गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

शिक्षण देता - घेता

अमेरिकेत पूर्वप्राथमिक शिक्षणात मुलाला स्वावलंबी बनविण्याकडे अधिक कल दिसून येतो. याच टप्प्यावर सामाजिकदृष्टय़ा ‘श्रमप्रतिष्ठा’ हे महत्त्वाचं मूल्य मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर संवादकौशल्य, वाचनकौशल्याकडे खास लक्ष पुरविताना प्रयोगशील शिक्षणावर अधिक भर दिला जातो.
‘पोळी-भाजी हे हेल्दी फूड आहे, का जंक फूड?’ असा प्रश्न माझ्या छोटय़ा मुलाने विचारला, तेव्हा मी स्वत:च क्षणभर थांबले. याला या वयात हा प्रश्न पडला, तो मला का नाही पडला कधी? बहुधा मला या संकल्पनाच माहीत नव्हत्या. आणि माझ्यासमोर पिझ्झा, बर्गर न येता थालीपीठ, घावन, उपमा हे आरोग्यदायी पर्याय आले. अमेरिकेतील वास्तव्यात ही गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, या छोटय़ा मुलांना निवडीला खूप
वाव आहे. ‘निर्णयक्षमता’ यायला हवी. सुदैवाने या दृष्टीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जाताना दिसले. वेळोवेळी जाणवलेलं वेगळेपण आपल्या माणसांशी वाटून घ्यावंसं वाटलं.
शिक्षण अर्थात औपचारिक शिक्षण सुरू करताना मुलांचं वय लक्षात घेणं आवश्यक ठरतं. मुंबईसारख्या उपनगरात ते अडीच ते साडेतीन वर्षांवर येऊन ठेपलं आहे. इथे मात्र पुष्कळशा शहरात पाच वर्षे पूर्ण झाल्याशिवाय पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळत नाही. सहा पूर्ण झाल्यावर पहिलीला प्रवेश मिळतो. तत्पूर्वी आपल्याला उत्साह असेल तर प्री-स्कूलला घालावे किंवा डे-केअरमध्ये ठेवावे.
मुलगा शाळेत गेला नाही, तरी आपण घरी शिकवू शकतो. मदतीला माहिती तंत्रज्ञान आहे, त्यावरील अनेक वेबसाइट्स उपयुक्त आहेत. शिवाय अमेरिकेतील शिक्षण विभागाची pbskids नावाची वाहिनी दूरदर्शनवर दाखवली जाते आणि त्यांची वेबसाइटही आहे. भाषण, संभाषण, वाचन आणि थोडेफार लेखन, शास्त्रीय तत्त्वांशी ओळख, अंकांची ओळख अशी अनेक उद्दिष्टे याद्वारे साधली जातात. कार्टून्स, अॅनिमेशन, पपेट्स अशा तंत्रांचा वापर त्यासाठी केला जातो. पुस्तकातून वा पालकांकडून जाणून जो परिणाम साधणे अवघड ते या कार्टून्सद्वारे प्रभावीपणे साधले जाते. आपली लाडकी कार्टून कॅरेक्टर्स आपल्या आपण कपडे घालून तयार होताना, आपले आपण दात घासताना पाहून बच्चे कंपनीला सगळे करून पाहावेसे वाटते. मुलांना थोडा वेळ देऊन त्यांचे त्यांना करू दिले तर ही कौशल्ये सहज अवगत होतात. सँडविचवर काकडी, टोमॅटो लावून आपले आपण खाताना त्यांना मोठे काहीतरी साध्य केल्यासारखे वाटते. स्वत: करता आल्याचा त्यांना झालेला आनंद वेगळाच असतो. त्यांची स्वत:बद्दलची प्रतिमा उंचावत असते.
स्वत:चे कपडे घडी करून ठेवणं, हाताने ब्रेकफास्ट करणं, जेवणं या गोष्टी मुलांनी स्वत: केल्या, तर त्या प्रयत्नांत ते रमून जातात. भविष्यात नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने एकटे राहावे लागले तर स्वावलंबी असणं जमेची बाजू ठरते. इथे अनेक कुटुंबांत दोनपेक्षा अधिक मुले असतात. यंत्रांच्या साहाय्याने का होईना, धुणीभांडी घरी करायची तर प्रत्येकाने थोडा हातभार लावायला हवा, कोणतेही काम करण्याची लाज वाटता कामा नये. इथे सामाजिकदृष्टय़ा ‘श्रमप्रतिष्ठा’ हे महत्त्वाचे मूल्य आहे. त्याची रुजवणूक करण्याचा प्रयत्न होतो. हे काम स्त्रीचे आणि हे पुरुषाचे हा लिंगसापेक्ष विचार इथे निर्माण केला जात नाही.
मुलांना शाळेत, पुस्तकांद्वारे, टी.व्ही. चॅनेल्सद्वारे अनेक व्यवसायांची ओळख करून दिली जाते. शाळेला दातांचे डॉक्टर, अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस अशा व्यक्ती भेट देतात. त्या निमित्ताने ही मंडळी कोणते काम करतात, ते कळते. अग्निशमन दलाचा जवान मुलांना हीरो वाटतो. फायर अलार्म वाजायला लागला तर काय करायचे, धूर दिसला तर काय करायचे, ही माहितीही मुलांना मिळते. रस्त्यावरील रहदारीचे नियम पोलिसमामांकडून कळतात. मग ही बच्चेकंपनी गाडीतून जाताना आईवडिलांनाच सूचना द्यायला लागतात. रेड लाइट- स्टॉप, ग्रीन लाइट- गो, यलो लाइट- स्लो डाऊन. रस्ता क्रॉस करताना पुढे पाहायचे वगैरे गोष्टी मुलांना पटकन पाठ होते. दाताची डॉक्टर मोठय़ा डायनासॉरला एक मोठा ब्रश घेऊन दातांची काळजी कशी घ्यायची, ते दाखविते. मग एक एक टूथब्रश भेट देते. घरी आल्यावर मुले त्यांच्या टेडी बेअरवर प्रयोग करतात, मग स्वत:वर.
शाळा, प्रसारमाध्यमं, पुस्तकं यातून मुलांनी महत्त्वाच्या गोष्टींची तोंडओळख होते. ती परिणामकारकही असते, मात्र पालकांचे काम त्यानंतर सुरू होते. मुलांना उत्तेजन देऊन वेगवेगळ्या गोष्टी करून घेणं, आवश्यक तेवढा वेळ देणं, प्रयत्न करू देणं, खूप संयम ठेवणं हा भागही तितकाच अवघड आहे. एकदा एक छोटी मुलगी आंघोळीच्या टबमध्ये पाणी साठवून त्यात वेगवेगळी खेळणी, बॉल, स्पंज टाकत होती. तिच्या आईची ‘हा काय खेळ चालला आहे,’ अशी रागाची प्रतिक्रिया होती. ती मुलगी मात्र वेगवेगळ्या वस्तू पाण्यात टाकून हलक्या कोणत्या, जड कोणत्या हे पडताळून पाहत होती. ती तिचे प्रयोग करत होती. कदाचित वाचून, पाठ करून ज्या गोष्टी तिला अल्पावधीसाठी लक्षात राहिल्या असत्या, त्या तिने प्रत्यक्ष केल्याने कायमच्या नोंदल्या गेल्या.
अक्षरओळख करण्याबाबत एक वेगळा प्रयोग केला गेला. महिन्यातून एकदा मुलांना तीन अक्षरे लिहिलेली एक छोटी पिशवी शाळेतून दिली जाते. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू झाली की, Aa, Bb, Cc ची पिशवी मिळणार. मग महिनाभर त्या आद्याक्षराने सुरू होणाऱ्या वस्तू, चित्रं गोळा करून पिशवीत भरायच्या आणि महिन्याच्या शेवटी घेऊन जायच्या. त्या दिवशी अशा खूप वस्तू वर्गात एकत्र येतात. त्याद्वारे ते आद्याक्षर शिकवायचे. सुरुवातीला मुलांना घरच्यांची मदत लागते. नंतर ती पिशवी मिळाली की, लगेचच मुले खेळण्यातल्या वस्तू, चित्रे त्यात भरून ठेवतात. मग 'र' साठी मी खेळण्यातला स्टेथास्कोप, स्टेगॅसॉरस (एक प्रकारचा डायनासॉर) नेणार असे विचार सुरू होतात. जे नाही मिळणार, त्याची चित्रं काढायला, रंगवायलाही या छोटय़ा कंपनीला उत्साह असतो. शाळेत लिहिण्याची जबरदस्ती नाही. फक्त आपले नाव लिहिता यायला हवे की बास्स!
भाषणकौशल्य विकसित करण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ‘शो अॅण्ड टेल’. प्रत्येक मुलाने स्वत:चे एक खेळणे आणायचे. मग तो छोटा स्पायडरमॅन असेल किंवा एखादी गाडी आणि सगळ्या वर्गाला ते खेळणे दाखवून त्याबद्दल माहिती द्यायची. शाळेच्या वर्गात खेळणी न्यायला आणि आपल्या मित्रांना दाखवायला, त्याबद्दल सांगायला कोणाला नाही आवडणार? शाळा सुरू होताना मुलांना बोलकं करायला, शाळेतल्या वातावरणात सहज समायोजित व्हायला अशा गोष्टींची खूप मदत होते.
वाचनकौशल्याचा विकास होण्यासाठीही आखीव प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर केले जातात. इथल्या प्रत्येक शाळेत प्रवेश केल्यावर मुलाला वाचता येणं ही फार नंतरची पायरी आहे. त्यानं चित्रं पाहिली तरी चालेल, पण त्यांना पुस्तकं पाहू द्या, असं सांगितलं जातं. ‘रोज मुलांबरोबर बसून १५ मिनिटे तरी वाचा’, अशा सूचना टी.व्ही.वरचे लहान मुलांचे चॅनेल्स दिवसातून दहा वेळा देतात आणि सरकारनेही सगळीकडे मोफत गं्रथालयं उघडली आहेत. मुलांसाठी बोर्ड बुक्स असतात. त्यावर क्रेऑन्सने लिहिलं तर पुसता येतं. ती फाडायला पुष्कळ ताकद लागते. चुकून पाणी सांडलं तरी हरकत नाही. सुरुवातीला फक्त रंगीत चित्रं आणि एखादा शब्द, मग हळूहळू वर्णन वाढतं, चित्र छोटं होतं अशी ही पुस्तकं! आता मुंबईतही काही बडय़ा पुस्तकांच्या दुकानात ही पुस्तके मिळतात. मात्र त्यांची किंमत नेहमीच परवडण्याजोगी असते, असं नाही. अमेरिकेतील पब्लिक लायब्ररीत ही पुस्तके विनामूल्य पाहायला, घरी न्यायला मिळतात हे कळल्यावर खूश व्हायला होतं. छोटय़ा मुलांना स्वत:च्या नावाचं लायब्ररी कार्ड मिळतं आणि कार्ड घेताना भेट म्हणून एक पुस्तकही! भेट मिळाल्यावर नुसतं खेळायला आवडणारी मुलंही दुसऱ्यांदा ग्रंथालयात उत्साहाने येतात. स्वत:साठी पुस्तके शोधतात आणि आपल्या कार्डवर घेतले म्हणून ते जपतातही. पुस्तकाला जपायचं असतं,असे संस्कार त्यांच्यावर आपोआप होतात.
अंक, चलनी नोटा यांची ओळख करून देण्यासाठी मोनॉपॉली (व्यापार डाव)सारखे खेळ उपलब्ध आहेत. शाळेतही खोटय़ा खोटय़ा चलनी नोटा तयार करून ‘फन फेअर’सारखा ‘मेन स्ट्रीट’ सजवला जातो. निसर्गाच्या जवळ जाण्याचा आनंद म्हणून मुले अॅपल, स्ट्रॉबेरी पिकिंगला जातात. एखाद्या बागेत मुलांना न्यायचे, तिथे खाऊ शकेल तितकी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, सफरचंदे खा. झाडावरून तोडून फळं खायची मजा औरच! बरोबर मित्रमंडळी असली तर अजूनच छान! घरी जाताना त्यांना छोटे पॅकिंग भेट म्हणून मिळते. स्नो फॉल असेल तेव्हा त्या बर्फाचे गोळे करून स्नो मॅन करायचा, त्याला नाक म्हणून गाजर लावायचे. कुणाला नाही आवडणार शाळेत जायला?
भारतातील सृजन आनंद विद्यालयासारख्या अनेक शाळा आपापल्या परीने नवनवे प्रयत्न करीत असतात. अनेक शिक्षिका आपल्या वर्गापुरते प्रयोग करून पाहत असतात. कदाचित हे अनुभव त्यांना साहाय्यक ठरतील.
श्रेया महाजन

1 टिप्पणी:

  1. bhaiyya,

    Blog changala ahe, asach lihit ja ani mala invite karat ja vachanya saathi.....!!!!
    Mast bolgs ahet...!!!

    उत्तर द्याहटवा