शनिवार, ३ मार्च, २०१२

माहुली .. सुळक्यांचा गड


माहुलीला सुळक्यांचा गड असेच म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार झालेला एक दुर्गही म्हणता येईल. माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक करणारी वाट आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश करता येतो.
 माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड असे उपदुर्ग आहेत.नवरा-नवरी भटोबा शंकर,ब्रह्मा,वजीर,चंदेरी, असे अनेक सुळके म्हणजेच लिंग्या आहेत.या दुर्गावरून शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार चालवला.१६५७ मध्ये शिवाजीमहाराजांनी कोकणातले बरेच दुर्ग जिंकून घेतले.त्यात महुलीही जिंकला.पुरंदरच्या तहात तो मुघलांना द्यावा लागला.
 सध्या गडावर जुने अवशेष शिल्लक आहेत.दुर्गाची वाताहत किती आणि कशी होते,त्याचे इतर दुर्गांसारखे महुलीही एक उदाहरण आहे.इ.सन.१६७० मध्ये ऐन पावसाळ्यात या दुर्गावर हल्ला चढवून तो दुर्ग जिंकला.राजांच्या या विजयाने अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.इंग्रजांनी त्याची नोंदही केली आहे.
एका मुघलाने महुलीविषयी लिहिले आहे, "पावसाळ्यात जवळचे काही दिसत नाही.अंधारया रात्री तर हाताला हाताची ओळख पटत नाही ... ही तळकोकणची राजधानीच आहे.किल्ला अतिशय मजबूत आहे..."
 गडावर अजूनही रान आणि उंच गावात आहे.रात्री मुक्काम केला,तर जंगली प्राणी दिसतात.पूर्वी तळातील जंगलात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असल्याची नोंद आहे.भव्यता,रौद्रता.जंगल,अफाट पाऊस अशा नैसर्गिक अनेक कारणांनी माहुली अवघड झाला आहे.त्याचे सुळके हे त्या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे आणि त्या सुळक्यांच्या अवघड चढणीचे आवाहन महाराष्ट्रातील युवकांनी पेललेले आहे.
  अगदी यशस्वीपणे.वजीर,विष्णू,नवर्याची करवली,भटोबा,असे अतिअवघड सुळके इथले युवक लीलया चढून गेले आहेत.तीन दुर्गांचा मिळून झालेला माहुली त्याच्या बळकटीपणाची साक्ष देत उभा आहे.

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

isalute u steve

आज दसरा सर्वत्र सणासुदीची धामधूम सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना माझे मन उदास होते कोणाला शुभेच्छा द्यायची इच्छा होत नव्हती, कारण होते सकाळी ऐकलेली बातमी स्टीव जॉबचे निधन :( 
सकाळी नेहमीप्रमाणे twitter उघडले आणि पहिलीच ट्विट दिसली #RIPSTEVEJOBS आणि मला धक्काच  बसला काही सुचेनासे झाले. २ दिवसापूर्वीच मी अॅपलचे मेडिया इवेन्ट लाइव ब्लॉगवर पहिले होते. त्यावेळी खरी उत्सुकता होती आयफोन ५ ची जो स्टीव स्वता सर्व जगासमोर आणेल याची परंतु आयफोन ५ हि आला नाही आणि स्टीवसुद्धा. मी खूप निराश झालो आणि आज अचानक त्याच्या जग सोडून जाण्याची बातमी वाचली. तसा तो खूप दिवसापासून कर्करोगाने आजारी होता परंतु स्टीव असा अचानक जाईल असे वाटले नव्हते. 
 स्टीवच्या आयफोन ने मला एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे एक वेगळाच आनंद मला आयफोन वापरताना मिळाला आहे. आयफोन ५ आल्यानंतर तो मी कोणत्याही परिस्थितीत घेणार होतो आणि माझा जुना आयफोन विकणार होतो परंतु आता मी तो  जुना आयफोन विकेल असे वाटत नाही  कारण तो स्टीवने बनवला आहे.
आयपॉड,आयफोन , आयपॅड , आयक्लाउड हि स्टीवने जगाला दिलेली देणगी आहे आणि यासाठी आम्ही त्याचे कायम ऋणी राहू.

माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याला बौद्धिक सुखाचे एक नवीनच परिमाण देणाऱ्या , सर्व ज्ञानेंद्रियांना सुखाची एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या आणि माझे छोटेसे आयुष्य समृद्ध करणाऱ्या " स्टीव जॉब्स " ना शतशा प्रणाम .

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

महागाईमधील स्वस्ताई

मागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यात पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते.तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु मागील १० वर्षात एक गोष्ट महाग झाली नाही याबाबत कोणीही काही बोलत नाही किंवा चर्चाहि करत नाही ती माणसाची सवयच  आहे म्हणा ;) असो तर ती गोष्ट कोणती हे तुमच्या लक्षात आले कि नाही ? तुम्ही म्हणत असाल कि मागील १० वर्षात महाग झाली नाही अशी गोष्ट असणे शक्यच  नाही परंतु तसे आहे. त्या गोष्टीवर सर्व प्रकारच्या भाववाढीचे परिणाम होतात जसे डीझेल,कागद,शाई,मनुष्यबळ या सर्वांचे परिणाम त्या गोष्टीवर होत असतात परंतु तरीही ती मागील काही वर्षात वाढली नाही परंतु काही वेळा ती स्वस्त झाली. तर ती गोष्ट म्हणजे 'वर्तमानपत्र'. यात कधी भाववाढ झालेली तुम्हाला आठवते का? उलट काही वर्षापूर्वी २ रुपयात दिले जाणारे वर्तमानपत्र आता १ रुपयात तेही भरपूर पाने आणि रंगबेरंगी पुरवण्यासहित  मिळत आहे.हे कसे शक्य होत असावे? फक्त जाहिरातींच्या जोरावर ? कि समाजसेवेच्या भावनेतून ते स्वता तोटा सहन करून हे करत आहेत? ज्या गोष्टीला तयार होण्यासाठी किमान ४-५ रुपये खर्च येत असावा परत त्यावर वाहतूक खर्च ,विक्रत्यांचे कमिशन आलेच अशी गोष्ट फक्त १ रुपयात देणारे रोज लाखो रुपये तोटा सहन करून अजून तग धरून कसे काय टिकू शकतात ?
 व्यावसायिक स्पर्धेतून हे होत आहे हे जरी मान्य केले तरी हि वर्तमानपत्र कोणत्याना कोणत्या समूहाची बांधील आहेत आणि ते समूह कोणत्यातरी राजकीय पक्षाशी बांधील आहेत हे लक्षात येईल.त्यामुळेच ते इथे तोटा सहन करून दुसरीकडे कोठेतरी याहून जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असावेत का ? स्वस्तात अंक देऊन ते सर्वसामान्य माणसाला आकर्षित करतात आणि एकदा सवय लागली कि जे त्यांना हवे आहे तेच वाचायला लावतात म्हणजेच ते आपलीच मते लोकांच्या मनावर बिंबवतात !
म.टा. पुण्यात आला त्यावेळी त्याने काय केले आठवा जरा किती रुपयात तो लोकांना दिला गेला.आता विदर्भात 'दिव्य मराठी' येत आहे १९९ रुपयात वर्षभर म्हणजे १ रुपयासुद्धा नाही दिवसाला. काही दिवसापूर्वी वृतपत्र १ रुपयाला देण्यास काही विक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यावेळी 'लोकमत' ने काय केले हेही आठवत असेलच.
जनतेपर्यंत कुठली माहिती कोणत्या स्वरुपात पोहचवायची हा निर्णय वरून घेतला जातो आणि त्याप्रमाणे गलेलठ्ठ पगार घेणारे संपादक, मिंधे झालेले पत्रकार राग आवळतात आणि सामान्य माणूस तेच सत्य आहे याच समजुतीत वाचत राहतो. यात तसा सामान्य माणसाचाही दोष आहेच स्वस्तात मिळणाऱ्या भरपूर पाने असणाऱ्या आणि रंगीत पुरवण्यांच्या मोहात अडकून आपण त्यांच्या आहारी जातो व सत्याचा पाठपुरवठा करणारी पत्रकारिता कचऱ्याच्या टोपलीत जाते.अशी किती तरी चांगली वृतपत्रे मागे पडली किंवा बंद झाली आहेत या स्पर्धेमध्ये हे तुमच्या लक्षात येईल.
 स्वस्तातील दारू,स्वस्तातील औषधे शेवटी प्राणघातक असतात. मग स्वस्तातील वर्तमानपत्र कितीही पानांचे आणि रंगीत असलेतरी ते भेसळयुक्त असणारच ना ? त्यातून खरी,प्रबोधन करणारी माहिती कशी मिळणार ? आपणच विचार करा.
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातून घेतले आहेत)
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

बुधवार, २७ जुलै, २०११

राजमाची... एक जोड किल्ला


राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे.त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य. श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत.कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो.लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते,तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता येते.उढेवाडी एक छोटे टुमदार गाव आहे.'राजमाची ग्रामसहाय्य योजना' या मुंबईच्या संस्थेने या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी बर्याच योजना राबवल्या आहेत.
 समोरच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे.दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये जवळच पाण्याची टाकी आहेत.मनरंजन या बालेकिल्ल्यापेक्षा श्रीवर्धनची उंची थोडी अधिक आहे.दुर्गात लेणी आहेत.वरून मोठा प्रदेश पाहता येतो.विसापूर,लोहगड,धक,माहुली,माथेरान असा चौफेर प्रदेश दृष्टीपथात येतो.
 राजमाचीचे हे दोन बालेकिल्ले स्वतंत्र दुर्ग मानले जात.या दोघांचे हवालदार वेगवेगळे असत. शिवाजीमहाराजांनी इ.स.१६६१ मध्ये महिनाभर श्रीवर्धन गडावर मुक्काम केला होता.गडाभोवती दाट झाडी आहे.त्यात बिबट्याचा वावर आहे.एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे.
राज्यवहारकोषात बालेकिल्ल्याचा 'अधित्यका' असा शब्दप्रयोग केला आहे.दोन बालेकिल्ले हे एकमेकास पूरक आहेत,म्हणून बांधून काढावेच लागले.अर्थात,दोन्ही अधित्यकांचा पसारा मोठा असल्याने स्वतंत्र गड म्हणूनही गणले जाऊ लागले.दोन अधित्यका आणि तेच दोन स्वतंत्र गड असे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.पाण्याची टाकी ,लेणी,दरवाजे,तटबंदी अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत.खंडाळ्याच्या घाटातून एका बोगद्यातून दुसर्या बोगद्यात जाणार्या आगगाड्या न्याहाळताना फारच मजा येते.
  

मंगळवार, २१ जून, २०११

प्रत्येकालाच वेगळा कायदा करायचा का ?

समाजात लोकोपयोगी  कार्य,व्यवसाय,व्यवहार करणारे फक्त पत्रकारच आहेत का ? डॉक्टर,वकील,शिक्षक,दुकानदार,संशोधक,इतिहासकार,कलाकार,पत्रकार  इत्यादी असे अनेक पेशे आहेत जे लोकोपयोगी कार्य करत असतात.त्यातल्या प्रत्येकालाच कधीना कधी समाजाच्या रोषाला या न त्या कारणाने सामोरे जावे लागते.त्यातल्या प्रत्येकालाच जमावाने कधीतरी झोडपलेले असते.कारण सामान्य  माणूस  त्यांच्यावर  जेवढे  प्रेम  करतो  तेवढाच  काही  प्रसंगी  संतप्तही होतो.अशा प्रसंगाला व्यावसायिक धोका असे म्हणतात.त्यात पत्रकारसुद्धा येतात मग त्यांना खास संरक्षण किंवा कायदा  याची गरज का असावी ?
 पत्रकारितेवरील हल्ला आणि पत्रकारावरील हल्ला यात फरक आहे.मिड डे चे पत्रकार जे.डे आणि निखील वागळे यांच्यावरील झालेले एखाद्या संघटनेचे हल्ले यात फरक आहे.डे यांनी समाजातील अपप्रवृत्ती आणि गुन्हेगारी यांचा मुखवटा फाडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांच्यावर समाजातील खरया गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.त्यामुळे अशा हल्ल्यांकडे गुन्हा म्हणून पाहण्यास हवे.परंतु एखाद्या  व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला लक्ष बनवून हेतुपूर्वक हैराण किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न लिखाणातून होतो तेंव्हा होणारा हल्ला हा त्याची प्रतिक्रियाच असते.त्यामुळे त्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे असते.
पत्रकारिता आणि पक्षीय राजकारण यातील रेषा धूसर असते आणि ती पत्रकाने ओलांडू नये.अलीकडे काही लोकांकडून त्याचे भान न ठेवले गेल्याने अशे हल्ले वाढले आहेत.
 तसेच आजकाल पत्रकारांच्या सुरक्षेसाठी किंवा होणार्या हल्ल्यासंदर्भात खास कायदा करण्याची मागणी होत आहे.विशेष म्हणजे समतेचे पुरस्कार करणारे विचारवंत आणि पत्रकार यासाठी आग्रही आहेत.एकीकडे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या समतेचे डोस पाजायचे आणि दुसरीकडे अशा कायद्याने सामान्य माणूस आणि पत्रकार अशी दरी निर्माण करायची हे मोठे चमत्कारिक आहे. हा विरोधाभास नाही  का ?
 समता म्हणजे सर्व समान किंवा सर्वांसाठी समान.मग तो कायदा असो न्याय असो किंवा वागणूक.पूर्वीच्या काळी असे
होते उच्चवर्णीय,सत्ताधारी लोकांना वेगळी आणि पिडीत शोषित लोकांना वेगळी वागणूक दिली जात असे.त्यामुळेच पूर्वीच्या काळी वर्णवाद,वर्णवर्चस्ववाद फोफावला होता.त्या लोकांना आम्ही श्रेष्ठ,विचारवंत,बुद्धिवंत म्हणून खास वागणूक मिळाली होती आणि व्यवहारी श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते आणि कनिष्ठ,शोषित यांना दुय्यम ठरवण्यात आले होते.आणि त्याच विषमतेला संपवण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर यांनी त्यांची पूर्ण हयात घालवली होती.हि विषमता मोडून पुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी शेकडो लढे द्यावे लागले कितीतरी वर्ष खर्च करावी लागली.आणि आता पुन्हा अशीच वेगळ्या प्रकारची विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 पत्रकार हा समाजाचा घटक नाही का ? तोही देशाचा एक सामान्य नागरिकच आहे.त्यावरील हल्ला आणि सामान्य नागरिकावरील हल्ला यात फरक का असावा ? पत्रकारांना विशेष कायदा करण्याचा अर्थ सामान्य माणसाला दुय्यम ठरवणे नाही का ? असेच असेलतर लोकोपयोगी  व्यवहार  करणाऱ्या बाकी लोकांनीही अशाच  वेगळ्या कायद्याची मागणी करायची का ? कारण त्यांच्यावरही असे हल्ले झालेले आहेत.

पत्रकार खूप मोठे समाजकार्य करतो असे मानायची गरज नाही.तो लोकोपयोगी सेवा पुरवणारा एक घटक आहे.परंतु त्यांचा समाजात जो दबदबा असतो त्याचा गैरवापर करणारे हि भरपूर आहेत.खंडण्या उखळनारे ,हप्ते मागणारे काही पत्रकार नाहीत का ? २ जी स्पेक्ट्रम मध्ये सौदेबाजी करण्यात काही लोक पुढे होतेच ना ? अशा प्रकरणात पत्रकार सापडल्यावर त्यांच्यावर  कारवाई करावी म्हणून कोणती पत्रकार संघटना कधी पुढे येत का? जर पत्रकारांनी प्रामाणिकपणे अलिप्त राहून काम केले तर असे हल्ले होणार नाहीत.
 डे यांच्यावरील हल्ल्याचा तपास पोलीस त्यांच्या पद्धतीने करतीलच परंतु त्यांच्या आडून पत्रकारांनी त्यांच्यासाठी वेगळ्या कायद्याची मागणी लाऊन
धरू नये.त्यामुळे समाजात विषमता निर्माण होईल आणि मी पत्रकार म्हणजे वेगळा कोणी व सामान्य  माणूस म्हणजे दुय्यम अशी भावना वाढीस लागेल.
जय हिंद !
जय महाराष्ट्र !
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातील आहेत )

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

रेवणीचे अवशेष आढळणारा ... कंधार

मराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे.त्याची तटबंदी शाबूत आहे.खंदक पाण्याने भरलेला आहे.खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे.तीस मीटर्स तरी असेल.खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते! काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी.राष्ट्रकुट,यादव,खलजी,तुघलक,बहमनी,बरीद्शाही,निजामशाही,मुघल,निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून  राज्य केले.
 कंधारच्या या स्थलदुर्गात जुने अवशेष इतस्ततः पडलेले आहेत.राणीमहाल,बुरुज,तटबंदी,तोफांचे गाडे,दगडी जिने,बारादरी,मशीद,मूर्तीचे अवशेष,बारुदखाना,शीशमहाल,हौद,कारंजी असे बरेच कंधारमध्ये बघण्यासारखे आहे.
 लालमहाल आणि जवळची विहीर हि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.मूर्तीचे जे अवशेष आहेत,त्यापैकी एका मूर्तीचा एक पायाचा पंजाच काय तो राहिला आहे.पण त्यावरून ती मूर्ती किती विशाल असेल याची कल्पना आपल्याला येते.ती मूर्ती अंदाजे २२ मीटर्स उंच असावी !
  कंधार दुर्गाची उभारणी,तोफा हिंदुस्तानात येण्याच्या आधीची अस्लुअने त्याच्या प्रवेश्द्वाराविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.हा द्वारसमूह देखणा आणि बळकटहि आहे.लाकडी दरवाजा हा पूर्वी बाहेरून दिसत असल्याने ज्यावेळी शत्रुजवळ तोफा आल्या आणि दरवाज्यावर मारा होऊ लागला,त्यावेळी त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली.त्या लाकडी दरवाजासमोर एक अतिशय भक्कम भिंत उभारण्यात आली.अशा बांधकामाला जीभी अथवा हस्तीनख असे म्हणतात.असे बांधकाम कंधारच्या दुर्गाला आहे.
 दुर्ग अभ्यासकांनी कंधार अवश्य पाहिलाच हवा.स्थलदुर्गाला आवश्यक अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गबांधणीचे आवशेष पाहावेत.एक गोष्ठी इथेच आहे परंतु खूप शोध घेतल्यावर दिसते.खंदकाच्या भोवतीच वलय म्हणजे रेवणी.रेवणीचे अवशेष येथे आढळतात.ते पाहण गरजेचे आहे.इंग्रजीमध्ये त्याला 'कव्हर्ड वे' असे म्हणतात .