मंगळवार, १८ जानेवारी, २०११

माय नेम इज सेन...


हक्क या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला कळतो आणि प्रत्येक जण आपापल्या हक्कांसाठी झगडत असतो. कधी कुटुंबाशी, कधी समाजाशी तर कधी स्वत:शी. काही असेही या जगात जन्माला येतात, जे फक्त स्वत:च्याच नाही तर संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी आपले आयुष्य वेचतात. गरीब व वंचित लोकांच्या प्रश्‍नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ, जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर्वी. तिथेच त्यांनी सामाजिक आरोग्यासाठी आपले जीवन झोकून दिले. त्यांनी त्यांच्या पत्नी एलिनासोबत मुक्ती मोर्चाच्या शहीद रुग्णालयाच्या उभारणीत फार मोठे योगदान केले. जनस्वास्थ्य संघटनेचेही ते सल्लागार आहेत. सुवर्ण पदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत. ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरचा हा अत्यंत हुशार डॉक्टर शपथ घेताना ताठ मानेने उभा होता. ‘मानवसेवा हा माझा पहिला धर्म’ असे प्रत्येकाने म्हटले पण सेनने या एका वाक्याला आपले जीवन बनवले. मोठ्या कंपन्या व हॉस्पिटल त्यांना बोलावत असतानाही त्यांचा निश्‍चय दृढ होता. दवाखान्याच्या नावाखाली छापखाना न टाकता खरंच समाजाची सेवा करायची याच हेतूने त्यांचा प्रवास सुरू झाला. 2004 मध्ये कॉलेजतर्फे त्यांना पॉल हॅरिसन पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या समाजकार्यासाठी मिटानीन व आशा हे दोन सरकारी उपक्रम रचताना सेन यांनी जीव ओतला. छत्तीसगड सरकारचे हे उपक्रम फारच उपयोगी ठरले. अजित जोगींच्या वर्तुळात सरकारच्या अनेक विषयांवर त्यांना सल्लागार म्हणून ओळखले गेले. छत्तीसगडमधील दुर्गम परिसरामध्ये राहून जनहिताचे कार्य करण्याचे धाडस या डॉक्टरने केले. कारण तेच त्याच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम सुरू केले. ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करायचे. छत्तीसगडमध्ये आरोग्याचे धडे देत ते सर्वांचे ‘हीरो’ झाले. त्यांना मिळणारा पाठिंबा आणि प्रेम हेच त्यांचे भांडवल होते. उपेक्षितांचा त्यांच्यावर वाढत चाललेला विश्‍वास अनेकांना खटकत होता. डॉ. सेन हे सामाजिक समतेचे आणि समाजवादी मूल्यांचे अनुयायी. एवढ्यावर त्यांना नक्षलवादी म्हणणे बरोबर नाही. दुर्दैवाने नक्षलवाद आणि ‘सलवा जुडूम’ या वावटळीत होरपळ डॉ. सेन यांच्या चळवळीची झाली. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीजचे रा्रीय सरचिटणीस म्हणून तुरुंगातील कैद्यांना भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग होता. या भेटी पोलिसांच्या परवानगीनेच व्हायच्या. तरीही 15 मे 2007 रोजी सेन यांना बिलासपूर येथे अटक करण्यात आली. नक्षलवाद्यांचा नेता नारायण सनयाल आणि उद्योगपती पीयूष गुहा यांच्यात जोडणार्‍या कडीचे काम केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. 25 मे 2007 पर्यंत रायपूर सेशन कोर्टाने त्यांचा ‘बेल’ नामंजूर केला. 26 मे ते 4 जून 2007, सेन यांच्या समर्थकांनी जागोजागी मोर्चे काढले. दिल्ली, रायपूर, कोलकाता, मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये लोक त्यांना मुक्त करावे यासाठी रस्त्यावर आले. संपूर्ण जगभरातील लोक या अटकेची दखल घ्यायला लागले. सेन यांच्या पत्नीने सर्व दरवाजे ठोठावले. नॅशनल ह्युमन राईटस् कमिशनलादेखील त्यांनी आपल्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची माहिती पटवण्याचा प्रयत्न केला पण सारे व्यर्थ. प्रत्येक वेळी कोर्टाची पायरी चढताना सेन हसतच चढले. त्यांचे म्हणणे असे की ‘‘मी खरेपणाने जगलो म्हणून मी हसत आहे. ही परीक्षा माझी नाही, ही परीक्षा या देशातील लोकशाहीची व मानवाधिकारांची आहे.’’ 15 मार्च 2008 पासून ते 11 एप्रिल 2008 त्यांना एकटे एका अंधार कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना वृत्तपत्रं देण्यात यायची पण महत्त्वाच्या घडामोडींची पाने काढून. जेलमधील लोकांनाही त्यांचे व्यक्तिमत्त्व जरा ‘हटकेच’ वाटायचे. एवढ्या प्रेमाने ते सर्वांशी बोलत की तुरुंगातील अधिकारीदेखील दुविधेत असायचे. 29 मे 2008 मध्ये जॉनेयन मॅन पुरस्कार त्यांच्या पदरी पडला. आरोग्य आणि मानवाधिकार या कार्यात मिळणारा हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. पण हिंदुस्थान आणि चायनातले साम्य इथे दिसून आले. त्यांना तो घेण्याकरिता जाऊ नाही दिले. नोबल पुरस्कार मिळालेल्या 22 महान व्यक्तींनी आपल्या रा्रपती व पंतप्रधानांना पत्र लिहून सेन यांना पुरस्कार घेऊ द्यावा अशी विनंती केली. सेन म्हणतात, ‘मानवाधिकारांची जाण समाजाला होणे हेच माझे ध्येय आणि हाच माझा पुरस्कार. सेशन कोर्टातून हायकोर्ट, तेथून सुप्रीम कोर्ट हा संपूर्ण प्रवास डॉ. सेन यांनी धैर्याने पार पाडला. 25 मे 2009 मध्ये त्यांना ‘बेल’ मिळाली. तब्येत खराब होत असल्यामुळे सुप्रीम कोर्टातील मार्कंडेय कतजु आणि जसटीस दीपक वर्मा यांनी सेन यांचा ‘बेल’ स्वीकारला. वर्ष उलटले, चित्र काही फार वेगळे नाही. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे तसेच प्रतिबंधित माओवादी संघटनेला मदत केल्याप्रकरणी रायपूर कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांचे वकील सुरेंद्र सिंग होते. ‘‘माझ्या घरात माओवादी’वरील पुस्तके मिळाली म्हणून जर मी माओवादी असेन तर स्वातंत्र्यावर लिहिलेली पुस्तके घरात असली म्हणजे ते स्वातंत्र्यसैनिक झाले का?’’ अशी थट्टा करत सेन यांनी सिंग यांच्याकडे केली. या सर्व केसमधील अनेक पुरावे ‘जर-तर’वर आधारित असले तरी आता निकाल लागलाय. अफझल गुरू व कसाब यांना दहशतवाद माजवताना आपण टीव्हीवर पाहिले तरी ते अजून आपले पाहुणे बनून राहिले आहेत. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक कसाबच्या केसमधील एक ‘विटनेस’ आहे. बहुतेक सरकारप्रमाणे हा ‘मानवाधिकार’ असावा कसाबकरिता मानवाधिकार म्हणजे काय हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे. उत्कृ डॉक्टर, आयुष्य वाहणारा मानवाधिकार कार्यकर्ता व उपेक्षांचा ‘हीरो’ डॉ. विनायक सेन हे आता आयुष्यभर तुरुंगात राहतील. पण या जन्मठेपेची बातमी कळल्यानंतरचे स्मितहास्य मात्र कुणी विसरू शकणार नाही. मानवाधिकार म्हणजे एकाचा अधिकार काढून दुसर्‍यास देणे नाही. प्रत्येकाने हे समजून वागावे. एखाद्याच्या अधिकारांसाठी लढताना सर्वांचा विचार असावा हेही तेवढेच खरे. सर्वांचे अधिकार महत्त्वाचे. देशाचेसुद्धा. डॉ. विनायक सेन यांच्या जन्मठेपेच्या बातमीने अनेकांचे डोळे भिजवले. पण निकाल ऐकल्यावर सेन यांचा शांत व हसरा चेहरा जणू म्हणत होता, ‘‘माय नेम इज सेन ऍण्ड आय एम नॉट अ टेररिस्ट.’’
(Article in Samana by dr.swapnapatker@gmail.com)