गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

चीनच्या सीमेवर दक्षता बाळगावी- लष्करप्रमुख

‘ईशान्य सीमेवर चीनकडून केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे काणाडोळा करून चालणार नाही. अंतर्गत व बाहय़सुरक्षेबाबतचे संभाव्य धोके लक्षात घेता चीनच्या सीमेवर दक्षता बाळगण्याची गरज आहे,’ असे मत लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी व्यक्त केले. ‘पाकिस्तानमधील आण्विक धोरणाचे नियंत्रण विघातक घटकांकडे जाणार नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे जनरल कपूर म्हणाले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ११७ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनरल कपूर उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख अ‍ॅडमिरल आर. के. धोवान आदी या वेळी उपस्थित होते. कॅप्टन एम. एम. मरकाळे यांना या वेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.संचलनानंतर माध्यमांशी संवाद साधताना जनरल कपूर म्हणाले, की ‘अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी आंतरराष्ट्रीय करार, देखरेख करतानाच एखाद्या देशाकडील आण्विक प्रकल्पाची सूत्रे विघातक शक्तींकडे जाणार नाहीत, याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. चीनच्या सीमेबाबत काळजी करण्यासारखी स्थिती नाही. परंतु, सीमेपलीकडे चीनकडून केली जाणारी पायाभूत सुविधांची उभारणी, लष्कराच्या सक्षमीकरणासाठीची जुळवाजुळव यांच्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळय़ामध्ये बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी घुसखोरीमध्ये वाढ होते. यंदाही तशाच प्रकारचा धोका असून त्याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत.’‘अतिप्रगत, तंत्रज्ञानाधारित युद्धप्रणालीच्या जोरावरच यापुढील काळातील युद्धे लढली जाणार आहेत. त्यामुळेच संरक्षण प्रशिक्षण संस्थांमधील कॅडेटने नेतृत्वगुणांबरोबरच तंत्रज्ञानाधारित युद्धप्रणालींचे ज्ञान-कौशल्यही आत्मसात करण्याची गरज आहे,’ असा सल्ला जनरल कपूर यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा