डॉ. अनिल काकोडकर -अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
जडणघडणीच्या वयात मुलांवर सर्वाधिक प्रभाव असतो तो त्यांच्या घरच्यांचा- आई-वडील, आजी-आजोबा यांचा आणि अर्थातच शिक्षकांचा. शिक्षक म्हणजे घर आणि समाज यातील दुवा. व्यक्तीच्या मूल्यांची आणि विचारांची बैठक तयार होण्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो.
माध्यमिक शाळेत असताना मला गणिताला एक शिक्षक होते. त्यांचं नावच मुळी बुद्धिवंत. हे बुद्धिवंत सर खुर्चीत बसून गप्पा मारीत गणित शिकवायचे. संवाद साधत साधत गणिताचा तर्क समजावायचे. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ते गणित कधी सोडवून व्हायचं, ते समजायचंदेखील नाही. अंकगणित सोडविताना बीजगणिताची पद्धत वापरणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते साध्या, सोप्या रीतीने अंकगणित शिकवत. त्यांनी मला गणिताची गोडी लावली. बुद्धि
माझ्या जडणघडणीत रुपारेलचे तेव्हाचे उपप्राचार्य भिडे सर यांचं मोठं योगदान आहे. मध्य प्रदेशात खरगोणला शिकलेला मी, मॅट्रिकनंतर मुंबईला आलो. मुंबईच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश हवा होता. मुंबईतला मॅट्रिकचा निकाल लागला; पण आमच्या मध्य प्रदेश बोर्डाचा निकाल काही लागला नव्हता. मग मला प्रवेश मिळण्याची मोठी पंचाईत झाली. एका स्नेह्यांच्या ओळखीतून मी रुपारेल कॉलेजच्या भिडे सरांना भेटायला गेलो. त्यांनी माझी पंचाईत समजून घेतली. त्यांनी विचारलं, ‘तुला किती मार्क मिळतील? फर्स्ट क्लास मिळेल ना?’ मी ‘हो’ म्हणालो. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी मला प्रवेश दिला. फार गवगवा होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बसवून फॉर्म भरून घेतला आणि मी विज्ञान शाखेत दाखल होऊ शकलो. पुढे इंटरला चांगले मार्क मिळाल्यानंतर मी पेढे घेऊन भिडे सरांकडे गेलो. त्यांनी विचारलं, ‘पुढे काय करणारेस?’ मी म्हटलं, ‘बी. एस्सी. करीन- फिजिक्समध्ये’ ते म्हणाले, ‘अरे, तुला चांगले मार्क आहेत. इंजिनीअरिंगला जा.’ तेव्हा इंजिनीअरिंगचे फॉर्मही सायन्स कॉलेजमध्ये मिळत असत. त्यांनी मला तो फॉर्म दिला आणि आग्रहाने भरायला लावला. मी तेवढासा राजी नव्हतो. भिडे सर म्हणाले, ‘इंजिनीअरिंगला जाऊन तर बघ. तुला तिथे अॅडमिशन नक्की मिळेल’ आणि नाही जमलं तर ये इथे परत. हे कॉलेज तुझंच आहे आणि बी. एस्सी. करायचंच असेल तर फिजिक्समध्ये नाही, मॅथ्समध्ये कर. फिजिक्सला प्रॅक्टिकलचे मार्क असतात. ते किती मिळतील, परीक्षकांवर अवलंबून असतं. गणितात आपण खात्रीने मार्क मिळवू शकतो. बी. एस्सी.ला पहिली श्रेणी मिळाली तरच चांगलं करिअर घडवू शकशील; पण ते नंतरचं. आधी तू इंजिनीअरिंगला जा तर! मी व्ही. जे. टी. आय.ला गेलो ते केवळ भिडे सरांच्या आग्रहामुळे. त्यांचे ऋण मी कसे फेडू?
(हे भिडे सर जर काकोडकरांना भेटले नसते आणि त्यांनी योग्यवेळी योग्य मार्गदर्शन केले नसते तर भारत एका मोठय़ा अणुतज्ज्ञाला मुकला असता!)
हा लेख आजच लोकसत्ता मध्ये वाचनात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा