fort in maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
fort in maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ मार्च, २०१२

माहुली .. सुळक्यांचा गड


माहुलीला सुळक्यांचा गड असेच म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार झालेला एक दुर्गही म्हणता येईल. माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक करणारी वाट आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश करता येतो.
 माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड असे उपदुर्ग आहेत.नवरा-नवरी भटोबा शंकर,ब्रह्मा,वजीर,चंदेरी, असे अनेक सुळके म्हणजेच लिंग्या आहेत.या दुर्गावरून शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार चालवला.१६५७ मध्ये शिवाजीमहाराजांनी कोकणातले बरेच दुर्ग जिंकून घेतले.त्यात महुलीही जिंकला.पुरंदरच्या तहात तो मुघलांना द्यावा लागला.
 सध्या गडावर जुने अवशेष शिल्लक आहेत.दुर्गाची वाताहत किती आणि कशी होते,त्याचे इतर दुर्गांसारखे महुलीही एक उदाहरण आहे.इ.सन.१६७० मध्ये ऐन पावसाळ्यात या दुर्गावर हल्ला चढवून तो दुर्ग जिंकला.राजांच्या या विजयाने अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.इंग्रजांनी त्याची नोंदही केली आहे.
एका मुघलाने महुलीविषयी लिहिले आहे, "पावसाळ्यात जवळचे काही दिसत नाही.अंधारया रात्री तर हाताला हाताची ओळख पटत नाही ... ही तळकोकणची राजधानीच आहे.किल्ला अतिशय मजबूत आहे..."
 गडावर अजूनही रान आणि उंच गावात आहे.रात्री मुक्काम केला,तर जंगली प्राणी दिसतात.पूर्वी तळातील जंगलात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असल्याची नोंद आहे.भव्यता,रौद्रता.जंगल,अफाट पाऊस अशा नैसर्गिक अनेक कारणांनी माहुली अवघड झाला आहे.त्याचे सुळके हे त्या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे आणि त्या सुळक्यांच्या अवघड चढणीचे आवाहन महाराष्ट्रातील युवकांनी पेललेले आहे.
  अगदी यशस्वीपणे.वजीर,विष्णू,नवर्याची करवली,भटोबा,असे अतिअवघड सुळके इथले युवक लीलया चढून गेले आहेत.तीन दुर्गांचा मिळून झालेला माहुली त्याच्या बळकटीपणाची साक्ष देत उभा आहे.

बुधवार, २७ जुलै, २०११

राजमाची... एक जोड किल्ला


राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे.त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य. श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत.कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो.लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते,तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता येते.उढेवाडी एक छोटे टुमदार गाव आहे.'राजमाची ग्रामसहाय्य योजना' या मुंबईच्या संस्थेने या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी बर्याच योजना राबवल्या आहेत.
 समोरच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे.दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये जवळच पाण्याची टाकी आहेत.मनरंजन या बालेकिल्ल्यापेक्षा श्रीवर्धनची उंची थोडी अधिक आहे.दुर्गात लेणी आहेत.वरून मोठा प्रदेश पाहता येतो.विसापूर,लोहगड,धक,माहुली,माथेरान असा चौफेर प्रदेश दृष्टीपथात येतो.
 राजमाचीचे हे दोन बालेकिल्ले स्वतंत्र दुर्ग मानले जात.या दोघांचे हवालदार वेगवेगळे असत. शिवाजीमहाराजांनी इ.स.१६६१ मध्ये महिनाभर श्रीवर्धन गडावर मुक्काम केला होता.गडाभोवती दाट झाडी आहे.त्यात बिबट्याचा वावर आहे.एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे.
राज्यवहारकोषात बालेकिल्ल्याचा 'अधित्यका' असा शब्दप्रयोग केला आहे.दोन बालेकिल्ले हे एकमेकास पूरक आहेत,म्हणून बांधून काढावेच लागले.अर्थात,दोन्ही अधित्यकांचा पसारा मोठा असल्याने स्वतंत्र गड म्हणूनही गणले जाऊ लागले.दोन अधित्यका आणि तेच दोन स्वतंत्र गड असे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.पाण्याची टाकी ,लेणी,दरवाजे,तटबंदी अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत.खंडाळ्याच्या घाटातून एका बोगद्यातून दुसर्या बोगद्यात जाणार्या आगगाड्या न्याहाळताना फारच मजा येते.
  

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

रेवणीचे अवशेष आढळणारा ... कंधार

मराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे.त्याची तटबंदी शाबूत आहे.खंदक पाण्याने भरलेला आहे.खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे.तीस मीटर्स तरी असेल.खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते! काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी.राष्ट्रकुट,यादव,खलजी,तुघलक,बहमनी,बरीद्शाही,निजामशाही,मुघल,निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून  राज्य केले.
 कंधारच्या या स्थलदुर्गात जुने अवशेष इतस्ततः पडलेले आहेत.राणीमहाल,बुरुज,तटबंदी,तोफांचे गाडे,दगडी जिने,बारादरी,मशीद,मूर्तीचे अवशेष,बारुदखाना,शीशमहाल,हौद,कारंजी असे बरेच कंधारमध्ये बघण्यासारखे आहे.
 लालमहाल आणि जवळची विहीर हि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.मूर्तीचे जे अवशेष आहेत,त्यापैकी एका मूर्तीचा एक पायाचा पंजाच काय तो राहिला आहे.पण त्यावरून ती मूर्ती किती विशाल असेल याची कल्पना आपल्याला येते.ती मूर्ती अंदाजे २२ मीटर्स उंच असावी !
  कंधार दुर्गाची उभारणी,तोफा हिंदुस्तानात येण्याच्या आधीची अस्लुअने त्याच्या प्रवेश्द्वाराविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.हा द्वारसमूह देखणा आणि बळकटहि आहे.लाकडी दरवाजा हा पूर्वी बाहेरून दिसत असल्याने ज्यावेळी शत्रुजवळ तोफा आल्या आणि दरवाज्यावर मारा होऊ लागला,त्यावेळी त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली.त्या लाकडी दरवाजासमोर एक अतिशय भक्कम भिंत उभारण्यात आली.अशा बांधकामाला जीभी अथवा हस्तीनख असे म्हणतात.असे बांधकाम कंधारच्या दुर्गाला आहे.
 दुर्ग अभ्यासकांनी कंधार अवश्य पाहिलाच हवा.स्थलदुर्गाला आवश्यक अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गबांधणीचे आवशेष पाहावेत.एक गोष्ठी इथेच आहे परंतु खूप शोध घेतल्यावर दिसते.खंदकाच्या भोवतीच वलय म्हणजे रेवणी.रेवणीचे अवशेष येथे आढळतात.ते पाहण गरजेचे आहे.इंग्रजीमध्ये त्याला 'कव्हर्ड वे' असे म्हणतात .

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

केंजळगड ...राजांचा मनमोहन

केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर  धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.
 वैराटगड,केंजळगड,पांडवगड,कमळगड,पाचगणी,महाबळेश्वर,कोल्हेश्वर,रायगड,लिंगाणा,राजगड,तोरणा,सिंहगड,रोहीडा,पुरंदर,वज्रगड, हे दुर्ग दिसायला लागतात,तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून  प्रतापगड,चंद्रगड,मंगलगडहि दिसायला लागतात.केंजळगड नजीकच आहे.त्याचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड.हे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे.भोरहून कोरले,वडतुम्बीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपार्यंत चालत यायचं.इथे देवळात मुक्कामाला जागा आहे.गडावर मुक्कामाला जागा नाही.इथून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते.इथूनच त्या आश्चर्याला सुरवात होते.इथून दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. एक अतिशय उत्तम जिना दगडात कोरला आहे.डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छीन्नी लावून व्यवस्थित केली आहे.दुसर्या बाजूला मात्र दरी आहे.या अशा रानात पायरया कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते.त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत;पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत.पण केंजळगड केवळ ह्या पायर्यासाठी पाहायला जायला हवे.या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
( छायाचित्र- गुगल )

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

देवगिरी ... एक मिश्रदुर्ग

देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन   शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या  ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची  राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द  आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
 देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही  आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत.  अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि  आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने  वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची  आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.१४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
 या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

शनिवार, २७ मार्च, २०१०

साल्हेर ... एक बुलंद किल्ला

साल्हेरचा बुलंद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे.त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३ मीटर्स आहे.त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे.तो साल्हेरचा उपदुर्ग आहे.एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक ठरतो,म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात.साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या,रतनगड (नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात.पश्चिमेला अजंटा-सातमाळा रांग दिसते.सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत.त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे.साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर  यावयास पायवाट आहे.इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.
 इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.या युद्धाचे मोठे रंजक वर्णन बखरीत आले आहे.
'एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला कि  तीन कोश औरस-चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्द जाहले.घोडी,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजीयाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव जाहला.ऐसा कुल सुभा बुडवला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.'



 या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.'भारती जैसा कर्ण तैसा' असे त्याचे वर्णन आले आहे.साल्हेर दुर्गाच्या सालोट्याच्या बाजूस खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी हि अभ्यासण्यासारखी आहेत,पण दुसर्या बाजूकडचे दगडात कोरलेले कठडा असलेले कड्याच्या टोकावरचे जिने आपल्याला थक्क करतात.कोणी केले असेल हे काम ????

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

वसई... चिमाजीअप्पांच्या स्मृती

उल्हास नदी जिथे समुद्राला मिळते,तिथे नदीच्या मुखावर वसईचा दुर्ग बांधलेला आहे.शिवाजीमहाराजांनी कल्याण आणि भिवंडी येथे आपले आरमार बांधावयास काढले.रुय लेन्ताव ह्विअगस आणि फेर्नाव व्हीअगस हे पोर्तुगीज बापलेक जवळ जवळ ४०० लोकांसह शिवाजीमहाराजांचे आरमार बांधत होते.शिवाजीराजांनी वसईच्या कॅप्टन आंतुनियु द मेलू द काश्त्रू याला पाठविलेले एक पत्र मिळाले आहे.त्यात राजांनी म्हंटले आहे,'आमची जहाजे बाहेरून लाकडे घेऊन येतील आणि नंतर उल्हास नदीतूनच आमच्या गुराबा,जहाजे सागरात शिरतील,तरी त्यांच्यावर तोफा दगू नयेत...'
Bassein Fort
वसईच्या कॅप्टन ने हे पत्र गोव्यात पाठवले.तेथे सभा भरून सौम्य शब्दात प्रतिबंध करण्याचे ठरले.ह्विअगस बापलेकांना मुंबईला बोलावून कानपिचक्या दिल्यावर,तेही आपल्या लोकांसह रातोरात पळाले.शेवटी आपल्याच लोकांनी हि जहाजे बांधली आणि अंधाराचा फायदा घेऊन वसईजवळूनच सागरात लोटली.
मूळ भेंगळ्याचा दुर्ग पुढे पोर्तुगीजांनी परत बांधून काढला.उत्तर फिरंगणात वसईच्या दुर्गाचा दबदबा मोठा होता.काही मंदिरे आहेत.आतील 'सिटाडेल' म्हणजे अर्क हेदेखील अभ्यासण्यासारखे आहे.खाडी,सागर आणि दलदल यांनी वेढल्याने वसईचा दुर्ग हा फार बळकट बनला होता.अणजूर गावचे गंगाजी नाईक यांनी पेशव्यांना पोर्तुगीजांच्या अत्याचाराची कल्पना दिल्याने पेशव्यांनी उत्तर फिरंगणात स्वारी केली.वसईलाही वेढा बसला,पण पोर्तुगीजांनी अत्यंत नेटाने किल्ला लढवला.शेवटी चिमाजी अप्पा पेशव्यांच्या आवाहनाने मराठी सेनेने मोठाच एल्गार केला आणि सुरुंग लावून तट उडवला.तुफान मारामारी होऊन ५ मे १७३९ रोजी पोर्तुगीज शरण आले.१२ मे रोजी त्यांनी रूरमार्च काढून बैंड वाजवत ते किल्ल्याला पडलेल्या खिंडारातून बायका मुलांसमवेत बाहेर आले आणि किल्ल्याला वळसा घालून जहाजात बसून गोव्यात गेले.
या वसईच्या दुर्गाच्या सां सेबांशिया बुरजाच्या खाली,एक अत्यर्क गोष्ट आहे.वसईच्या कॅप्टन च्या घराजवळच बुरजाच्या तटाखालून ५५० फुट (१७७ मी.)लांबीचे एक मोठे भुयार काढले आहे.
Enhanced by Zemanta

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

संपन्नताही बळकट ...

मागील लेखात आपण दुर्गांच्या परिभाषा व दुर्गवर्गातील शब्द,याबाबत माहिती घेतली होती.वेगवेगळ्या व्यक्तींनी किल्ल्यांबद्दल वेगवेगळे वर्णन केले आहे.
Kamalgad fort, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
जेम्स डग्लस नावाच्या इंग्रजाने 'तोरणा'किल्ल्याबद्दल म्हंटले आहे,'सिंहगड हि सिंहाची गुहा असेल,तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.'अशा प्रकारे गडकोट किल्ल्याबद्दल आपली मते प्रदर्शित केली आहे.
मुल्ला नस्त्रती नावाच्या विजापुरी कवीने 'तोरणा'किल्ल्याबद्दल लिहिले आहे,'शिवाजी राजांचाच एक अवघड गड होता,उंचीने तो आकाशापेक्षा श्रेष्ठ होता.दूरस्थ पाहणार्याला त्याची विशालता पाहून असे वाटे कि,पृथ्वी डोक्यावर घेऊन जणू आकाश उभे आहे.वसंत ॠतू गडावर नुसता मुसमुसत असतो.असे वाटते कि हवेत दुसरेच जग वसलेले आहे.गडावरील प्रत्येक गल्लीत पाण्याचा उत्तम प्रकारचा कालवा वाहत आहे.प्रत्येक ठिकाणी मिस्त्र-इजिप्त सारखी संपन्नता आहे.प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहत आहे.स्वर्गातून इंद्र उतरून अधूनमधून याच गडावर राहून आपली सुख कालक्रमणा करीत असावा.'
अशा प्रकारचे दुर्गवैभव हे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे व त्याची वैशिष्टे पाहिलीच पाहिजेत.साल्हेरच्या शैलकडा आणि खडकात कोरलेल्या जिन्यांच्या वाटा,देवगिरीच्या खंदक आणि अंधारी,अलंगची टाकी,धोडपची फोडलेली माची,हष्रची दगडांत कोरलेली वाट,अंकाई ची लेणी,हडसरचे दगडात कोरलेले दरवाजे,शिवनेरीचे सात दरवाजे,राजगडच्या माच्या व बालेकिल्ला.रायगडचे टकमक टोक,जंजीरयाचा अभेद्य बुरुज,विजयदुर्गची तिहेरी तटबंदी,लोहगडचा गेट-वे म्हणजे द्वारमंडळ आणि खंदक,परंड्याच्या तोफा,औशातील जमिनीखालच्या विहीर,पन्हाळ्यावरील कोठारे,कंधारची जीभी अशी अनेक किल्ल्यावरची वेगळी वैशिष्टे अभ्यासून पहावीत.
दुर्ग दुर्गम करावयाचे अनेक प्रकार पाहण्यात येतात.दगड वापरून दुर्ग बळकट करतातच,पण दगड काढून नह्वे; तर दगड अदृश्य करूनसुद्धा दुर्ग अभेद्य केल्याची उदाहरणे आहेत.
राजगडचे उदाहरण द्यायचे झाले,तर राजगडच्या तीन माच्या आणि अभेद्य बालेकिल्ल्याला लागलेला एकून दगड अंदाजे २० दशलक्ष टन आहे.एवढा दगड कोठून आणला,त्याच्या खुणाही तेथे नाहीत.दगडाची खाणही जवळ आढळत नाही.पाण्याच्या टाक्यातून जर दगड काढला असे म्हणावे, तर तेथून काढलेला एकून दगड अंदाजे ३ लक्ष टन एवढाच भरेल,मग उरलेला १७ लक्ष टन दगड कोठून आणला असेल?प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
दुसरे उदाहरण आहे दगड काढू टाकून दुर्ग बळकट करण्याचे.खर तर हे थोड चमत्कारिकच वाटते;पण याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगिरी.येथे दगड काढून टाकून दुर्ग बळकट केल्याचे आढळून येते.संभाजीनगर जवळ देवगिरीचा ह डोंगर आहे.किमान अंदाजे ८० लाख टन दगड डोंगरातून काढून टाकलेला आहे.खंदकाच्या तळापासून वरपर्यंत छिन्नी लावलेली उंची ५० मीटर तरी नक्कीच आहे.ऐन खंदक हि १०ते१२ मीटर खोल आहेत.या खंदकातून वर गेल्यावर पुन्हा दगड काढून एक चक्राकार वाट केलेली आहे.या वाटेला 'अंधारी'असे म्हणतात.देवगिरी दुर्गच्या खोदकामाला राष्ट्रकुंतानि सुरवात केली असावी.वेरुळच्या लेण्यांच्या खोदकामाच्या वेळेस हे खोदकाम झाले असावे.'अंधारी'चे प्रवेशद्वार त्याला साक्ष आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड काढून दुर्ग अभेद्य केल्याचे हे एक अपूर्व उदाहरण आहे.
तिसरे उदाहरण म्हणजे दगड अदृश्य केल्याचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला वाघोटन नदीच्या मुखाशी 'विजयदुर्ग' हा किल्ला आहे.तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला खुश्की असे त्याचे स्वरूप आहे.एका ठिकाणी तीन,तर एका ठिकाणी चार तटबंद्या बांधून दुर्ग बळकट केला आहे.
१९९१ मध्ये गोव्याची 'नॅशनल इंस्तिट्यूट ऑफ अशिनाग्राफी' आणि 'वेस्टर्न नेव्हल कमांड' यांनी एक संयुक्त मोहीम राबवली होती.पाणबुडे पाण्यात उतरवून त्यांनी अभ्यास केला.तेथे १२२ मीटर लांब व ७ मीटर रुंद आणि ३ ते ४ मीटर उंच अशी भिंत आढळून आली.प्रचंड आकाराच्या शिळांचा वापर तेथे त्या भिंतीसाठी केल्याचे आढळले.हि भिंत वरून दिसत नाही.म्हणजेच दगड अदृश्य आहे.१७२० च्या आसपास काही इंग्रजी जहाजे या भिंतीला आदळून फुटली.गोव्याच्या पोर्तुगीजांना इथे समुद्रात काहीतरी बांधकाम आहे याची कल्पना होती.दुर्ग अभेद्य करण्याचे हे अजोड उदाहरण आहे;पण ते अदृश्य आहे,अशी अनेक वैशिष्टे आपल्याला दुर्गकोटांच्या बाबत आढळून येतील.
या व अशा अनेक गोष्टींचा आपापल्या परीने वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी अभ्यास केला आहे.अनेक वैशिष्टे निदर्शनास आणून दिलेली आहेत.मात्र,यांची सांगड विज्ञान युगात घालणे महत्वाचे वाटते.
इतिहासकारांनी हि दुर्गांसंबंधी अभ्यास केला आहे.त्यासंबंधी सापडलेले अनेक दाखले अभ्यासलेले आहेत.दुर्ग्कोत बांधताना त्यांची वैशिष्टे काय,कोट बळकट करताना घेतलेली काळजी व रचना,नैसर्गिक वैशिष्टे,यासबंधी अनेक संशोधकांनी आपली मते वेगवेगळ्या स्वरुपात मांडलेली आहेत.
श्री.प्र. के.घाणेकर यांनी गडांची दुर्गमता व गडावर कसे जावे,काय काळजी घ्यावी,फुले व विविध वनस्पती कुठे व कशा आढळतात यासंदर्भात अभ्यासपूर्ण लेख व पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.त्याचप्रमाणे श्री.दांडेकर यांनी गोष्टीरूपात शिवसामर्थ्य,तेथील लोक,गडकिल्ले,यासंदर्भात तसेच स्वता पायी फिरून आलेले अनुभव व अनेक किल्ल्याची उत्कृष्ट छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत.गावात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या फौजेत असलेले लोक यांच्या संदर्भात अनेक आख्यायिका जिवंतपणे लोकांसमोर मांडल्याआहेत.
Enhanced by Zemanta

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

आपल्या गडकोटांबद्दल...( 2 )

रामायण व महाभारतातही दुर्गांविषयी चर्चा केली आहे.त्याकाळातही दुर्गांविषयी अभ्यासपूर्ण दाखले आजही आपल्याला अनुभवास येतात.
Purandar FortImage by Himanshu Sarpotdar via Flickr
शांतीपर्वामध्ये भीष्मांनी दुर्गाची महती सांगितलेली आहे.एके ठिकाणी भीष्म म्हणतात'एखादा आपल्यापेक्षा बलवान अशा राजाकडून आपल्याला त्रास होत आहे असे वाटल्यास,सुरक्षेसाठी बुद्धिमान राजाने दुर्गाचा आश्रय करावा...दुर्गाभोवती असणार्या क्षुद्र वृक्षाची मुळे तोडून टाकावीत...अश्वत्थ वृक्षाची मुळे मात्र तोडू नयेत.मोठमोठे वृक्ष असतील तर त्याच्या फांद्या तोडाव्यात.अश्वतथ दुर्गाच्या तटावर,कोण लोक येतात,कशासाठी येतात,त्याच्यासाठी त्यांच्यावर बारीक तेहलनी करण्यासाठी,त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व बाजूस किंवा चोहोबाजूंनी चौक्या ठेवाव्यात व त्यावर अतिशय शूर,चाणाक्ष लोकांचा पहारा असावा.
तटावरच्या लोकांना बाहेरच्या गोष्टी दिसण्याकरता भिंतीला झरोके असावेत.बाहेरून येणाऱ्या लोकांना आपणावर नजर आहे याची जाणीव असणार नाही.व वेळ प्रसंगी याच भोकातून तीर वैगेरेचा मारा करता येईल,अशी व्यवस्था करावी.
दुर्गाच्या भोवतालचा खंदक मासे,नक्र इत्यादींनी परिपूर्ण असावा,किंवा त्यात जागोजागी शूल उभे केलेले असावेत.नगरातल्या लोकांना संकटकाळी बाहेर निघता यावे म्हणून सूक्ष्म दरांची किंवा चोर दरवाजा-गुप्त भूयारांची योजना असावी.या दारावरही चौकी,पहारे असावेत.दुर्गाच्या जवळच किंवा अगदी थोड्या अंतरावर काही अचानक घडल्यास तातडीने सैन्याची कुमक पोचावी म्हणून सैन्याचा तळ असावा.
जेथे चिखल नसेल,पाणी जवळ नसेल,सेतू प्रकारादिकांचे भाग व ढेकळे नसतील अशाच ठिकाणी अश्वभूमी असावी किंवा तयार करावी.रथदलाला मात्र सपाट,चिखल व कुठेही शक्यतो खाचखळगे नसलेली जागा प्रशस्त म्हणजेच योग्य होय.
लहानलहान वृक्ष,अरण्य व जवळ पाणी किंवा हत्तीसाठी पुरेसे व मुबलक पाणी असलेला प्रदेश गजदलासाठी अतिशय योग्य.सभोवती डोंगराळ जागा,अनेक दुर्ग,तसेच कणक आणि देव यांनी प्रदेश युक्त असून,त्याच्या समीप पर्वत,उपवने असतील तर ती जागा पायदलासाठी प्रशस्त होय.सैन्यात पायदळ असणे सर्वदा श्रेयस्कर होय.
रामायणाचा जरी अभ्यास केला तरी त्या काळी दुर्गांची माहिती होती असे आढळून येते.
हनुमान लंकेत जाऊन आल्यावर त्याने लंकेच्या दुर्गाचे वर्णन केलेले आढळून येते गडांची निर्मिती करताना वापरलेले तंत्र,भौगोलिक परिसराचा अभ्यास,गडावर शत्रू पोचू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना,अडचणीच्या वेळी गडावरून सहज निघून जाता यावे म्हणून केलेई विशिष्ट गुप्त वाट तटबंदीवरून शत्रूला हेरण्यासाठी केलेले झरोके इत्यादी गोष्टींचा अभ्यास व त्याकाळातही अतिशय कल्पकतेने निर्मिलेले दुर्ग यांचा सर्व बाजूने विचार करणे २१ व्या शतकातही अतिशय महत्वाचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा गडकोट बांधले मात्र,याच गडकोट दुर्गांच्या जोरावर त्यांनी शत्रूला नामोहरम केले.साल्हेर अहिवंतापासूनते जिंजी तंजावरपर्यंत दुर्गांची शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.
शिवप्रभू एकदा म्हणाले,आज हजरतीस३६० दुर्ग आहेत.खासा आलमगीर एक दिवस दख्खनेत उतरेल.त्यावेळेस माझा एक एक दुर्ग त्यावेळेस एक एक वारूस झुंजवेल.औरंगजेबास अख्खी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षाचे आयुष्य लागेल.
शिवप्रभूंच्या मृतुनंतर औरंगजेब दक्षिणेस पुरया ताकदीनिशी उतरला आणि पुढची २६ वर्ष तो इथेच राहिला.त्या अवधीत त्याने आदिलशाही,कुतुबशाही जिंकली,२०० वर्ष चाललेल्या या शाह्या औरंगजेबाने त्या एका आचमनात गिळल्या.परंतु गडकोटानी भरलेले हे मराठा राज्य काही त्याला जिंकता आले नाही.शेवटी हतबल होऊन हा दिलीन्द्र यमालयाक्षयास गेला ते हे राज्य.
गडकोट किल्ल्याच्या जोरावर मराठी साम्राजाला जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
Enhanced by Zemanta

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

आपल्या गडकोटांबद्दल....

गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.

दुर्गमता हा गडाचा गाभा होता.शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई.नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.
Entrance to Karnala fort, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
तरीही शत्रू बलाढ्य असेल,तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली.मात्र,असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे,परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे.भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
मात्र,हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले.त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले.परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली.वास्तुरचना,स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.
आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते.मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे.त्याचा आशय असा आहे-'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत - १]धनुदुर्ग २] महीदुर्ग ३] अब्ददुर्ग ४] वाक्ष्रदुर्ग ५] नृदुर्ग ६]गिरिदुर्ग
ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही,त्यास 'धनदुर्ग' म्हणतात.
ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे,युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल,ज्याला झरोक्यानीयुक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत,अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.
अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.
तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.
गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.
तर आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.
२१ व्या शतकातील युवा पिढीसाठी या गडकोटांचे महत्व समजावून त्याचा अभ्यास करण्यास उदुय्क्त करण्यासाठी,त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी,गडाची बांधणी करताना तो डोंगर का निवडला,त्या भोवती असलेली साधनसामग्री,तेथे राहणारे लोक,त्या भागात असलेली पाण्याची व्यवस्था,तेथून मिळणारे शेताचे उत्पन्न या गोष्टींचा निश्चितच विचार करून गडांची बांधणी कशी झाली त्यासाठी गडाची एका वेगळ्या माध्यमातून ओळख करून देण्यासाठी हि लेखमाला सुरु करीत आहे.
हि माहिती विविध वर्तमानपत्रातून कात्रणे करून मिळवलेली असून ती माझ्याकडे खूप वर्षापासून आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
जय शिवराय !
Enhanced by Zemanta