शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

एक वर्ष झाले सुद्धा ...

मी ब्लॉगिंग सुरु केलं अन् बघता बघता एक वर्ष कसं निघून गेलं हे समजलं
सुद्धा नाही. ब्लॉगला सुरुवात करतांना आपण आपल्या वाचनात आलेले चांगले
लेख फक्त इथे टाकायचे, मग ते कोणत्या वृत्तपत्रातील असो किंवा एखाद्या
संकेतस्थळावरील असो... असे माझे नियोजन होते. तसं मला जास्त अलंकारिक,
कथा वगैरे काही लिहिता येत नसल्याने मी स्वतःचे असे काही लिहू शकेल असे
वाटत नव्हते.

ब्लॉगिंगच्या अगोदर मी ऑर्कुटवर पडीक असायचो आणि तेथील सामाजिक
विषयांवरील धाग्यांवर आपले मत नोंदवायचो, भांडायचो... हे रोजचेच होते.
त्यावेळी ब्लॉग हे काय असते, याचे जास्त ज्ञान मला नव्हते. असाच एकदा एक
प्रोफाईल पाहत असतांना मला त्यात एका ब्लॉगची लिंक दिसली. मी उत्सुकतेने
ती पाहिली आणि मला हा प्रकार चांगला वाटला. आपलाही असाच एक ब्लॉग असावा
असे मनात येऊन गेले आणि मी स्वतःचा ब्लॉग तयार केला. नाव काय द्यावे यावर
डोके चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण फक्त सामाजिक विषयांवर, ज्यात बाकी
लोकांना जास्त रस नसतो किंवा एकदा वाचून सोडून द्यायचे असते अशा विषयावर
लिहणार असतांनाही 'जीवनमूल्य' असं उगाच उपदेशात्मक नाव दिलं. त्यानंतर तो
ब्लॉग "मराठी ब्लॉग विश्व"वर लावण्यासाठी मला काय म्हणून कष्ट करावे
लागले, काय सांगू... कारण मला संगणक या गोष्टीतले शून्य म्हणून ज्ञान
होते .कधी व्यवस्थितरित्या हाताळल देखील नव्हता. मी संगणक आणि नेट फक्त
माझ्या शेअर ट्रेडिंग साठी घेतले होते आणि त्या वेळात मी नेटवर भटकत
असायचो, तेवढंच काय ते मला येत होतं. कोणत्याही ब्लॉग धारकाला आपला ब्लॉग
कोणीतरी वाचवा असे वाटत असते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या
असतात. त्यासाठी मी माझ्या नवीन पोस्टची लिंक माझ्या ऑर्कुट मित्रांना
मेसेज करायचो, त्यातील काही वाचायचे, काही प्रतिक्रिया द्यायचे, तेवढाच
थोडासा दिलासा...
ब्लॉग सुरु केल्यानंतर मी बाकीचे मराठी ब्लॉगही वाचायला लागलो. मराठी
ब्लॉग विश्ववरून, काही दिवस असे गेल्यानंतर मला विविध ब्लॉगवरील
टेम्प्लेटने भुरळ घातली. आपलाही ब्लॉग असाच सजवलेला असावा असे वाटू लागले
पण त्यातील अक्कल नसल्याने काही करता येत नव्हते आणि तेवढ्यात
भुंग्याने नवीन टेम्प्लेटबद्दल एक पोस्ट टाकली असावी आणि आम्ही त्याला
प्रतिक्रिया देत त्याबद्दल प्रश्न विचारू लागलो पण HTML मधील काहीही
ज्ञान नसल्याने माझ्या ते डोक्यावरून जात होते, मग 'भुंग्या' दादाला
त्रास सहन होईना, आणि त्याने माझा ब्लॉग स्वतःहून सजवून दिला, तेही
त्याच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आणि मला माझा पहिला ब्लॉग मित्र
मिळाला... त्यानंतर माझ्या पोस्टवरील पहिली प्रतिक्रिया असायची ती
भुंग्या दादाची आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळायचे. मग त्यानंतर ओळख
झाली ती विशल्याची, याने आता आपल्या ब्लॉग ची 'सुरुवात' केलीय की शेवट
केलाय हा प्रश्न आहेच म्हणा, पण याचेही मी खूप डोके खाल्ले आहे आणि आताची
टेम्प्लेट ही याचीच देन आहे. त्यानंतर पंक्याच्या 'भटकंतीने' वेड लावले
याची फोटोग्राफी म्हणजे भन्नाट काम... आपण फिदा आहे त्यावर, रोहनचा तसा
थोडासा परिचय होता ऑर्कुटमुळे पण त्याचे ब्लॉग वाचून आणि महाराजांबद्दलचे
ज्ञान पाहून खरच मानलं या मावळ्याला... एकदम जबरदस्त अभ्यास असणारा
माणूस, त्यात आमच्यासारखाच हुंदडण्यात आनंद मानणारा... महेंद्र काकांच्या
ब्लॉगेस्टिकनंतर त्यांच्या ब्लॉगवर जास्त जाने झाले ते 'काय वाट्टेल ते '
लिहित गेले आणि आम्ही वाचत गेलो अगदी मंत्रमुग्ध होऊन... त्यात त्या
सत्यवानाची 'वटवट' मधेच त्रास द्यायची, कधी हसवायची, तर कधी विचार करायला
लावायची... त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या बाळराजांनी मग काय त्या
ब्लॉगची बातच कुछ और होऊन गेली. कधी कधी 'माझिया मना'ची साद ऐकू यायची
आणि मी तिकडे जायचो.
कधी खूप उदास झालो कि 'माझ्या गजाल्या' असायच्या. कधी सुवासिक 'मोगरा
फुलला
' की तिकडे भटकून यायचो. तुम्ही त्या 'सौरभ'चा ब्लॉग पहिला आहे का
एकदम जबऱ्या माणूस, पाहिजे तसे कशावरही लिहू शकतो तेही माणसाला खेळवून
ठेवत, त्याच्यात खूप काही आहे असे मला सारखे वाटते. याच्या मित्राची
'बक-बक' सुद्धा मस्त असते.

या ब्लॉगिंगमुळेच ट्विटरकडे ओढलो गेलो. आता तिथेच पडीक असतो दिवसभर...
यातून नवनवीन मित्र मिळाले, खूप काही चांगले वाचयला मिळाले. आजकाल मी
आनंदच्या 'मनात काय आहे' ते पाहत असतो तसेच 'बाबाची भिंत' चढून त्यामागे
काय चालले आहे तेही पाहत असतो. कधी निवांत बसायचे असेल तर सागरचा 'सागर
किनारा
' आहेच की...

याच काळात मला मराठी ब्लॉगर्सच्या "पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा" साठी
जाण्याचा योग आला, परंतु जास्त कोणाशी ओळख नसल्याने फक्त भुंग्या दादाशी
गप्पा मारल्या.. पंक्या आपला फोटो काढून घेण्यात व्यस्त होता. दीपक दादा
दिसायला राक्षसासारखा असला तरी खूप प्रेमळ आहे बरं का...!! ;) तर असे
दिवस चालू आहेत कधी काही सुचले तर लिहित असतो... मी साधारण सामाजिक
विषयांवर सडेतोड लिहिण्याचा प्रयत्न करतो... काही लोकांना आवडतं, काहींना
आवडत नसावे, पण आपले मत व्यक्त करत असतो.

तुम्हासारख्या मराठी ब्लॉगर्सचे आणि वाचकांचे प्रेम मिळाले यात खूप
समाधानी आहे. असेच काही-बाही लिहित राहील, वाचत राहा... चुकलो तर चूक
दाखवत जा. तुमचे प्रेम हेच सर्व काही आहे :)

जय महाराष्ट्र!

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे

गेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणात दाखवले जात नाहीत याबद्दल गदारोळ चालू आहे.हा विषय सेनेपासून मनसे आणि मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांच्या दरबारी हजरी लावून आला. मुद्दा भावनिक बनल्याने त्यावर तश्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या परंतु या विषयावर मराठी निर्मात्यांनी स्वता आत्मचिंतन करायची गरज आहे असे मला वाटते.आपण प्रेक्षकांना योग्य दर्जाचे चित्रपट पुरवतो का ? आपण चित्रपट तयार करण्याबरोबर त्याच्या योग्य मार्केटिंगकडे लक्ष देतो का ? कारण आजचा जमाना मार्केटींगचा आहे. मुळात मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहचायला हवा आणि त्यांना आवडायला हवा तरच हा प्रश्न सुटणार आहे.
 नवीन मराठी चित्रपट कधी तयार आणि प्रदर्शित  होतो हे त्या निर्मात्याला आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनाच माहिती असावे असे कधी कधी वाटते काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्यासारखे. एकतर मराठी चित्रपटांमध्ये   व्यावसायिकतेचा  आणि मार्केटींगचा पूर्णपणे अभाव असतो  हे मागे एकदा महेंद्रकाकांनी आपल्या लेखात नोंदवले होतेच. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणत दाखवले जावेत हि अपेक्षा रास्त असली तरी ते दाखवले गेले तरी चित्रपटासाठी प्रेक्षक कोण पुरवणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कि ती जबाबदारीहि कोणा संघटनेने  किंवा सरकारने घ्यावी अशी अपेक्षा मराठी निर्मात्यांची आहे? ५ - १० प्रेक्षकांच्या जोरावर कोणता मल्टीप्लेक्सवाला किंवा थेटरवाला चित्रपट दाखवणार आहे ? यातून त्या खेळाच्या विजेचे बिल तरी वसूल होते का ? चित्रपट त्या दर्जाचा असेलतर तो राज्याच्या सीमा ओलांडूनही यश संपादन करू शकतो हे दक्षिणात्य चित्रपटांनी दाखवून दिले आहे. आजही इंद्र,शिवाजी द बॉस,मास इत्यादी असे कितीतरी दक्षिणात्य चित्रपट विविध वाहिन्यांवर टीआरपी खेचताना दिसून येतात अशी वेळ मराठी चित्रपटांवर का येत नाही ? कि वाहिन्यांनीही मराठी चित्रपट भाषांतरित करून दाखवावेत यासाठी कोणी आंदोलन करावे अशी मराठी निर्मात्यांची अपेक्षा राहील ?
 सगळेच मराठी चित्रपट निष्कृष्ट दर्जाचे असतात असे माझे मत नाही परंतु सगळेच चित्रपट नटरंग,मी शिवाजीराजे बोलतोय,श्वास अशा चित्रपटासारखे  नसतात त्यामुळे असे उत्कृष्ट चित्रपट तयार होत राहिले तर प्रेक्षक आपोआप पाहतात आणि मल्टीप्लेक्सवाले ते दाखवतातहि. प्रदर्शनानंतर २ दिवसहि तग धरू शकणार नाहीत असे चित्रपट बनवले गेलेतर कोण दाखवणार ?
 काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती मराठी चित्रपटांवर आली होती त्यावेळची  दादा कोंडके यांनी कोंडी फोडली होती.रडारडीत अडकलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी वेगळी जाण आणली होती त्यानाही सुरवातीला संघर्ष करावा लागला परंतु प्रत्येकवेळी नाही त्यांनतर त्यांना आणि त्यांच्या निर्मात्यांना कधीच रडण्याची वेळ आली नाही. दादांचे चित्रपट २०-२५ आठवडे चित्रपटगृहात राहणार असाच नियमच बनून गेला होता आणि त्यांचे चित्रपट दाखवण्यासाठी थेटरमालक स्पर्धा करू लागले होते. त्यामुळे चांगले चित्रपट असतील तर कोणत्याही मल्टीप्लेक्स मालकांना जबरदस्ती करण्याची वेळ येणार नाही.शेवटी मालक धंदा करत असतो त्याला कोणत्याही प्रांतवाद व भाषावाद  यात पडायचे नसते चांगला चित्रपट आणि भरपूर प्रेक्षक द्या मालक चित्रपट निर्मात्यांच्या मागे लागतील.
 प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्यास कोणत्याही वेळी मराठी चित्रपट दाखवले जातील. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगल्या चित्रपटांची आणि  अशाच एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे.

जय हिंद
जय महाराष्ट्र

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

क्रांतिकारक खुदिराम बोस

हिंदुस्तानवर जुलमी सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यावर अलौकिक धैर्याने पहिलावहिला बॉम्ब फेकला.शालेय जीवनातच 'वंदे मातरम' या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वताला झोकून दिले आणि अवघ्या १८ व्या वर्षात हातात 'भगवदगीता' घेऊन ज्यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले ,त्या वंगवीर  खुदिराम बोस यांच्या जयंती निम्मित्त त्यांचे पुण्यस्मरण करूयात.
 खुदिराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बाबू त्रैलोक्यनाथ बोस व आई लाक्ष्मिप्रीयादेवी.
फेब्रुवारी १९०६ मध्ये मिदनापूर येथे एक औद्योगिक व शेतकरी प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आजूबाजूच्या प्रांतातील भरपूर लोक येऊ लागले.बंगालमधील एक क्रांतिकारक सत्येंद्रनाथ यांनी लिहलेल्या 'सोनार बांगला' या जहाल पत्रकाच्या प्रती खुदिराम यांनी या प्रदर्शनात वाटल्या.पोलीस शिपाई त्यांना पकडण्यासाठी धावला.खुदिराम यांनी त्या शिपायाच्या तोंडावर ठोसे मारले आणि  शिल्लक  राहिलेली पत्रके काखेत मारून ते त्य्नाच्या हातून निसटून गेले.याप्रकरणी राजद्रोहाच्या आरोपावरून सरकारने त्यांच्यावर अभियोग भरला;परंतु खुदिराम त्यातून निर्दोष सुटले!
 किंग्जफोर्डला ठार मारण्याच्या कामगिरीसाठी निवड -
मिदनापूर इथे 'युगांतर' या क्रांतिकारकाच्या गुप्त संस्थेच्या माध्यमातून खुदिराम क्रांतिकार्यात ओढले गेले.१९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.या फाळणीच्या विरोधात असणार्या अनेकांना त्या वेळचा कोलकात्याच्या म्याजीस्ट्रेट किंग्जफोर्ड याने क्रूर शिक्षा ठोठावल्या होत्या.अन्य प्रकरणात हि त्याने हिंदी क्रांतिकारांना खूप छळले होते. याच सुमारास किंग्जफोर्डला बढती मिळून तो मुझ्झफरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून कामावर रुजू झाला.सरतेशेवटी 'युगांतर' समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्डलाच ठार मारायचे ठरले.यासाठी खुदिराम व प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड करण्यात आली.


खुदिराम यांना  एक बॉम्ब आणि रिव्हॉल्वर देण्यात आले.प्रफुल्लकुमार यानाही एक रिव्हॉल्वर देण्यात आले.मुझ्झफरपुरला आल्यावर या दोघांनी किंग्जफोर्डच्या बंगल्याची टेहळणी  केली.त्यांनी त्याची चारचाकी व तिच्या घोड्याचा रंग पाहून घेतला.खुदिराम तर त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला नीट पाहूनही आला!
 ३० एप्रिल १९०८ रोजी हे दोघे नियोजित कामगिरीसाठी बाहेर पडले आणि किंग्जफोर्ड च्या बंगल्याबाहेर घोडागाडीतून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.बंगल्यावर टेहळणीसाठी असलेल्या २ गुप्त अनुचारानी त्यांना हटकले,पण त्यांना योग्य ती उत्तरे देऊन ते तेथेच थांबले.
 हिंदुस्तानातील पहिल्या बॉम्बचा स्फोट-
रात्री साडेआठच्या सुमारास क्लबकडून किंग्जफोर्डच्या गाडीशी साम्य असणारी गाडी दिसताच खुदिराम गाडीमागून धावू लागले.रस्त्यावर खूपच अंधार पडला होता.गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येताच त्यांनी दोन्ही हातानी बॉम्ब वर उचलला व नेम धरून पुढील चारचाकीवर जोराने आदळला. हिंदुस्तानातील या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज त्या रात्री तीन मैलापर्यंत ऐकू गेला आणि काही दिवसातच त्याचा आवाज इंग्लंड, युरोपलाही ऐकू गेला!
 खुदिराम यांनी किंग्जफोर्ड ची गाडी समजून बॉम्ब टाकला होता.पण त्या दिवशी तो थोड्या उशिराने क्लबबाहेर पडल्यामुळे वाचला.दैवयोगाने गाड्यांच्या साधर्म्यामुळे दोन युरोपियन स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागले! रातोरात खुदिराम व प्रफुल्लकुमार दोघेही २४ मैलावरील वैनी रेल्वेस्थानकापर्यंत अनवाणी धावत गेले.
 दुसर्या दिवशी संशयावरून प्रफुल्लकुमार चाकींना पोलीस पकडण्यासाठी गेले तेंव्हा त्यनी स्वतावर गोळी झाडून घेतली व प्राणार्पण केले.खुदिराम  यांना पोलिसांनी अटक केली.या ताकेचा शेवट ठरलेलाच होता.
 ११ ऑगस्ट १९०८ रोजी भगवदगीता हातात घेऊन खुदिराम धैर्याने व आनानदी वृतीने फाशी गेले!
 किंग्जफोर्ड ने घाबरून नोकरी सोडली आणि ज्या क्रांतीकारकांना त्याने छळले त्यांच्या भीतीने तो लवकरच मरण पावला! त्याचे नावनिशानही उरले नाही.
 खुदिराम मात्र मरूनही अमर झाले !
(साभार-स्थानिक वर्तमानपत्र )