गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

फॉरेक्‍स ट्रेडिंग

जागतिक मंदीने आज जवळपास सर्वच उद्योग-व्यवसाय अडचणीत आले असून, बाजारातील उलाढाल मंदावल्याचे चित्र आहे. उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार मंडळी सर्वच जण मंदीमुळे हवालदिल झाले आहेत. शेअर बाजार दोलायमान स्थितीत आहे. अशा काळात एक व्यवसाय मात्र वेगाने विस्तारत आहे आणि तो म्हणजे "ऑनलाइन फॉरेक्‍स ट्रेडिंग' अर्थात परकी चलनाचा व्यवहार!


जगभरातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना आज मजबूत चलनामध्ये व कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित वाटत आहे. डॉलर व्यतिरिक्त पौंड, युरो, येन अशा अनेक चलनांमध्ये व सोने, चांदी, कच्चे तेल अशा कमोडिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
आपला देशामध्ये मात्र "फॉरेक्‍स ट्रेडिंग' या व्यवसायाबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. या लेखामधून आपण "फॉरेक्‍स ट्रेडिंग' हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करू या.
फॉरेक्‍स ट्रेडिंग म्हणजे काय?
"फॉरेन एक्‍स्चेंज' या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजे "फॉरेक्‍स' होय. "फॉरेक्‍स ट्रेड'ला "करन्सी ट्रेड' अथवा परकी चलनाचा व्यापार असेही म्हणतात. पूर्णतः ऑनलाइन स्वरूपाचा हा व्यापार २४ तास अविरतपणे जगभर सुरू असतो. जगभरातील विविध बॅंका, गुंतवणूकदार, मार्केटमेकर हे एका चलनाच्या बदल्यात दुसरे एखादे चलन घेतात अथवा विकतात व किमतीमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चढउतारांतून चांगला नफा कमावत असतात. यामध्ये "स्पॉट ट्रेड' व "फ्युचर ट्रेड' अशा दोन पद्धतीने कामकाज चालते. स्पॉट व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त काम होते.
"फॉरेक्‍स'कडे कल का वाढत आहे?
"फॉरेक्‍स मार्केट'ची कार्यपद्धती थोड्याफार प्रमाणात शेअर बाजाराप्रमाणेच असते. "फॉरेक्‍स मार्केट'ची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१) परकी चलनाच्या भावात व त्यातल्या त्यात डॉलर, युरो, येन, पौंड यासारख्या प्रमुख चलनांच्या दरांमध्ये (शेअर बाजाराप्रमाणे) अचानक मोठे चढउतार होत नाहीत. ठराविक अशा एका पातळीतच व्यवहार घडत असतात. त्यामुळे यात तुलनात्मकदृष्ट्या धोका कमी असतो.
२) चोवीस तास चालणारे मार्केट असल्याने आपल्या सवडीनुसार केव्हाही काम करणे शक्‍य आहे. त्यातल्या त्यात भारतीय वेळेनुसार सायंकाळी चार-पाच वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत व्यवहार करणे जास्त चांगले ठरते.
३) "मार्जिन'च्या सोयीमुळे मोठी गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता नसते. केवळ एक टक्का "मार्जिन'वर (अर्थात १०० पट लिव्हरेजिंग) काम सुरू असते. अगदी पन्नास हजार अथवा लाखभर रुपयांच्या भांडवलावर काम सुरू करता येते व आपल्या गुंतवणुकीच्या अनेक पट नफा कमविणे शक्‍य होते. (मार्जिन ट्रेडिंगमुळे नुकसानीचे प्रमाणही मोठे असू शकते, हे समजावून घेणेसुद्धा आवश्‍यक आहे. "स्टॉपलॉस'चा योग्य वापर केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.)
४) "शॉर्ट सेलिंग'च्या सोयीमुळे दर घसरत असतानाही नफा कमविणे शक्‍य होते.
५) फॉरेक्‍ससोबतच त्याच खात्यामधून सोने-चांदीसारख्या कमोडिटीजच्या आंतरराष्ट्रीय बाजारात काम करणेसुद्धा शक्‍य होते.
६) बाजाराचे स्वरूप व आवाका लक्षात घेता चलनाचे भाव "मॅनिप्युलेट' करणे अथवा काही गडबड-घोटाळा करणे शक्‍य नसते. त्यामुळे चढ-उतारांचे आडाखे बांधताना टेक्‍निकल ऍनालिसिससारखे शास्त्र प्रभावीपणे काम करताना दिसते.
"फॉरेक्‍स'चे व्यवहार कोठे घडतात ?
"ओटीसी' म्हणजे "ओव्हर द काउंटर' स्वरूपात "स्पॉट फॉरेक्‍स'चे व्यवहार होत असतात. अर्थात, कोणत्याही एखाद्या एक्‍स्चेंजवर हे व्यवहार होत नसतात, तर जगभरातील अनेक बॅंका; तसेच गुंतवणूकदार, मार्केटमेकर किंवा ब्रोकरच्या माध्यमातून इंटरनेटवरून एकमेकांशी हे व्यवहार होत असतात. "फॉरेक्‍स फ्युचर्स'चा व्यापार मात्र मुख्यतः न्यूयॉर्क एक्‍स्चेंज माध्यमातून होत असतो. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस कमिशन (आयएफएससी), फायनान्शियल सर्व्हिसेस ऍथॉरिटी (एफएसए)सारख्या आंतरराष्ट्रीय नियामक संस्था "फॉरेक्‍स'च्या सर्व व्यवहारांचे नियमन करीत असतात. भारतात सेबी व रिझर्व्ह बॅंक हे काम करतात.
आता फॉरेक्‍स व कमोडिटी मार्केटमधील व्यवहारांचे प्रत्येकी एक उदाहरण पाहू.
या ठिकाणी आपण फॉरेक्‍स ऐवजी प्रथम कमोडिटी बाजारातील (सोन्याचे) उदाहरण घेऊ जेणेकरून नवख्या लोकांना समजण्यास सोपे जाईल.
समजा, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव एका ट्रॉय औन्ससाठी ९१० डॉलर इतका आहे. लॉट साईजनुसार किमान १०० ट्रॉय औन्स घ्यावे लागतात. म्हणजे ९१ हजार डॉलर एवढे एका लॉटचे मूल्य होते. त्यासाठी फक्त एक हजार डॉलर किंवा अंदाजे ५० हजार रुपये एवढे मार्जिन भरावे लागते.
समजा, राजेशकुमार नावाच्या एका व्यापाऱ्यास असे वाटते, की सोन्याचा भाव आज वर जाण्याची शक्‍यता आहे. राजेशकुमार अर्थातच मग सोन्याचा एक लॉट खरेदी करतो. आता सोन्याच्या भावात एका डॉलरची वध-घट झाल्यास राजेशकुमारला संपूर्ण लॉटमागे १०० डॉलरचा नफा अथवा तोटा होईल. (कारण भाव ९१० वरून ९११ झाल्यास लॉटचे मूल्य ९१ हजार वरून ९१,१०० डॉलर होते.) सोन्याच्या भावात दिवसभरात साधारणतः पंधरा-वीस डॉलरचा चढ-उतार होत असतो. त्यामध्ये एक-दोन डॉलरच्या हालचालीचादेखील व्यवस्थितपणे लाभ (एनकॅश) उठविता आला, तरी शंभर-दोनशे डॉलर म्हणजेच पाच ते दहा हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीच्या तुलनेत हा फायदा फारच मोठा आहे.
आता फॉरेक्‍स ट्रेडिंगमधील एक व्यवहार बघू.
समजा युरो-डॉलर या "करन्सी पेअर'चा १.३२१२ असा दर आहे. अर्थात एक युरो खरेदी करण्यासाठी १.३२१२ डॉलर लागतात, असा त्याचा अर्थ होतो. यातील शेवटच्या अपूर्णांकास एक पिप असे म्हणतात. म्हणजे ०.०००१ = १ पिप
समजा, राजेशकुमार नावाच्या व्यापाऱ्यास असे वाटते, की युरोचा भाव डॉलरच्या तुलनेत आज वर जाण्याची शक्‍यता आहे. राजेशकुमार अर्थातच युरोचा एक लॉट खरेदी करतो. एक लॉट म्हणजे १ लाख करन्सी युनिट्‌स. त्यासाठी त्याला मार्जिन भरावे लागते फक्त एक हजार डॉलर (म्हणजे १०० पट लिव्हरेजिंग किंवा एक टक्का मार्जिन).
आता युरोचा भाव एक पिपने वाढला म्हणजे १.३२१२ वरून १.३२१३ झाला, तर राजेशकुमारला १० डॉलरचा नफा होईल. १० पिपने वाढला (अथवा घटला) तर १०० डॉलरचा नफा (अथवा तोटा) होईल. दिवसभरात सामान्यतः शंभर-एक पिपची हालचाल सहज होताना दिसते.
अवघ्या पन्नास हजार रुपयांत सुरवात करता येणारा हा व्यवसाय सुज्ञपणे व अभ्यासपूर्ण पद्धतीने केल्यास चांगली कमाई करून देऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे सवडीप्रमाणे व सोयीप्रमाणे दिवसभरात कोणत्याही वेळी काम करता येते. बेरोजगार तरुण असो, सेवानिवृत्त नागरिक असो अथवा अर्धवेळ व्यवसाय करू इच्छिणारे व्यावसायिक, उद्योजक वा गृहिणी असो, मध्यमवर्गीय असो वा उच्चभ्रू सर्वांना करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे.
केवळ एक संगणक अथवा विंडोज एनेबल्ड मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्‍शनची गरज यासाठी भासते. योग्य ब्रोकरची निवड करणे हेही यामध्ये महत्त्वाचे ठरते. मागणी-पुरवठा विश्‍लेषणाचे ज्ञान व थोडीशी समयसूचकता, सतर्कता यांचा योग्य ताळमेळ साधल्यास "फॉरेक्‍स ट्रेडिंग' हा अतिशय चांगला व्यवसाय ठरू शकतो.
- नितीन देशमुख, नाशिक
(
सकाळ वृत्तसेवा)

1 टिप्पणी: