शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

'दे घुमाके ' .... विश्वकप घेऊनच या !

काल ढाका येथील बांगबंधू स्टेडीयमवरील रंगारंग कार्यक्रमाने विश्वकप २०११ ची औपचारिक सुरवात झाली.उद्घाटन सोहळा बांगलादेशने अतिशय चांगल्या प्रतीने सर्व आशिया खंडातील संस्कृतीचे दर्शन घडवत 'दे घुमाके' प्रकारे  हजारो चाहत्यांच्या उपस्थित केला याबद्दल त्यांचे कौतुक  करायला हवे.
 आशिया खंडातील या विश्वकपचा हिंदुस्तान एक प्रबळ दावेदार आहे आणि हिंदुस्तान संघसुद्धा जोरदार जोशात आहे . हिंदुस्तान संघाने १९८३ ची पुनरावृत्ती करावी हि देशभावना आहे आणि आपला संघ देशाच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल अशी मला आशा आहे. तसेच हा आपल्या आवडत्या सचिनचा शेवटचा विश्वकप असण्याची शक्यता असल्याने त्याला  विश्वचषक उंचावताना पाहण्याची सर्व सचिन चाहत्यांप्रमाणे माझीही इच्छा आहे.
हिंदुस्तानच्या सांघाला एवढेच सांगणे आहे कि 'दे घुमाके' आणि विश्वकप घेऊनच या... सारा देश तुमचे अभिनंदन करण्यासाठी उस्तुक आहे.
क्रिकेटच्या या कुंभमेळ्यासाठी माझ्यातर्फे आणि तमाम मराठी ब्लॉगर आणि वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा !

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

केंजळगड ...राजांचा मनमोहन

केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर  धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.
 वैराटगड,केंजळगड,पांडवगड,कमळगड,पाचगणी,महाबळेश्वर,कोल्हेश्वर,रायगड,लिंगाणा,राजगड,तोरणा,सिंहगड,रोहीडा,पुरंदर,वज्रगड, हे दुर्ग दिसायला लागतात,तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून  प्रतापगड,चंद्रगड,मंगलगडहि दिसायला लागतात.केंजळगड नजीकच आहे.त्याचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड.हे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे.भोरहून कोरले,वडतुम्बीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपार्यंत चालत यायचं.इथे देवळात मुक्कामाला जागा आहे.गडावर मुक्कामाला जागा नाही.इथून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते.इथूनच त्या आश्चर्याला सुरवात होते.इथून दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. एक अतिशय उत्तम जिना दगडात कोरला आहे.डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छीन्नी लावून व्यवस्थित केली आहे.दुसर्या बाजूला मात्र दरी आहे.या अशा रानात पायरया कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते.त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत;पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत.पण केंजळगड केवळ ह्या पायर्यासाठी पाहायला जायला हवे.या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
( छायाचित्र- गुगल )

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

आजच्या मराठीची उत्पत्ती...सर्वकाही समष्टीसाठी

उत्तर राजस्थानात अल्वर गुरगाव, भरतपूर हे या क्षेत्रात येतं. मेवो जातीच्या गावात त्यांना मेवाती पण म्हणतात. यांची एक मिश्र बोली अहिरवाटी आहे. ती गुरगांव, दिल्ली, कर्नालच्या क्षेत्रात बोलली जाते. याच्यावर हरियाणीचा प्रभाव आहे. मेवातीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे. उत्तरी राजस्थानाचा निर्माण शौरसेनी अपभ्रंशाने झालेला आहे.
पूर्वी राजस्थानी : राजस्थानच्या पूर्व भागात जयपूर, अजमेर, किशनगड यात ही बोली बोलली जाते. ही बोली जयपुरी आहे. याचं केंद्र जयपूर आहे. जयपूरला धुंडानी पण म्हणतात, कारण त्या क्षेत्राचे नाव धुंडाणं आहे. शौरसेनी अपभ्रंशांनी विकसित या बोलीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे.
दक्षिणी राजस्थानी : इंदौर, उज्जैन, देवास, रतलाम, भोपाळ, हुशंगाबाद आणि त्यांच्या आजूबाजूची गावं या क्षेत्रात येतात. याची प्रतिनिधी बोली माळवी आहे. याचे मुख्य क्षेत्र माळवा आहे. शौरसेनी अपभ्रशांनी विकसित या बोलीमध्येसुद्धा पुरेसे लोकसाहित्य आहे.
पश्‍चिम पहाडी : जौनसार, सिरमऊ, शिमला, मंडी, चंबा आणि याच्या आजूबाजूची गावे यामध्ये येतात. यांच्या बोलीत केवळ लोकसाहित्य आहे.
मध्यवर्ती पहाडी : शौरसेनी अपभ्रंशानं विकसित या बोलीचं क्षेत्र गडवाल, कुमाऊ आणि याच्या आजूबाजूची गावं येतात. वस्तुत: गडवाली आणि कुमाऊ या दोन बोलीभाषांचे हे सामूहिक नाव आहे. यात साहित्य आणि लोकसाहित्य दोन्ही आहेत.
भोजपुरी : बिहारच्या शाहाबाद जिल्ह्याच्या भोजपूर गावच्या नावामुळे या बोलीचं नाव भोजपुरी पडलं आहे. मागधी अपभ्रंशांच्या पश्‍चिम रूपाच्या विकसित या बोलीमध्ये बनारस, जौनपूर, मिरजापूर, गाजीपूर, बलिया, गोरखपूर, देवरीया, आजमगड, बस्ती, शाहबाज, चंपारन, सारन आणि याच्या आजूबाजूची गावे आहेत. हिंदी प्रदेशाच्या बोलीभाषेत भोजपुरी बोलणारे सर्वात अधिक आहेत. भोजपुरीमध्ये मुख्यत: लोकसाहित्यच आहे. शिष्ट साहित्य फार कमी आहे. भारतेंदू, प्रेमचंद, प्रसाद या ठिकाणचे असूनही त्यांनी या भाषेचा साहित्यात कधी वापर केला नाही.
मगही : संस्कृत मगधपासून विकसित शब्द मगह हे नाव यावर आधारित आहे. ही बोली पटणा, गया, पलामू, हजारीबाग, मुंगेर, भागलपूर आणि याच्या आजूबाजूच्या गावात ही भाषा बोलली जाते. यांच्यात लोकसाहित्य व ललित साहित्य भरपूर प्रमाणात आहे.
मैथिली : मागधी अपभ्रंशाच्या मध्यवर्ती स्थाने विकसित ही बोली हिंदी आणि बंगालच्या सीमेवर मिथीलमध्ये बोलली जाते. दरभंगा, मुजकफ्फरपूर, पूर्णिया आणि मुंगेर हे यात येतं. लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून मैथिली भाषा फार संपन्न आहे आणि यातल्या साहित्य रचना अत्यंत प्राचीन काळापासून लिहिल्या गेल्या आहेत. हिंदी साहित्याला विद्यापतीसारखे प्रभावी कवी देण्याचं श्रेय मैथिलीलाच आहे. याव्यतिरिक्त गोविंददास, रणजीतलाल, हरीमोहन झा हेही चांगले साहित्यकार आहेत. आपण मराठी भाषेविषयीचे विवरणा करण्यापूर्वी अपभ्रंशी हिंदी भाषेचा विचार केला. आता मराठीचा करूया.
 अपभ्रंश हा संस्कृत शब्द आहे. अपभ्रंश म्हणजे उत्क्रांत. संस्कृतपासून भिन्नत्व पावणे म्हणजे अपभ्रंश पावणे. परिस्थिती परिमानाने व कालमानाने सुधारत जाऊन बदल होणे यालाच अपभ्रंश म्हणतात. अशा अपभ्रंशासाठी दोन शतकांचा काळ पुरेसा ठरतो. जो अपभ्रंश झाला. पुढे त्याचाही अपभ्रंश होण्यासाठी आणखी अवधी लोटावा लागतो. शके ८०० मध्ये महाराष्ट्री होती. शके १२०० मध्ये तिचे रूप मराठी होते. याचा अर्थ महाराष्ट्री अपभ्रंशित भाषा शके १००० मध्ये असावी. हिंदी भाषेसाठी शौरसेनी, मागधी, पैशाची अपभ्रंशित होत्या. महाराष्ट्राची अपभ्रंश, मात्र कुठल्याही महाराष्ट्री काळात अथवा तद्नंतरच्या काळात एखाद्या ग्रंथात सापडत नाही. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात त्यानुसार
ज्या प्रांताला हल्ली आपण ‘मथुरा मंडळ’ म्हणतो त्या प्रांताला पूर्वी ‘शूरसेन’ म्हणत असत. या प्रांतातल्या लोकांच्या मूळच्या भाषेला ‘शौरसेनी’ भाषा असे स्वतंत्र व निराळे नाव लोक योजू लागले. त्याचप्रमाणे गयेच्या आसपासचा जो मुलूख त्याला ‘मगध’ देश अशी संज्ञा होती. या प्रांतातल्या भाषेला ‘मागधी’ असे म्हणत. ‘बुखारा’, ‘पंजाब’ वगैरे प्रदेशांतल्या लोकांस ‘बाल्हीक’ असे म्हणत व हे ‘बाल्हीका’ लोक पिशाच्चांची संतती होय, असे महाभारताच्या कर्णपर्वात सांगितले आहे. म्हणजे या प्रदेशाला प्राचीन काळी ‘पैशाच देश’ असे म्हणत, हे उघड होते. या प्रदेशाची राजधानी ‘पैशाचपूर’ ऊर्फ ‘पेशावर’ ही होती. पैशाच देशाच्या राजधानीच्या शहरात व त्याच्याभोवती जी भाषा किंवा संस्कृत भाषेचे जे स्वरूप शिष्टांच्या भाषणात येई त्याला ‘पैशाची’ भाषा असे म्हणू लागले आणि त्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र’ या नावाने समजल्या जाणार्‍या प्रांतांत जी भाषा लोक वापरू लागले किंवा संस्कृताचे जे रूप शिष्ट लोक आपल्या व्यवहारात योजू लागले ते रूप ही ‘महाराष्ट्री’ भाषा होय.
वर सांगितलेल्या सर्व भाषा एकेकाळी या हिंदुस्थान देशात चालू होत्या, परंतु इतर बाबींप्रमाणे देशकालपरत्वे नित्यव्यवहाराच्या भाषेतही फेरबदल होऊ लागतो.
१. काही ग्रंथकारांच्या मते पेशावर ही प्राचीन राजधानी नसून ते शहर याहून अगदी भिन्न होते.
ती ‘स्थिर’ किंवा ‘कायमची’ अशी केव्हाही जिवंत राहू शकत नाही. या नियमानुसार ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या सर्व भाषांत निरनिराळे फरक झाले. यामुळे भाषेच्या रूपाहून भिन्न अशी नवी रूपे या भाषांस प्राप्त झाली. या नवीन व भिन्न रूपास त्या त्या भाषांचा ‘अपभ्रंश’ असे म्हणू लागले म्हणजे ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या चारही भाषांपासून ‘शौरसेनी-अपभ्रंश’, ‘मागधी-अपभ्रंश’, ‘पैशाची -अपभ्रंश’ व ‘महाराष्ट्री-अपभ्रंश’ असे चार अपभ्रंश सिद्ध झाले.
हे ‘अपभ्रंश’ किंवा या ‘अपभ्रंश-भाषा’ कालांतराने शिष्टत्व पावून त्या प्रदेशाची मूळ भाषा म्हणून मानल्या जाऊ लागल्या आणि हे झाले तेव्हा मूळ भाषांचा लोप होऊन गेला. त्या जनपदलोकातून अगदी नाहीशा झाल्या. या चार अपभ्रंशांपैकी महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासून म्हणजेच महाराष्ट्र अपभ्रंशापासून आपली आजची ‘मराठी’ भाषा उत्पन्न होऊ लागली. हळूहळू ‘महाराष्ट्री-अपभ्रंशा’चा लोप होऊन त्याची जागा ‘मराठी’ने घेतली व जनपदलोक जास्त जास्त वापरू लागल्यामुळे आणि अनेक बुद्धिमान ग्रंथकारांनी तिचा आदर केल्यामुळे ती शिष्टसंमत असे भिन्न धातूच्या रूपापासून ‘मराठी’ या नावाने प्रसिद्ध झाली. याच भाषेला मराठी ग्रंथकार ‘प्राकृत’ आणि ‘देशी’ अशी आणखी दोन नावे देतात.
- नामदेव ढसाळ


मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

हा 'उत्सव' चूक कि बरोबर ?

काही दिवसापूर्वी २६ जानेवारीला A WEDNESDAY हा चित्रपट  परत पाहण्याचा  योग आला थोडासा 'डोंबिवली फास्ट' धाटणीचा  हा सुद्धा, सामान्य माणूस सरकारी यंत्रणेला वैतागल्यावर काय करू शकतो किंवा त्याच्या  भावना काय असू  शकतात याची  उत्तम पद्धतीने मांडणी केलेले हे दोन चित्रपट. परंतु असे खरच होऊ शकते का ? किंवा सामान्य माणूस या पातळीवर उतरू शकतो का ? सामान्य माणसाने असे  काही केलेतर योग्य होईल का ? असे प्रश्न मनामध्ये  येत होते.
 आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज  आली आरुषीचे वडील राजेश तलवार यांच्यावर न्यायालय परिसरात एका माथेफिरूने धारदार  शस्त्राने डोक्यावर वार केले. सुरवातीला वाटले कोणीतरी माथेफिरूच असावा परंतु त्याचे नाव ऐकल्यावर ते ओळखीचे वाटले 'उत्सव शर्मा ' हाच तो ज्याने  या अगोदर असेच कृत्य केले होते. हरयाणाचा  माजी पोलिस महासंचालक एसपीएस राठोड चंडीगढ न्यायालयातून बाहेर येत असतानाच असाच  त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याचा अर्थ हे त्याने जाणून बुजून केले होते.त्याने असे का केले असावे या दोन्ही केसशी त्याचा दुराय्न्वे हि संबंध नाही मग त्याने असे पाऊल का उचलावे ? कोण हा उत्सव शर्मा ?

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन या संस्थेत अॅनिमेशन फिल्म डिझाईनचा विद्याथी असलेला उत्सव शर्मा हा एक हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. हा फक्त तो भावनिक  आहे. परंतु आपल्या देशात एवढ भावनिक राहून चालत का हो ? पण त्याला त्याची जाण नसावी अजून शिकत आहे ना त्यामुळेच. रुचिका प्रकरणावर तो एक डॉक्युमेंटरी बनवत होता त्यावेळी तो या केस शी जोडला गेला. रुचिका गिरहोत्रा या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या आणि तिच्या कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना राहते घर सोडण्यास भाग पाडणाऱ्या राठोडचा १९ वर्षांनीही न्याय झालेला नाही. पोलिस यंत्रणेत उच्चपदावर असलेल्या राठोडला वाचविण्यासाठी अख्खी व्यवस्था कशी कामाला लागली होती. न्यायालय त्याला शिक्षा देण्यास असमर्थ ठरत होते हे पाहूनच उत्सवने त्याच्यावर हल्ला केला होता.
 असाच काही  प्रकार आरुषी-हेमराज खून प्रकरणात झाला आहे. राजेश तलवार यांच्यावर स्वताच्या मुलीच्या खुनाचा आरोप आहे परंतु पुराव्या अभावी हि केस उभी राहू शकत नाही असे कारण देऊन सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.आणि राजेश तलवारची सुटका करण्यात आली आहे.सीबीआयलाही गुन्हा सिद्ध करता येत नाही आणि न्यायालयाला पुरावे हवे आहेत.ज्याच्याकडे पैसा,ताकत,सत्ता आहे तो काहीही करू शकतो आणि सुटू शकतो हे यावरून दिसून येते.
 मग न्याय कुठे आहे आणि सामान्य माणसाला तो कसा मिळणार ? कि पैसेवाले लोकशाहीची चेष्टा करत राहणार आणि सामान्य माणूस फक्त पाहत राहणार ?
 या अशाच घटनांमुळे आपल्या मनात हि चीड निर्माण होते आणि उस्तव सारखे लोक त्या रागाला अशाप्रकारे वाट मोकळी करून देतात त्याची पद्धत चुकीची जरूर असेल परंतु त्या सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत असे तुम्हाला वाटत नाही का ? जश्या त्या वरील २ चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 तलवार यांच्या हल्ल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता  पत्रकारांना तो म्हणाला 'मी भावनाप्रधान आहे.त्यामुळे या हल्ल्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.तुम्ही सर्वजण सध्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहतच आहात.आरुषी खुनाबद्दलही सर्वाना चांगलेच माहिती आहे.मात्र पुरावे नाहीत त्यामुळे इथे न्याय मिळणार नाही.सीबीआय  ने क्लोजर रिपोर्ट दिला आहे त्यामुळे पुढे काहीच होणार नाही.न्याय आपल्या मार्गाने जातो आणि आपण सर्वजण केवळ पाहत बसतो !या केसमध्ये तलवार चुकीचा आहे.रुचिका सारखीच हि केस हि अनेक वर्ष चालेल.मात्र हाती काहीच लागणार नाही. '
 उत्सव माथेफिरू आहे मानसिक रुग्ण आहे फक्त असे सांगून या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याने असे का केले,त्याच्यावर अशी वेळ का आली याचाही विचार होण्याची गरज आहे.आज अनेक गुन्हे करूनही कितीतरी लोक उथळ माथ्याने समाजात फिरत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा न्यायपालीकेवरील विश्वास कमी होत चालला आहे.सीबीआय सारख्या संस्थाही लाचार होत आहेत.त्यामुळे न्यायालयात अन्याय झालेल्याला न्याय मिळतो कि त्याच्यावर अजून अन्याय होतो असा प्रश्न पडायला लागला आहे.
 रोजच्या अशा घटनांमुळे  सामान्य माणसाचे मन मरून गेले आहे त्यांना याचे आता काहीच वाटत नाही आणि ज्याला काही वाटते तो असा 'उस्तव' बनतो.
मलातरी हा उस्तव चूक वाटत नाही तुम्हीच तुमच्या मनाला विचार आणि ठरवा हा 'उत्सव' चूक कि बरोबर.