गुरुवार, २८ जानेवारी, २०१०

खांदेरी... बेटालाच बांधलेली तटबंदी

खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नाह्वे;पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे.इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला.या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे.त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी नावा मासेमारीसाठी समुद्रात घालत नाहीत.बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.
Kokan TripImage by शंतनू via Flickr
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना मुंबईच्या इंग्रजांनी ती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या.गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला.
मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलातखानाचे आरमार आले.आलिबाग-थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या!मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यामध्ये एक 'ब्लोकेड' उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते;पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या चेनेलमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही.वाऱ्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली.छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता 'डव्ह'नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून शिवप्रभूंच्या आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना सागरगडावर कैदेत डांबले.
सागराची भरती-ओहोटी,खोल-उथळ पाणी,मतलय,वैगेरेचे ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा जास्त असल्याचे दिसले.मराठ्यांच्या संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या होड्यांनी या युद्धात कमाल केली.या चिंचोळ्या होड्या रात्री वल्व्ह्त मराठे सामान बेटावर पोहचते करीत.इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्यावर अवलंबून असत.खास मराठी बांधणीच्या या होड्यांनी इंग्रजांना आश्चर्यकारकरित्या चकवले.
कॅप्टन विलियमने मुंबईला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे,'या सरपठनार्या मराठी होड्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात.अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात!' काय गमत आहे बघा!खास मराठी बांधणीच्या होड्या त्या दर्यावादी इंग्रजांना हव्या होत्या!
Enhanced by Zemanta

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

पद्मदुर्ग.... शिवरायांची सागरी दौड

सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही.

जझीरा म्हणजे बेट.'जंजिरा' हा त्याचा मराठी अपभ्रंश पाण्यातील बेटावरील दुर्गासाठी वापरला जातो.जंजिर्याचे नाव आहे 'माहरुबा'. माह म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर! मुरुड जवळच्या बेटावरील हा दुर्ग एकवीस बुरुजांनी बंदिस्त केला आहे.काही बुरुज प्रचंड आहेत.या बुरुजांवरच्या अनेक मोठ्या तोफांनी जंजीरयाच अभेद्यत्व कायम ठेवलं होत.शिवाजीमहाराजांनी कोकणपट्टीवरील अनेक दुर्ग ताब्यात आणून आणि
Janjira fortImage via Wikipedia
स्वराज्याच आरमार तयार करून सिद्याच्या कोकणातील अत्याचारांना मोठाच आळा घातला होता;पण जंजिरा आपल्या ताब्यात आणण्यास मात्र त्यांना यश आल नाही.
शेवटी जंजीरयावर दबाव रहावा म्हणून त्याच्यापासून दूर समुद्रात असणारया एका छोट्या बेटावर शिवप्रभूनी एक दुर्ग बांधावयास काढला.मुरूडच्या किनार्यावरून हे बेट दिसते.त्याचे नाव आहे कांसा.या कांसा बेटावर मराठी स्थपती दुर्ग उभारणीच काम करू लागले.सिद्दी या बेटावर हल्ले चढवतील म्हणून दर्यासारंग आणि दौलतखान यांना आरमार घेऊन बेटाच्या मदतीला पाठविण्यात आले.शिवप्रभूनी हा दुर्ग बांधला.
पुढे हा सिद्द्यानी जिंकून घेतला.त्या पद्म्दुर्गाचा मूळचा काही भाग पडून सिद्द्यानी त्यावर त्यांच्या शैलीतील बांधकाम केले.मराठी आणि सिद्दी यांच्या बांधकाम शैलीतील फरक पद्म्दुर्गावर लगेचच कळून येतो.पद्मदुर्गाचे मग वैशिष्ट्य काय आहे?
जंजिरा आणि पद्मदुर्गावर एक गंमत पहावयास मिळते.येथे दगड चुन्यात बसवले आहेत आणि चुन्याचे थरही जाड आहेत. या दोन्ही दुर्गांवर एक गोष्ट पहावयास मिळते ती म्हणजे सागराच्या लाटांच्या मारामुळे बरयाच ठिकाणी तटबुरुजांचे दगड झिजले आहेत.झिजून वीत दोन विती आत गेले आहेत;पण त्यांना जखडून ठेवणारे चुन्याचे थर मात्र तसेच आहेत.ते काही झिजलेले दिसत नाहीत.पूर्वी चुना उत्तमरीत्या मळून,तो ठराविक वेळातच वापरात असत.त्यामुळे चुन्याचे पकडीचे गुण वाढत असत.चुण्यावर हवामानाचा आणि लाटांचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही.आज चार-पाचशे वर्षे तरी चुना तसाच टिकूनआहे.
Enhanced by Zemanta

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

'साहेबांना' वाढदिवसाच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा!

आज बाळासाहेबांचा ८३ वा वाढदिवस. आई जगदंब त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी इच्छा.
बाळासाहेब हे अस एक व्यक्तिमत्व ज्याच्याकडे मी कधी वा कसा कर्षित होत गेलो हे माझे मलाही समजले नाही.त्यांचे 'मराठी' आणि 'हिंदुत्व' याच्यावरील प्रेम आणि विचार मला आकर्षित करून गेले असावेत परंतु त्यांचा 'एकवचनी' पण अधिक भावला. त्यांनी एखादी गोष्ट बोलली तर त्यापासून त्यांनी कधीही घुमजाव केले नाही.'मी असे बोललोच नाही' हे वाक्य मला बाळासाहेबांकडून कधीही ऐकायला मिळाले नाही.मी माझे त्यांच्याबद्दलचे मत माझ्या मागील 'शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय' या पोस्टमध्ये मांडलेच हे.अधिक काही लिहित नाही.

अशा माझ्या 'साहेबानांचा' आज वाढदिवस .
मागील आजारपणातून ते आता चांगल्या प्रकारे ठीक झाले आहेत वयामानाने त्यांना आता पहिल्यासारखी धावपळ करता येत नसली तरी त्यांची एक झलक हि मनाला एक वेगळेच समाधान देऊन जाते.मराठी मन आणि मराठी माती
तुम्हीच घडवलीत सोन्याची नाती ...

'हिंदवी पताका अस्मानी फडकती,
मराठी अस्मिता उन्नत होती
मराठी माथा श्रद्धेने झुकतो ,
मनी शिवरायांचा जयजयकार घुमतो !'

अशा माझ्या दैवताला
''हिन्दुह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा! ""

बुधवार, २० जानेवारी, २०१०

हि संस्थाने खरच खालसा होणार का ?

University of PuneImage by K. Shreesh via Flickr

देशातील ४४ अभिमत (डीम्ड) विद्यापीठांचा दर्जा काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि देशात नवीन तयार झालेल्या संस्थानिकांना (शिक्षणसम्राटांना ) चांगलाच धक्का बसला.राजकीय वरदहस्तानेच चालू झालेल्या या स्वैराचाराला अखेर लगाम बसणार परंतु हेही घडून आले ते सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे आणि त्यावर न्यायालयाने सरकारला आपली भूमिका स्पष्ट करायला लावल्यामुळे.
अभिमत विद्यापीठाचा दर्जा अशा काही संस्थाना दिला जातो ज्यांच्यात एक स्वतंत्र विद्यापीठासारखी संस्था चालवण्याची क्षमता (आणि राजकीय वजन) आहे.अशाच महाराष्ट्रातील कृष्णा वैद्यकीय (कराड),डी.वाय.पाटील कोल्हापूर आणि पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचा या निर्णयाने गाशा गुंडाळला जाणार आहे.
१९९५ पर्यंत ३६ संस्थाना हा दर्जा प्राप्त होता तो आकडा २००८ सालापर्यंत १०० च्या वर गेला होता तो राजकीय वरदहस्ताने.प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने अभिमत विद्यापीठाच्या नावाखाली स्वताचे संस्थान तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच मनमानी कारभाराला सुरवात झाली. या अभिमत विद्यापीठांना स्वताचा अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार मिळतोच,शिवाय प्रवेश प्रक्रिया,शुल्क तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्वतंत्र नियम तयार करण्याचे अधिकारही मिळतात.ज्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात हिअभिमत विद्यापीठे येतात त्यानाही यांच्या कारभारात हस्तक्षेप करता येत नाही.त्यामुळे या विद्यापीठांत गैरकारभार वाढू लागला. अमाप प्रवेश शुल्क,चुकीची प्रवेश प्रक्रिया,शिक्षकांच्या प्राथमिक अधिकारांची पायमल्ली यामुळे अशा विद्यापीठांचा दर्जा घसरत गेला आणि भ्रष्टाचार वाढत गेला.
अभिमत विद्यापीठांनी गैरकारभार चालू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने सरकारने पी.न.टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवून याची चौकशी केली.त्या समितीने १२६ विद्यापीठांना भेटी देऊन त्याची तपासणी केली आणि विद्यापीठांच्या चुका,गैरप्रकार सरकारसमोर मांडले. आणि शेवटी एका जनहित याचिकेमुळे अशा गैरकारभाराला चाप बसण्याची वेळ आली.
परंतु खरच हि नवीन संस्थाने खालसा होणार का ? कि यातूनही काही पळवाटा काढल्या जाणार ? किंवा यातूनही राजकीय प्रभावामुळे काही लोक सुटणार ?
प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल तोपर्यंत सरकारचे आणि जनहित याचिकाकरत्याचे धन्यवाद.
जय हिंद.
जय महाराष्ट्र !

Reblog this post [with Zemanta]

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

सिंधुदुर्ग... टोपकरांच्या ऊरावर


सिंधुदुर्ग म्हणजे अठरा टोपकरांच्या ऊरावर शिवप्रभूनी उभारलेला एक बळकट जलदुर्ग आहे.मालवण नजीक असणारे कुरटे नावाचे हे बेट तटबंदी घालून बंदिस्त केले आहे.आरमार पावसाळ्यात वसवण्यासाठी उत्तम बंदराचा आणि जंजिर्याचा आसरा लागतो.गोव्याच्या पोर्तुगीजांनी शह देण्यासाठी या दुर्गाची रचना केली गेली.
Shivaji temple on Sindhudurg fortImage via Wikipedia
सिंधुदुर्गाच प्रवेशद्वार जीभीचे आहे.त्यातून आत आल्यावर उजवीकडे वळून पायर्यांवरून फांजीवर गेल्यास दोन घुमट्या आहेत.तेथील दोन घूमट्यात चुन्यात हातापायांचे ठसे आहेत.ते 'तीर्थरूप कैलासवासीमहाराज राजश्री छत्रपती' यांच्या हातापायांचे आहेत,असे इ.स.१७६२ मध्ये कोल्हापूरच्या जिजाबाई यांनी सिंधुदुर्गचा किल्लेदार येसाजी शिंदे याला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.
तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते.प्रवेशद्वारातून पुढे गेल्यास डाव्या हाताला एक आगळेवेगळे नारळाचे झाड आहे.त्या झाडाला दोन फांद्या आहेत आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागलेले असायचे परंतु २००७ च्या पावसाळ्यात त्यवर वीज पडून ते झाड मेले आहे.आणि आता फक्त तेथे Y आकार शिल्लक आहे त्याचा अशी माहिती मला 'रोहन'यांनीदिली.
तेथून पुढे गेल्यास शिवराजेश्वर मंदिर आहे.हे शिवाजीमहाराजांचे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे.आत शिवाजीमहाराजांची मूर्ती आहे.
दुर्गावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.दहिबाव,दुधबाव,साखरबाव अशी त्यांची नवे आहेत.कोल्हापूरच्या छत्रपतीकडे या दुर्गाचा ताबा आहे.काही काळ चाच्यांनी हा दुर्ग ताब्यात घेतला होता.इंग्रजांनी चाच्यांकडून हा दुर्ग जिंकून त्याचे नाव ठेवले 'फोर्ट ऑगस्टस'
सिंधुदुर्गाचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.त्याच्या तटबंदी चा परीघ ५-६ किलोमीटर तरी आहे.त्या तटबंदी वर जाण्यासाठी ४५ जिने बांधलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तटबंदीतच ४० शौचकुपे आहेत.इतक्या मोठ्या संखेने शौचकुपे असल्याचे इतर दुर्गात आढळत नाही.मळाचा कोणताही त्रास दुर्गात होत नाही.दुर्गाचे क्षेत्रफळ २० हेक्टर असावे.आत सुमारे अडीच-तीन हजार लोक दुर्ग लढवण्यास असताना स्वच्छतेची इतकी उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या त्या स्थापतीचे कौतुक करावयास हवे.
सिंधुदुर्गाची हि रचना अभ्यास करण्यासारखी आहे.सध्या दुर्गाला ४० ठिकाणी भगदाडे पडली आहेत.त्यातून सागराचे पाणी आत येते.इथे समुद्रात डॉल्फिन्स हि आहेत.सिंधुदुर्गाची वैशिष्ट्य पाहण्याची सहल अभ्यासपूर्णठरेल.
Enhanced by Zemanta

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०

बॅ. भास्करराव घोरपडे

हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध भवानी तलवार,कोहिनूर हिरा हिंदुस्तानला ब्रिटनकडून परत मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारे बॅ. भास्करराव घोरपडे वय ७२ यांचे अल्पशा आजाराने पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झाले.
गेली ३५ वर्ष ते लंडनमध्ये स्थायिक होते.प्रकृती अस्वास्थामुळे ६ महिन्यापूर्वी ते परत पुण्यात आले होते.सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
बॅ. घोरपडे यांचा जन्म तीन ऑक्‍टोबर १९३७ रोजी पुण्यात झाला. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथील शालेय शिक्षणानंतर कला शाखेची पदवी आणि अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए आणि लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात बीएस्सी पदवी त्यांनी संपादन केली. "इन्स ऑफ कोर्ट' या स्कूल ऑफ लॉ अँड लिंकोल्नस इन येथून त्यांनी "बॅरिस्टर'चा अभ्यासक्रम पूर्ण केला. "लॉर्ड जस्टिस हार्मन स्कॉलर' आणि "कपिला मेमोरिअल ऍवॉर्ड' या शिष्यवृत्त्यांचे ते मानकरी ठरले होते. इंग्लंड आणि वेल्स येथील न्यायालयात त्यांनी काम केले. "लंडन कोर्ट ऑफ आरबिट्रेशन'चे सदस्य, "रेस रिलेशन कमिटी ऑफ सिनेट'चे सदस्य, इंग्लंडमधील "इंडियन लॉयर्स असोसिएशन', "अभिनव महाराष्ट्र' या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तस्करीतून लंडनला गेलेल्या आणि तेथून भारतात परत आणलेल्या नटराजाच्या मूर्तीसाठी तमिळनाडू सरकारतर्फे बॅ. घोरपडे यांनी ब्रिटिश न्यायालयात दावा दाखल करून दाद मागितली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात आणण्यामध्ये घोरपडे यांना यश आले.

लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य असलेल्या लंडन येथील निवासस्थानी नीलफलक लावण्यासाठी बॅ. घोरपडे यांनी पुढाकार घेतला होता. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटीश सरकारने नाकारलेली 'बॅरीस्टर' पदवी मरणोत्तर मिळावी,यासाठी ब्रिटनमध्ये कायदेशीर लढा दिला.

अशा या लढवय्या आणि संस्कृतिप्रीय व्यक्तीस भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या मृतआत्म्यास शांती देवो.

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

शुभेच्छा मकरसंक्रांतीच्या !

परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणस असतात
केवढ मोठ भाग्य असत जेंव्हा ती आपली असतात.
मकरसंक्रांतीच्या सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा
तिळगूळ घ्या गोड गोड बोला ! :)

मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

'भारतमाता'ला वाचवायलाच हव !

मराठी अस्मितेचे प्रतिक आणि मराठी चित्रपटांचा एकमेव आधारस्तंभ असलेले 'भारतमाता' चित्रपटगृह केंद्र सरकार आता पाडण्यास निघाले आहे.
The ghost cinemaImage by phill.d via Flickr
मराठी चित्रपटांचे हक्काचे घर असलेले आणि गिरणगावाची शान असलेले 'भारतमाता' चित्रपटगृह खरच वाचवायला हव. यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ कलाकारांनी लढाही उभारला आहे.आणि त्याला साथ देत आहेत गिरणगावातील गिरणी कामगार.
खरतर भारतमाता एक पुरातन वस्तू म्हणून आपल्या सरकारने जतन करायला हवी परंतु येथे तर उलट न्याय मिळत आहे तेच मायबाप सरकार हि वस्तू जमीनदोस्त करायला पुढे सरसावले आहे.
'भारतमाता' हे मुंबईमधील सर्वात जुने चित्रपटगृह आहे आणि तेथे फक्त मराठी चित्रपटच दाखवले जातात.त्याचे नावही असे आहे की ते कोठेही अभिमानाने मिरवता येऊ शकते.या अशा गोष्टी आपल्या अस्मितेच्या खुणा आहेत आणि त्या आपण जपायला हव्यात.
आज शेकडोंच्या संखेने उत्कृष्ट मराठी चित्रपट तयार होत आहेत.नटरंग,दे धक्का ,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.हिंदी चित्रपटांच्या बाहूगर्दीत आपला चित्रपट प्रेक्षकांसमोर कसा जाईल अशी धास्ती आज मराठी सिनेनिर्मात्याना असते.त्यावेळी त्यांना फक्त 'भारतमाता'चा आधार असतो.मराठी चित्रपटांची परंपरा हि हिंदीपेक्षा कधीही वैभवशाली आहे आणि ती टिकवली पाहिजे.केवळ मराठी चित्रपट दाखवणारे चित्रपटगृह आता खूप कमी शिल्लक आहेत.पुण्यातील 'प्रभात' आणि मुंबईमधील 'भारतमाता' हि दोच चित्रपटगृहे फक्त मराठी चित्रपट प्रदर्शित करत असतात.आणि तीच उद्ध्वस्त होत असतील तर मराठी माणसाने पाहिचे कोणाकडे?
'भारतमाता' मराठी चित्रपटांचा श्वास आहे ती एक आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि तो ठेवा जपण्यासाठी सर्वांनी समोर आले पाहिजे.मग तो कोणत्याही पक्षाचा,जातीचा,धर्माचा 'मराठी' असूद्यात.
फक्त 'भारतमाता'ला वाचवायलाच हव !
Enhanced by Zemanta

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

डॉ. कोटणीस एक 'सच्चा मित्र'

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी चीनने पंडित नेहरूंना पत्र पाठवून वैद्यकीय मदत मागितली होती. सप्टेंबर १९३८ मध्ये डॉक्टरांचे पथक तिकडे रवाना झाले.त्यात डॉ.कोटणीस होते.त्यांनी चीनी सैन्याची मनोभावे सेवा केली.त्यामुळे कृतज्ञ चीनी जनतेने नुकतेच त्यांची 'सच्चा मित्र' म्हणून निवड केली.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारकही बांधण्यात आले आहे.
नुकताच चायना रेडियोने ६० व्या प्रजासत्ताक सोहळ्यानिम्मित चीनमध्ये उल्लेख्न्नीय कामगिरी करून चीनी जनतेला मदत करणाऱ्या गेल्या शतकातील १० आंतरराष्ट्रीय व्यक्तींची निवड करण्यात आली.त्यात आपल्या देशातील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा चीनचा 'सच्चा मित्र' म्हणून निवड झाली.
चायना रेडियोने घेतलेल्या पोलमध्ये ५६ लाख चीनी जनतेने भाग घेऊन आम्ही डॉ.कोटणी यांचे ऋणी आहोत,अशी पोलद्वारे भावना व्यक्त केली.
१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी नाईलाज म्हणून सामान्य चीनी जनता आणि सैनिक जपान्विरोधात लढत होते.त्यांची केविलवाणी अवस्था पाहून जर्मनीची युद्ध वार्ताहर अग्नेस स्मेडले हिने नेहरुंना पत्र पाठवून चीनी सैनिकांच्या लोकांच्या शुश्रुसेसाठी हिंदुस्तानी वैद्यकीय पथक पाठवण्याची विनंती केली होती.त्या विनंतीला मान देऊन डॉक्टरांचे एक पथक सप्टेंबर १९३८ रोजी चीनला पाठवले.त्या पथकात डॉ.कोटणीस होते.
डॉ.कोटणीस हे मूळचे सोलापूरचे.त्यांचे वडील एका गिरणीत साधे कारकून होते.त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला M B B S केले.त्याच्या शिक्षणासाठी आपण काढलेल्या कर्जाची फेड करून आपल्याला सुखाचे दिवस दाखवील,या आशेवर जगणाऱ्या वडिलांना जेंव्हा आपला मुलगा वैद्यकीय पथकाबरोबर चीनला गेल्याची बातमी कळली तेंव्हा त्यांनी वैतागून 'आत्महत्त्या'केली.
डॉ.कोटणीसाना हे वृत्त कळताच ते कमालीचे दुख्खी झाले,तरीसुद्धा त्यांनी घेतलेले कार्य तडीस नेले.कोटणीस ज्या फौजेबरोबर होते ती फौज लीन्चुई या ठिकाणी असताना १३ दिवसांची घनघोर लढाई झाली.तेथील मुख्य जबाबदारी डॉ.कोटणीस आणि डॉ.बसू यांच्यावर होती.त्या पथकातील काहीजन थंडी सहन झाल्याने मायदेशी परत आले होते.परंतु ते दोघे तेथून परतले नाहीत.१३ दिवसांच्या लढाईत त्यांनी हजारो चीनी सैनिकांवर उपचार केले.त्या काही अवघड शस्त्रक्रिया हि होत्या.औषधांचा अपुरा पुरवठा,खाण्याची आबाळ,जपानी बॉम्बचा वर्षाव अशा परिस्थित डॉ.कोटणीस आपली जबाबदारी निभावत होते.
याचदरम्यान त्यांनी कुओचींग लान या चीनी नर्सबरोबर लग्न केले.ते उत्तम चीनी बोलू लागले.जखमी सैनिकांच्या देखभालीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अतिश्रम,कुपोषण,दुषित हवामान यामुळे त्यांची तबियत खालावत गेली.त्यातून त्यांना फेफरे येऊ लगले.तरीही ते थोडे बरे वाटले कि रुग्णांची सेवा करत.खेड्यातील लोक्तर त्यांना देवदूत मानू लागले.
अखेर एका खेड्यात त्यांचा मृत्यू झाला.तो दिवस होता डिसेंबर १९४२.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारक असून आंतरराष्ट्रीय बंधुत्वाच्या भावनेचे प्रतिक असणार्या डॉ.कोटणीस यांच्या जीवनाची कथा व्ही.शांताराम यांनी अजरामर केली.त्यांनी काढलेला 'डॉ.कोटणीस कि अमरकहाणी' हा चित्रपट केवळ हिंदुस्तानात नव्हेतर जगभर गाजला आहे.
परंतु अशा एका 'सच्चा मित्र' असलेल्या माणसाचे स्मारक आपल्या देशात नसावे हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
(यातील माहिती काही वृत्तपत्रातून घेतली आहे)

रविवार, १० जानेवारी, २०१०

पुणेकरांचा आवडता 'सिंहगड'

SinhgadImage by trayser via Flickr
पुण्यानजीक असणारा आणि पुणेकरांचा आवडता सिंहगड प्राचीन दुर्ग आहे.इसवी सन १३५० मध्ये इसामीने लिहिलेल्या 'शाहनामा-ए-हिंद' अथवा 'फुतूह स्सलातीन' या ग्रंथात 'कुंधीयाना' म्हणून या दुर्गाचा उल्लेख आला आहे.इसवी सन १३२८ मध्ये मुहम्मद तुघलकाने एका कोळ्याकडून हा दुर्ग जिंकल्याचा उल्लेख त्या ग्रंथात आहे.पुरंदरच्या तहाच्या वेळेस शिवाजीमहाराजांनी जे २३ दुर्ग मुघलांना दिले,त्यात सिंहगड होता.पुढे तानाजी मालुसरे यांनी किल्ला घेण्यासाठी आपला बळी स्वराज्याच्या वेदीवर चढवला.त्यावेळेस राजे म्हणाले,'एक गड आला;पण माझा सिंह गेला'.
पुढे औरंगजेबाने हा दुर्ग जिंकल्यावर त्याचे नाव ठेवले 'बक्षिंदाबक्ष' म्हणजे बक्षीस देणारा जो त्याने दिलेले बक्षीस.इंग्रजांनी इसवी सन १८१८ मध्ये हा काबीज केला तेंव्हा त्याची सहा महिने लुट चालली होती.उन्हाळ्यात गडाची हवा उत्तम असल्याने तेथे राहण्यासाठी म्हणून इंग्रजांनी जवळजवळ ७० बंगले बांधल्याची एक जुनी नोंद आहे.
गडाला पुण्याकडील वाटेवर तीन दरवाजे आहेत,तर कल्याण गावाकडील वाटेवर दोन दरवाजे आहेत.पूर्वीचे टाके;पण इंग्रजी काळातील पागा,वाड्याची जोती,अमृतेश्वर आणि कोंढानेश्वराची मंदिरे,राजाराममहाराजांची आणि तानाजी मालुसरे यांच्या समाध्या अशा अनेक वस्तू पाहण्यासारख्या आहेत.
गडावर पाण्याच्या अनेक टाक्या आहेत.वनखात्याच्या नोंदीनुसार गडावर साडेतीनशे पाण्याच्या टाकी आहेत.एका टाकीबद्दल सांगायचे झाले तर,या टाकीचे नाव आहे.'देवटाके' देवटाके वरून लहान पण आत बरेच पसरत गेलेले आहे.सध्या सिंहगडावर पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे.सुमारे ४ लाख च्यावर पर्यटक दरवर्षी सिंहगडावर येतात.हे सर्व पर्यटक आणि गडावरची माणसे देवटाकीचे पाणी पिण्यास वापरतात.देवटाके सर्वांची तहान भागवते.आजवर ते कोरडे पडल्याची माहिती नाही.
देवटाकीचे पाण्याचे स्त्रोत आतून कसे आहेत,हे सांगणे अवघड आहे.एकाने पाच दहा खांबापुढे पोहत गेल्यावर पुढे अंधार असल्याने परत आल्याचे सांगितले आहे.डोंगराच्या पोटात कोठेतरी नक्की पाण्याचा प्रचंड साठा असल्याचे दिसते.पाण्याच्या साठ्याची हि जागा कोणी शोधली असावी????
Enhanced by Zemanta

बुधवार, ६ जानेवारी, २०१०

लोहगड ... चिरेबंदी वाट

लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड.
F1230014Image by Ankur P via Flickr
लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे.तुंग उर्फ कठीणगडहि येथेच आहे.अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.
लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत.नाना फडणीस यांनी बांधलेली एक विहीर गडावर आहे.नानांचा शिलालेखही त्या विहिरीवर आहे.१०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे.लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे.त्याला थोडी तटबंदी आहे.या माचीचे नाव आहे विंचूकाटा टोक.गडाच्या माचीच्या खाली दात जंगल आहे.
लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या वीसपुरावर मोठी सपाटी आहे.तशीच मोठी दगडी तटबंदी आहे.प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत.ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.
लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट.अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते.लोहगडवाडी पार केली कि हि सर्पाकार वाट सुरु होते.एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला कि मग तो माणूस वर येईस्तो पहारेकर्यांच्या नजरेआड जात नाही.तो व्यवस्थित हेरला जातो.वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत.त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवली जाते.वाटेवर गणेश दरवाजा,दुसरा नारायण,तसरा हनुमान,आणि चौथा महादरवाजा,असे चार दरवाजे आहेत.हनुमान दरवाजा जुना आहे.इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतले आहेत.दुसर्या आणि तिसरया दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत.
लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे.गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो.कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम विचार करावयास लावते.सध्या नवीन इमारती पडतात,मग हे असे बांधकाम अडीचशे तीनशे वर्ष कशामुळे टिकले याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहतनाही.
Enhanced by Zemanta

मंगळवार, ५ जानेवारी, २०१०

आजची स्वार्थी पत्रकारिता

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शिवसेनाप्रमुखांचा राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा योग साधून 'मातोश्री' निवासस्थानी गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'मराठी बाण्याची पत्रकारिता जगवा' असे आवाहन केले.मराठी बाण्याची म्हणजे लोकमान्य टिळक,केळकर,गोपाल गणेश आगरकर,परांजपे,बाळशास्त्री जांभेकर यांनी लेखणीच्या ताकदीवर लोकहिताचा जो वारसा चालवला,तो सध्याच्या पत्रकारांनी पुढे न्यावा असे त्यांना म्हणायचे होते.

A few popular Marathi newspapersImage via Wikipedia


आज ती जुनी पत्रकारिता खरच शिल्लक राहिली नाही . आजची पत्रकारिता तर मला ढोंगी वाटते यात काही अपवाद हि असू शकतात परंतु स्वताला पुरोगामी सेक्युलर समजणारे आजचे पत्रकार स्वतः मात्र स्वार्थीपणाने वागताना दिसतात.
शाहू-फुले-आंबेडकर यांचे समतेचे तत्त्वज्ञान दुसर्यांना उगळून उगळून पाजणारे आजचे पत्रकार स्वतःच समतेच्या तत्त्वज्ञानवर बोळा फिरवताना दिसले पण कोण्याचा ते लक्षात आले नाही.

काही दिवसापूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पत्रकारांनी कामकाजावर बहिष्कार घालण्याची धमकी देऊन दडपण आणले होते.विरोधी पक्षांनीहि त्याला समर्थन देऊन पत्रकारांवरील हल्ल्यांना पायबंद घालण्याची मागणी केली.शेवटी मुख्यमंत्र्यांनी धरण्याला सामोरे जाऊन पत्रकार सुरक्षेसाठी नवा कायदा करायचे आश्वासन दिले.
पत्रकारांवरील हल्ल्याला 'नाजामीन' गुन्हा ठरवण्याचा त्यात आग्रह होता.अविष्कार स्वातंत्र्य,लेखन स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य असली लेबले लावून हा विशिष्ठ वर्ग काय मागणी करत आहे याचा विचार न राज्यकर्त्यांनी केला न विरोधकांनी केला. राजकारणी हे सत्ता व प्रसिद्धीचे लाचार असतात असे समजले तरी दुसर्यांना समतेचे डोस देणार्यांना स्वताचे समतेचे तत्त्वज्ञान लक्षात राहिले नाही का ?


शाहू-फुले-आंबेडकर या समाजसुधारकांनी समता या शब्दासाठी किंवा त्याचे थोतांड माजवण्यासाठी संघर्ष केला नव्हता.समाजातील विषमता संपवायला आणि त्यातून खर्या अर्थाने समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वेचले होते.कायदा,न्याय,जीवन,संधी,सुविधा अशा सर्व बाबतीत समान वागणूक असाच समतेचा अर्थ नाही का ? प्रतिष्ठाना एक आणि बाकीच्यांना दुसरा न्याय असा त्यांच्या समतेचा अर्थ नाह्वता.
त्यांच्या काळात असेच होते आणि तीच विषमता मोडून काढण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले ना ?

मग आजचे पत्रकार व प्रतिष्ठीत बुद्धिवंत काय मागत आहेत ? पत्रकारांवर हल्ला झाल्यास नाजामीनपात्र गुन्हा याचा अर्थ समजातल्या पत्रकार नाहीत त्यांच्यावर हल्ला झाल्यास जामीनपात्र गुन्हा असाच ना ?
खास पत्रकारांना,कलावंत,लेखकांना,नाटककारांना,बुद्धिमंत प्रतिष्ठाना वेगळी वागणूक व इतर सामान्य लोकांना पक्षपाती वागणुकीची मागणी समतेच्या तत्त्वज्ञानला सुरुंग लावणारी नाही का?
इतरांना कुणीही कसेही मारावे,त्याला किंमत नाही.पत्रकाराला हात लागला;मग ब्रम्हहत्त्या होते हे असेच ना ?
आश्चर्य आहे ना पुरोगामी महाराष्ट्राची,फुले-आंबेडकरांच्या समतेची जपमाळ ओढणारे सेक्युलर पत्रकार,संपादकच आपल्यासाठी वेगळ्या तरतुदीची मागणी करत आहेत.आणि तसेची निवडणुकीत समतेची जपमाळ ओढणारे राजकारणी त्याला पाठींबा देत आहेत.आणि अशावेळी बाकी आंबेडकरवादी,फुलेवादी चळवळीचे म्होरके समतेचा जागर करणारे कोठे गेले आहेत? त्यांना हि विषमता दिसत नाही का ?

पत्रकार हा कोणी आभाळातून पडलेला प्रेषित नाही.पत्रकार हे हि याच समाजाचे एक घटक आहेत.पत्रकारिता म्हणजे फार मोठे उदात्त कार्य असल्याचा आव आणण्यात अर्थ नाही.
वैद्यकीय,वकिली,व्यापार,विविध सेवा याप्रमाणेच पत्रकारिता हा एक समाजोपयोगी पेशा आहे.बाकीच्यासारखाच पत्रकार हा पोटापाण्यासाठी बौद्धिक कष्ट घेणारा कर्मचारी वर्ग आहे.
पायलटला अपघाताची,पोहणाऱ्याला बुडण्याची,पोलिसांना संतप्त जमावाच्या प्रतिक्रियेची भीती असते. त्याला( proffesional Hazard ) व्यावसायिक धोका म्हणतात.त्याप्रमाणेच पत्रकाराला,कलावंताला लोकांच्या नाराजीपासून धोका असू शकतो. पण हे कधी ?
चुकीचे उपचार झाल्यावर डॉक्टर किंवा बेफाम वाहन चालवल्यावर चालक रागाची शिकार होण्याचा धोका असणारच ना.
पत्रकारांनीही ती मानसिक तयारी करून या व्यवसायात उतरावे . जसा चांगला चालक,डॉक्टर लोकांच्या आदराचे स्थान बनतो तसा एक पत्रकारही आदराचे स्थान बनू शकतोच ना ?
पत्रकाराने कृतीतून समाजउपयोगी,लोकहिताची कामे केली तर ते लोकांसाठी श्रद्धास्थान बनतात.अशी अनेक उदाहरणे आपणास पाहण्यास मिळतील. फुले,टिळक,आगरकर यांच्यापासून अत्रे ,खाडिलकर अशी कितीतरी उदाहरणे पाहता येतील.
यांच्यापैकी किती जणांनी कायद्याचे संरक्षण मागितले होते ?मग आताच हि वेळ का आली ?आम्ही सामान्य लोकांपेक्षा वेगळे आहोत आम्हाला सामान्य लोकांसारखे कायदे नकोत असेच यांना सांगायचे आहे का?
गडगंज पगाराची नोकरी,ऐषआरामात जगत आजचे पत्रकार आपण समजाउपयोगी काम करत आहोत असा आव आणत आहेत हे ढोंग नाही का ? आपण आणि आपला पेशा फक्त पवित्र बाकी सगळे क्षुद्र असे यांना यातून भासवायचे आहे.
वागळे आणि त्याच्यासारख्या पत्रकारांकडे पाहिल्यावर काय दिसून येते. ते दुसर्याच्या इशार्यांवर नाचतात,चालतात,बोलतात आणि प्रतीव्रतेचा आव आणतात. यांना खरी पत्रकारिता कळली कि नाही कि असा प्रश्न पडतो.
असो आपणा सर्वाना पुन्हा तीच जुनी निर्भीड आणि समाजउपयोगी पत्रकारिता पाहण्यास मिळो.

जय महाराष्ट्र!


Reblog this post [with Zemanta]

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

पन्हाळगड... वैशिष्ट्यांनी परिपूर्ण

कोल्हापूरजवळचा पन्हाळगड हा अतिशय देखणा दुर्ग आहे.शिलाहार राजा दुसरा भोज याने पन्हाळगडाची बांधणी केली. बहमनी,आदिलशाही,मराठी,मुघल अशी त्याच्यावर सत्तांतरे झाली.त्यामुळे गडावर त्यांच्या शैलीतील वस्तू आहेत.शिवाजीमहाराज ज्यावेळी पहिल्यांदा पन्हाळगडावर गेले,त्यावेळी पलिते पेटवून रात्रभर तो दुर्ग पुन्हा पुन्हा पाहत होते.तीन दरवाजा,वाघ दरवाजा,इंग्रजांनी पाडलेला चार दरवाजा असे भव्य दरवाजे,अंधारबाव,सज्जाकोठी,पुसाटीचा बुरुज,बालेकिल्ला,अंबरखाने अशी कित्येक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
Baji Prabhu Deshpande Statue in Panhala FortImage by Ankur P via Flickr
सिद्दी जोहरच्या वेढ्यातून तेथूनच शिवप्रभू निघाले आणि विशालगडावर सुखरूप पोहचले.तीन दरवाजांचा द्वारसमूह अगदी आवर्जून पाहण्यासारखा आहे.पन्न्गालय,पद्मणाल,प्रणालक,पद्मालय अशी पन्हाळ्याची अनेक नावे प्रचिलित होती.
पन्हाळ्याशेजारचा डोंगरही बांधून काढला आहे.त्या दुर्गाचे नाव आहे 'पवनगड'.हा पन्हाळ्याचा उपदुर्ग आहे.पन्हाळ्यावर पाण्याची उत्तम व्यवस्था आहे.सोमालय नावाचा तलाव राजा भोजानेच बांधला आहे.त्याच्या काठावर असलेल्या सोमेश्वरला शिवाजीमहाराजांनी राजा शिलादार दुसरया भोजानेच लावलेल्या पांढरया चाफ्याच्या एक लक्ष फुलांचा अभिषेक केला होता.
ई.स.१६७३ मध्ये कोंडाजी फर्जदाने केवळ ६० माणसे दुर्गात उतरवून,शिंगे फुंकून,बाणांनी आदिलशाही माणसे टिपत पन्हाळगड काबीज केला.तो पन्हाळ्याच्या मोहिमेवर जाण्याच्या आधीच शिवाजीमहाराजांनी कोंडाजीच्या हातात सोन्याची कडी घातली होती.
पन्हाळ्याच्या बालेकील्ल्यालाही छोटासा खंदक क्वचितच आढळतात;पण पन्हाळगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अंबारखाने म्हणजेच धन्य साठवण्याची कोठारे.पन्हाळ्यावर अशी तीन बुलुंद कोठारे आहेत.काही लाख टन धान्य त्यात सहज आमवू शकेल.गंगाकोठी,यामुनाकोठी आणि सरस्वती अशी त्यांची नावे आहेत.
'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' नावाच्या एका शिवकालीन काव्यात या कोठारांची वर्णने आली आहेत.आजही ती कोठारे आपली भव्यता जपत उभी आहेत.त्यात गेले कि,त्यांच्या अवाढव्यतेची कल्पना येऊ लागते.इतर अनेक गडांवरच्या इमारती काळाच्या ओघात नष्ट झाल्या असतानाच पन्हाळगडावरची हि भव्य कोठारे कशी काय आपली अवस्था टिकवून आहेत,हे पाहिल्यावर आश्चर्य वाटावयास लागते.
Enhanced by Zemanta