्या त्यात डॉलर, युरो, येन, पौंड यासारख्या प्रमुख चलनांच्या दरांमध्ये (शेअर बाजाराप्रमाणे) अचानक मोठे चढउतार होत नाहीत. ठराविक अशा एका पातळीतच व्यवहार घडत असतात. त्यामुळे यात तुलनात्मकदृष्ट्या धोका कमी असतो.
२) चोवीस तास चालणारे मार्केट असल्याने आपल्या सवडीनुसार केव्हाही काम करणे शक्‍य आहे. त्यातल्या त्यात भारतीय वेळेनुसार सायंकाळी चार-पाच वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत व्यवहार करणे जास्त चांगले ठरते.
३) "मार्जिन'च्या सोयीमुळे मोठी गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता नसते. केवळ एक टक्का "मार्जिन'वर (अर्थात १०० पट लिव्हरेजिंग) काम सुरू असते. अगदी पन्नास हजार अथवा लाखभर रुपयांच्या भांडवलावर काम सुरू करता येते व आपल्या गुंतवणुकीच्या अनेक पट नफा कमविणे शक्‍य होते. (मार्जिन ट्रेडिंगमुळे नुकसानीचे प्रमाणही मोठे असू शकते, हे समजावून घेणेसुद्धा आवश्‍यक आहे. "स्टॉपलॉस'चा योग्य वापर केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.)
४) "शॉर्ट सेलिंग'च्या सोयीमुळे दर घसरत असतानाही नफा कमविणे शक्‍य होते.
५) फॉरेक्‍ससोबतच त्याच खात्यामधून सोने-चांदीसारख्या कमोडिटीजच्या आंतरराष्ट्रीय बाजारात काम करणेसुद्धा शक्‍य होते.
६) बाजाराचे स्वरूप व आवाका लक्षात घेता चलनाचे भाव "मॅनिप्युलेट' करणे अथवा काही गडबड-घोटाळा करणे शक्‍य नसते. त्यामुळे चढ-उतारांचे आडाखे बांधताना टेक्‍निकल ऍनालिसिससारखे शास्त्र प्रभावीपणे काम करताना दिसते.
"फॉरेक्‍स'चे व्यवहार कोठे घडतात ?
"ओटीसी' म्हणजे "ओव्हर द काउंटर' स्वरूपात "स्पॉट फॉरेक्‍स'चे व्यवहार होत असतात. अर्थात, कोणत्याही एखाद्या एक्‍स्चेंजवर हे व्यवहार होत नसतात, तर जगभरातील अनेक बॅंका; तसेच गुंतवणूकदार, मार्केटमेकर किंवा ब्रोकरच्या माध्यमातून इंटरनेटवरून एकमेकांशी हे व्यवहार होत असतात. "फॉरेक्‍स फ्युचर्स'चा व्यापार मात्र मुख्यतः न्यूयॉर्क एक्‍स्चेंज माध्यमातून होत असतो. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस कमिशन (आयएफएससी), फायनान्शियल सर्व्हिसेस ऍथॉरिटी (एफएसए)सारख्या आंतरराष्ट्रीय नियामक संस्था "फॉरेक्‍स'च्या सर्व व्यवहारांचे नियमन करीत असतात. भारतात सेबी व रिझर्व्ह बॅंक हे काम करतात.
आता फॉरेक्‍स व कमोडिटी मार्केटमधील व्यवहारांचे प्रत्येकी एक उदाहरण पाहू.
या ठिकाणी आपण फॉरेक्‍स ऐवजी प्रथम कमोडिटी बाजारातील (सोन्याचे) उदाहरण घेऊ जेणेकरून नवख्या लोकांना समजण्यास सोपे जाईल.
समजा, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव एका ट्रॉय औन्ससाठी ९१० डॉलर इतका आहे. लॉट साईजनुसार किमान १०० ट्रॉय औन्स घ्यावे लागतात. म्हणजे ९१ हजार डॉलर एवढे एका लॉटचे मूल्य होते. त्यासाठी फक्त एक हजार डॉलर किंवा अंदाजे ५० हजार रुपये एवढे मार्जिन भरावे लागते.
समजा, राजेशकुमार नावाच्या एका व्यापाऱ्यास असे वाटते, की सोन्याचा भाव आज वर जाण्याची शक्‍यता आहे. राजेशकुमार अर्थातच मग सोन्याचा एक लॉट खरेदी करतो. आता सोन्याच्या भावात एका डॉलरची वध-घट झाल्यास राजेशकुमारला संपूर्ण लॉटमागे १०० डॉलरचा नफा अथवा तोटा होईल. (कारण भाव ९१० वरून ९११ झाल्यास लॉटचे मूल्य ९१ हजार वरून ९१,१०० डॉलर होते.) सोन्याच्या भावात दिवसभरात साधारणतः पंधरा-वीस डॉलरचा चढ-उतार होत असतो. त्यामध्ये एक-दोन डॉलरच्या हालचालीचादेखील व्यवस्थितपणे लाभ (एनकॅश) उठविता आला, तरी शंभर-दोनशे डॉलर म्हणजेच पाच ते दहा हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीच्या तुलनेत हा फायदा फारच मोठा आहे.
आता फॉरेक्‍स ट्रेडिंगमधील एक व्यवहार बघू.
समजा युरो-डॉलर या "करन्सी पेअर'चा १.३२१२ असा दर आहे. अर्थात एक युरो खरेदी करण्यासाठी १.३२१२ डॉलर लागतात, असा त्याचा अर्थ होतो. यातील शेवटच्या अपूर्णांकास एक पिप असे म्हणतात. म्हणजे ०.०००१ = १ पिप
समजा, राजेशकुमार नावाच्या व्यापाऱ्यास असे वाटते, की युरोचा भाव डॉलरच्या तुलनेत आज वर जाण्याची शक्‍यता आहे. राजेशकुमार अर्थातच युरोचा एक लॉट खरेदी करतो. एक लॉट म्हणजे १ लाख करन्सी युनिट्‌स. त्यासाठी त्याला मार्जिन भरावे लागते फक्त एक हजार डॉलर (म्हणजे १०० पट लिव्हरेजिंग किंवा एक टक्का मार्जिन).
आता युरोचा भाव एक पिपने वाढला म्हणजे १.३२१२ वरून १.३२१३ झाला, तर राजेशकुमारला १० डॉलरचा नफा होईल. १० पिपने वाढला (अथवा घटला) तर १०० डॉलरचा नफा (अथवा तोटा) होईल. दिवसभरात सामान्यतः शंभर-एक पिपची हालचाल सहज होताना दिसते.
अवघ्या पन्नास हजार रुपयांत सुरवात करता येणारा हा व्यवसाय सुज्ञपणे व अभ्यासपूर्ण पद्धतीने केल्यास चांगली कमाई करून देऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे सवडीप्रमाणे व सोयीप्रमाणे दिवसभरात कोणत्याही वेळी काम करता येते. बेरोजगार तरुण असो, सेवानिवृत्त नागरिक असो अथवा अर्धवेळ व्यवसाय करू इच्छिणारे व्यावसायिक, उद्योजक वा गृहिणी असो, मध्यमवर्गीय असो वा उच्चभ्रू सर्वांना करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे.
केवळ एक संगणक अथवा विंडोज एनेबल्ड मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्‍शनची गरज यासाठी भासते. योग्य ब्रोकरची निवड करणे हेही यामध्ये महत्त्वाचे ठरते. मागणी-पुरवठा विश्‍लेषणाचे ज्ञान व थोडीशी समयसूचकता, सतर्कता यांचा योग्य ताळमेळ साधल्यास "फॉरेक्‍स ट्रेडिंग' हा अतिशय चांगला व्यवसाय ठरू शकतो.
- नितीन देशमुख, नाशिक
(
सकाळ वृत्तसेवा)