शनिवार, २७ मार्च, २०१०

साल्हेर ... एक बुलंद किल्ला

साल्हेरचा बुलंद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे.त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३ मीटर्स आहे.त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे.तो साल्हेरचा उपदुर्ग आहे.एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक ठरतो,म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात.साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या,रतनगड (नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात.पश्चिमेला अजंटा-सातमाळा रांग दिसते.सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत.त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे.साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर  यावयास पायवाट आहे.इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.
 इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.या युद्धाचे मोठे रंजक वर्णन बखरीत आले आहे.
'एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला कि  तीन कोश औरस-चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्द जाहले.घोडी,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजीयाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव जाहला.ऐसा कुल सुभा बुडवला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.'



 या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.'भारती जैसा कर्ण तैसा' असे त्याचे वर्णन आले आहे.साल्हेर दुर्गाच्या सालोट्याच्या बाजूस खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी हि अभ्यासण्यासारखी आहेत,पण दुसर्या बाजूकडचे दगडात कोरलेले कठडा असलेले कड्याच्या टोकावरचे जिने आपल्याला थक्क करतात.कोणी केले असेल हे काम ????

१३ टिप्पण्या:

  1. मस्त...शिवाजी महाराजांकडे त्यावेळी उत्तम विचारवंत, मंडळ होतीच पण सर्वोत्तम कारागीर होते किल्ल्यांच बांधकाम करणारे..
    रायगड, लोहगड, सरसगड, पेठ...गडाची जागा, भरीव बांधकाम, पाण्याची १२ महिने सोय ह्या सगळ्या गडाच्या जमेची बाजू

    उत्तर द्याहटवा
  2. @सुहास
    हो ना उत्तम कारागीर हि महाराजांची जमेची बाजू होती. आणि गडासाठी योग्य जागा आणि सर्व सोयी पुरवणारे लोकही होतेच

    उत्तर द्याहटवा
  3. वा.. उत्तम पोस्ट विक्रम...
    Read - http://shreeshivchatrapati.blogspot.com/2009/03/24-battle-of-salher.html

    नाशिक पूर्व - पश्चिम मधील अनेक किल्ले सर केल्यावर मराठा फौजेने खान्देशातील बुरहारपुर ही मुघल पेठ लूटत 'साल्हेर' या महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्याला वेढा घालून तो जिंकला. त्यावेळी दख्खनेचा मुघल सुभेदार 'दाउदखान' साल्हेर पासून २२ किमी वर होता. किल्लेदार फत्तेहुला खान किल्ला लढवताना मारला गेला.

    उत्तर द्याहटवा
  4. विक्रम, खुपच छान लिहिलं आहेस. साल्हेर झाला नाहीये माझा कधी. पण छानच माहिती मिळाली.. !!

    उत्तर द्याहटवा
  5. @ हेरंब
    धन्यवाद
    मला बखरीतील युद्धाचे वर्णन खूपच आवडले बघ

    उत्तर द्याहटवा
  6. विक्रम महोदय, छान माहिती दिली आहे.
    http://savadhan.wordpress.com
    बघा तुमच्या आवडीचं काय आहे?

    उत्तर द्याहटवा
  7. @sunil
    साल्हेरचा किल्ला नाशिक जिल्हा सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
    http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0

    उत्तर द्याहटवा