शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

गर्जा महाराष्ट्र माझा.......

१ मे महाराष्ट्राचा जन्मदिन त्याच महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्य वीरांच्या रक्तसिंचनातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.सुवर्ण  महोत्सव साजरा करताना १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे हि स्मरण करू  आणि त्यांना अभिवादन करून हा सुवर्ण महोस्तव जल्लोषात साजरा करूयात.हे राज्य ह्वावे हि तो श्रींची इच्छा
छत्रपती शिवरायांना ती उमगली होती
प्रत्यक्षात उतरवायला
१ मी १९६० ची पहाट उगवली होती.

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा.

सोमवार, १२ एप्रिल, २०१०

'बबन नाव्ही तंगाट'

Lazy Drinker - Borracho huevónशीर्षक वाचून हादरलात का ? एवढे हादरण्याची गरज नाही सांगतो सगळे इस्कटून ;)
काही लोकांना 'तंगाट' या शब्दाचा अर्थ माहिती असावा परंतु कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी तंगाट म्हणजे 'दारूपिऊन टल्ली झालेला' हा जरा गावाकडचा शब्द आहे तो सर्वाना माहितीचा असेल असे नाही असो
तर काय झाले सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांच्या परीक्षा  हि संपत आल्या आहेत आणि परीक्षा  झाल्या रे झाल्या कि मामाच्या गावाला जायचे हे आमचे एकमेव ध्येय असायचे याची आठवण झाली आणि काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी मी जेंव्हा मामाच्या गावाला जायचो तेंव्हा (उन्हाळ्याच्या सुट्टीत सहसा) त्यावेळी आमचे प्रताप माहिती असल्याने(तसे प्रत्येकजन लहानपणी प्रतापीच असतो म्हणा ) मामा आम्हाला आजोबांच्या आदेशाने पहिल्यांदा केस कापण्यासाठी बबनच्या केशकर्तनालयात  घेऊन जायचा. केस कमी करू या नावाखाली आमचा 'चमनगोटा ' केलेला असायचा.परंतु असे केल्याने आपल्याला पाण्यात खेळण्यापासून कोणी अडवणार नाही असले विचार आमच्या त्या सुपीक डोक्यात यायचे आणि आम्ही मनोमन खुश ह्वायचो.
 तर हा बबन याला पूर्ण गाव 'बबन नाव्ही' म्हणून ओळखायचा.  तसा हा गावातला एकदम फेमस माणूस बर का.जसे कोणतेही कुशल कारागीर  किंवा कलाकार वल्ही असतात तसाच हा सुद्धा होता हे सांगायची गरज नाही.बबन आमच्या मामाच्या घरचा 'फिक्स' नाव्ही होता.तो  पणजोबापासून नातवंडापर्यंत सार्वांचे डोके हलके करायचा.फक्त आमचे पणजोबा आणि आजोबा यांच्यासाठी त्याला घरी यावे लागायचे.आजकाल मामा त्यांच्याकडे केस कापायचा नाही कारण बबनचा मुलगा जरा 'फ्याशनेबल' केस कापत असल्याने ते आता त्याचे गिर्हाईक झाले होते.तसेही बबनच्या  दुकानात पैसे द्यावे लागत नव्हते वर्षाला धान्याची ठरलेली पोती दिली कि वर्षभर सण सोडून काही द्यावे लागायचे नाही.
 बबनचा आपल्यावर लय जीव  बर का. बीबीचा (आईचे टोपण नाव ) पोरगा आलाय हे समजल्यावर (आम्ही आलोय हे त्यांना पहिल्याच दिवशी त्यांच्या दुकानातील उपस्थितीवरून समजायचे) माझ्यासाठी लेमन गोळ्या त्याही मुठभरून ह्या ठरलेल्या असायच्या. आजोबा आणि पणजोबांची सेवा (केस,दाढी) करण्यासाठी आठवड्यात २ वेळा बबन घरी आला कि आमच्या बरोबर खूप खेळणार यात वाद नाही.
परंतु एकदा संध्याकाळ झाली आणि दुकान बंद केले कि बबनचे रूपच बदलायचे.रात्री ८ वाजले कि यांचे पाय गुत्त्याकडे वळलेच  आणि एकदा बबन तंगाट झाला कि याच्या वाटेला येणाऱ्या प्रत्येकालाच शिव्याच्या लाखोल्या वाहिल्या जायच्या. बबनची वस्ती मामाच्या वस्तीच्या पुढे असल्याने त्याचे रात्रीचे रूप रोज पाहण्याचा योग मला यायचा.रात्री कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज वाढला आणि त्याच्या बरोबर 'बबन नाव्ही तंगाट' अशी आरोळी ऐकू आली कि समजायचे बबन आला. ती बबनची स्टाइल होती. बबन हा त्याचा ज्याच्यावर राग आहे किंवा कोणाशी त्याचे बिनसले असेल त्याची काही वाईट गोष्ट झालेली असेल किंवा काही घडलेले असेल या गोष्टीचा उल्लेख करून त्याची आरोळी पूर्ण करायचा. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल.समजा कोणाची सायकल चोरीला  गेली तर याची आरोळी'संजय पाटलाची सायकल चोरीला गेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट' (लगेच समजायचे संजय पाटलाचे आणि बबन  याचे काहीतरी बिनसले आहे)अशी अनेक विविध वाक्य आम्हाला ऐकायला मिळायची.'........ म्हैस मेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट' '....... बायको पळून गेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट'
तर एकून काय ' बबन नाव्ही तंगाट' हे त्याच वाक्य ठरलेले असायचे.
पण एवढे तंगाट होऊन हि आम्ही आलेलो आहोत हे तो विसरायचा नाही, त्याचा घरी जायचा रस्ता मामाच्या दारातून जात असल्याने मामाचे घर आले कि त्याची पावले घराकडे वळायची.दारात आला कि बाहेर असेल त्याला 'बीबीचा पोरगा कुठय' हा पहिला प्रश्न ठरलेला.बबन दारू पिऊन आलाय त्यामुळे आम्हाला घरातील माणसे घराच्या बाहेर पडू द्यायची नाहीत.(बालमनावर वाईट परिणाम नको म्हणून)
परंतु बबन मला जोरात हाका मारायला लागायचा.आणि आम्ही सगळ्यांचे हाथ सोडवून पळत बबन जवळ जाऊन उभा असायचो.कारण आम्हाला माहिती असायचे आमच्या लेमन गोळ्या आलेल्या आहेत.बबन मला उचलून घेणार आणि खिशातून मुठभरून लेमन गोळ्या आमच्या हातावर ठेवणारच.मला खाली ठेवता ठेवता बबनची आरोळी यायचीच 'बीबीचा पोरगा आलाय,तरीबी बबन नाव्ही तंगाट'
मला खाली ठेऊन बबन परत फिरला कि वळून माझ्याकडे बघायचा आणि फक्त बबन नाव्ही ???? एवढच म्हणायचा आणि मी जोर देऊन 'बबन नाव्ही तंगाट' अस म्हणायचो आणि घरात पळून जायचो .यावर  बबन हसायचा आणि त्याच्या ओरोळ्या ऐकत आम्ही झोपी जायचो.
 दुसर्या दिवशी सकाळी बबन  घरी चहा प्यायला हजर असायचा एकदम नॉर्मल, शांतपणे बोलणारा हा बबन पाहिला कि रात्रीचा तो बबन कोण होता असा प्रश्न पडावा.परत त्याचा दिनक्रम सुरु ह्वायचा रात्र झाली कि परत बबनच्या आरोळ्या ऐकू  यायच्या.
' बबन नाव्ही तंगाट' हे वाक्य माझ्या मनात घर करून बसले हे मात्र खर.आताही कोणी जवळचा मित्र पार्टीमध्ये थोडी जास्त झाली आणि बडबड करू लागला कि माझ्या मनात येते ' बबन नाव्ही तंगाट' किंवा कधी कधी मी बोलूनही जातो असे.काही लोकाच्या ते लक्षात येत नाही परंतु जवळच्या  सर्व मित्रांना हा किस्सा माहित असल्याने त्यांच्या लगेच लक्षात येते आणि तेही त्या टल्ली झालेल्या मित्राकडे बघून जोरात म्हणतात ' बबन नाव्ही तंगाट' आणि जोरात हसतात.

(टीप-ब्लॉग सुरु केल्यापासून स्वताबद्दलचा एकाही अनुभव लिहिला नव्हता  हा पहिलाच प्रयत्न )
Reblog this post [with Zemanta]

मंगळवार, ६ एप्रिल, २०१०

आभासी दुनिया

orkut_newआंतरजाल हे खरच एक अदभूत दुनिया आहे याचा वापर आपण कसा करतो यावर याचे परिणाम अवलंबून असतात.येथील ओर्कुट,फेसबुक अशी संकेतस्थळे हि एक आभासी  दुनिया आहे हे आंतजालावर वावरणारी कोणतीही व्यक्ती मान्य करेल.परंतु काही लोक या आभसी दुनियेच्या आहारी जातात हेही तितकेच खरे आहे.आजच्या जमान्यात आंतरजालाचा वापर हा भरपूर प्रमाणात होत असताना दिसून येते.दैनंदिन व्यवहारातच नाही तर मनोरंजन म्हणून हि याचा वापर खूप वाढला आहे.याचा  जास्त वापर करण्यात आपले तरुण सर्वात पुढे आहेत असे दिसून येते.
तरुण वयातील मुले मुली हि ओर्कुट,फेसबुक अशा  संकेतस्थळावर अक्षरशा पडीक असतात.यामागे नवीन गोष्टीचे आकर्षण,मनोरंजन  अशा बाबी  असल्या  तरी त्याचा त्यांच्या मनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम होत असतो.आंतरजाल  हे माहितीचे भांडार आहे त्याच्या साह्याने आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो हे हि मुले विसरून गेली आहेत.
हा विषय लिहिण्यामागचे  कारण म्हणजे मी ओर्कुट हे खूप दिवसापासून वापरत आहे तेथील चर्चेत हि हिरहिरीने भाग घ्यायचो माहितीची देवाण घेवाण होत होती,शाब्दिक चकमक हि होत होती.खूप नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या काही चांगल्या काही वाईट  . परंतु तेथील होणारया चर्चेतून,भांडणातून  असे दिसून आले कि ते आपल्या जीवनावर,मनावर खूप परिणाम करते आणि आपल्या रोजच्या वागण्यात,बोलण्यात खूप बदल घडून येतो.
कोणी काही म्हंटले तरी आपण जे अशा संकेतस्थळावर  मत मांडत असतो किंवा जेवढ्या त्वेषाने बोलत असतो तसे आपण खरया जीवनात बोलत व वागत नसतो.अशा ठिकाणी आपण फक्त तसा आभास तयार करत असतो कारण आपल्या पुढे दुसरी खरी व्यक्ती नसते किंवा  ज्यांच्या समोर आपण हे बोलत असतो त्यांचा आपल्या खरया जीवनाशी काहीही संबंध नसतो.
परंतु काही लोक (सहसा  तरुण मुले-मुली) अशा गोष्टी खूपच गंभीरपणे घेतात ते 'ओर्कुट म्हणजेच जीवन' या तत्वाने वागू लागतात असे दिसून आले आहे.तेथील होणारया चर्चा,भांडणे,गप्पा हेच त्यांचे जीवन बनून जाते ते अशा संकेतस्थळावर उपस्थित नसले तरी मनाने ते तिथेच असतात त्याचाच विचार त्यांच्या मनात सतत असतो.आपण कोणीतरी मोठे किंवा वेगळे  आहोत,विचारवंत आहोत असा आभास करण्याच्या मागे ते लागतात आणि त्यातच ते हरवून जातात.
या आभासी दुनियेत प्रत्येकजण आपली एक प्रतिमा तयार करायच्या मागे लागलेला असतो तो तसाच खरया जीवनात असेल असे सांगता येत नसले तरी काही कालावधी नंतर आपण त्या प्रतिमेप्रमाणेच  आहोत असे त्याला वाटू लागते परंतु खरी परिस्थिती तशी नसते आणि ती समोर आली कि त्याला धक्का बसतो.
आपण हि अशा गोष्टी अनुभवल्या  असतील  आपली कुवत  किंवा तेवढी बुद्धिमत्ता नसलेली  काही लोक काय काय गोष्टींवर आपले मत मांडत असतात किंवा एखाद्याला सल्ला,उपदेश  देत असतात असे का होते ?
कारण ती माणसे स्वताला तेवढ्या क्षमतेची समजायला लागेलेली असतात इथे बसून ओबामा  ने  काय केले  पाहिजे ,बुश  कुठे  चुकला  किंवा त्यांनी  काय केले  पाहिजे  अशा गोष्टींवर मत नोंदवणारे  स्वता आपण कुठे  आणि किती चुकत  आहोत याकडे  डोळे  झाक  करत असतात आणि हे सर्वांच्या  बाबतीच  खरे आहे अगदी  माझ्याबाबतही  :)
खरया आयुष्यात आपणाला जे काही बोलता येत नाही किंवा जसे वागता येत नाही परंतु तशी खूप इच्छा असते अशा गोष्टींची पूर्तता हि आभासी दुनिया करते.

ओर्कुटलाच विश्व मानणारे मी पहिले आहेत त्यातून त्यांच्या आयुष्यात खूप चढ उतार होताना पहिले आहेत
कितीही काही बोललो तरी आपण जे इथे मत मांडतो ते आपल्या मनात कुठेतरी घर करून बसलेले असते आणि जगात वावरताना त्या गोष्टींचा प्रभाव आपल्या वागण्यात,बोलण्यात दिसतो
येथील गोष्टी किती वैयक्तिक घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु त्याने तुमच्या सामान्य जीवनावर खोलवर परिणाम होत असतो हे अनुभव आल्याशिवाय लोकांना फक्त सांगून पटत नाही
येथे खूप चांगल्या गोष्टी वाचायला भेटत असतात कोणती माहिती योग्य आणि आपल्याला योग्य दिशा देणारी आहे हे स्वताच ठरवावे लागते येथील मित्र फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतात तो ऐकायचा कि नाही हा शेवटी आपला वैयक्तिक प्रश्न असतो
आभासी जगात जगताना आपणाल जसे हवे आहे तसे जगता येते परंतु तसेच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही आणि असे झाले कि मनाला खूप त्रास होतो आणि चीड चीड होते
त्यामुळे आपण जसे आहोत आपला स्वभाव जसा आहे तसा इथे मांडत राहावे त्यामुळे त्याचे काय परिणाम भावी आयुष्यात होऊ शकतात ते येथील चर्चेने आणि मैत्रीने समजू शकते

शेवटी कस जगायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
फक्त एक आहे आपण इथे आभास निर्माण करून स्वताला फसवत असतो

या आभासी दुनयेचे व्यसन हो व्यसनच कधी लागते हे समजतच नाही आणि माणूस यात वाहून जातो वेळीच यावर उपाय नाही केला गेला तर आपल्या  वैयक्तिक आयुष्याला यामुळे हानी पोहचू शकते.
Reblog this post [with Zemanta]