दुर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ मार्च, २०१२

माहुली .. सुळक्यांचा गड


माहुलीला सुळक्यांचा गड असेच म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार झालेला एक दुर्गही म्हणता येईल. माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक करणारी वाट आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश करता येतो.
 माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड असे उपदुर्ग आहेत.नवरा-नवरी भटोबा शंकर,ब्रह्मा,वजीर,चंदेरी, असे अनेक सुळके म्हणजेच लिंग्या आहेत.या दुर्गावरून शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार चालवला.१६५७ मध्ये शिवाजीमहाराजांनी कोकणातले बरेच दुर्ग जिंकून घेतले.त्यात महुलीही जिंकला.पुरंदरच्या तहात तो मुघलांना द्यावा लागला.
 सध्या गडावर जुने अवशेष शिल्लक आहेत.दुर्गाची वाताहत किती आणि कशी होते,त्याचे इतर दुर्गांसारखे महुलीही एक उदाहरण आहे.इ.सन.१६७० मध्ये ऐन पावसाळ्यात या दुर्गावर हल्ला चढवून तो दुर्ग जिंकला.राजांच्या या विजयाने अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.इंग्रजांनी त्याची नोंदही केली आहे.
एका मुघलाने महुलीविषयी लिहिले आहे, "पावसाळ्यात जवळचे काही दिसत नाही.अंधारया रात्री तर हाताला हाताची ओळख पटत नाही ... ही तळकोकणची राजधानीच आहे.किल्ला अतिशय मजबूत आहे..."
 गडावर अजूनही रान आणि उंच गावात आहे.रात्री मुक्काम केला,तर जंगली प्राणी दिसतात.पूर्वी तळातील जंगलात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असल्याची नोंद आहे.भव्यता,रौद्रता.जंगल,अफाट पाऊस अशा नैसर्गिक अनेक कारणांनी माहुली अवघड झाला आहे.त्याचे सुळके हे त्या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे आणि त्या सुळक्यांच्या अवघड चढणीचे आवाहन महाराष्ट्रातील युवकांनी पेललेले आहे.
  अगदी यशस्वीपणे.वजीर,विष्णू,नवर्याची करवली,भटोबा,असे अतिअवघड सुळके इथले युवक लीलया चढून गेले आहेत.तीन दुर्गांचा मिळून झालेला माहुली त्याच्या बळकटीपणाची साक्ष देत उभा आहे.

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

रेवणीचे अवशेष आढळणारा ... कंधार

मराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे.त्याची तटबंदी शाबूत आहे.खंदक पाण्याने भरलेला आहे.खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे.तीस मीटर्स तरी असेल.खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते! काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी.राष्ट्रकुट,यादव,खलजी,तुघलक,बहमनी,बरीद्शाही,निजामशाही,मुघल,निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून  राज्य केले.
 कंधारच्या या स्थलदुर्गात जुने अवशेष इतस्ततः पडलेले आहेत.राणीमहाल,बुरुज,तटबंदी,तोफांचे गाडे,दगडी जिने,बारादरी,मशीद,मूर्तीचे अवशेष,बारुदखाना,शीशमहाल,हौद,कारंजी असे बरेच कंधारमध्ये बघण्यासारखे आहे.
 लालमहाल आणि जवळची विहीर हि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.मूर्तीचे जे अवशेष आहेत,त्यापैकी एका मूर्तीचा एक पायाचा पंजाच काय तो राहिला आहे.पण त्यावरून ती मूर्ती किती विशाल असेल याची कल्पना आपल्याला येते.ती मूर्ती अंदाजे २२ मीटर्स उंच असावी !
  कंधार दुर्गाची उभारणी,तोफा हिंदुस्तानात येण्याच्या आधीची अस्लुअने त्याच्या प्रवेश्द्वाराविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.हा द्वारसमूह देखणा आणि बळकटहि आहे.लाकडी दरवाजा हा पूर्वी बाहेरून दिसत असल्याने ज्यावेळी शत्रुजवळ तोफा आल्या आणि दरवाज्यावर मारा होऊ लागला,त्यावेळी त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली.त्या लाकडी दरवाजासमोर एक अतिशय भक्कम भिंत उभारण्यात आली.अशा बांधकामाला जीभी अथवा हस्तीनख असे म्हणतात.असे बांधकाम कंधारच्या दुर्गाला आहे.
 दुर्ग अभ्यासकांनी कंधार अवश्य पाहिलाच हवा.स्थलदुर्गाला आवश्यक अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गबांधणीचे आवशेष पाहावेत.एक गोष्ठी इथेच आहे परंतु खूप शोध घेतल्यावर दिसते.खंदकाच्या भोवतीच वलय म्हणजे रेवणी.रेवणीचे अवशेष येथे आढळतात.ते पाहण गरजेचे आहे.इंग्रजीमध्ये त्याला 'कव्हर्ड वे' असे म्हणतात .

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

देवगिरी ... एक मिश्रदुर्ग

देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन   शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या  ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची  राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द  आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
 देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही  आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत.  अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि  आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने  वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची  आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.१४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
 या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

शनिवार, २७ मार्च, २०१०

साल्हेर ... एक बुलंद किल्ला

साल्हेरचा बुलंद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे.त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३ मीटर्स आहे.त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे.तो साल्हेरचा उपदुर्ग आहे.एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक ठरतो,म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात.साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या,रतनगड (नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात.पश्चिमेला अजंटा-सातमाळा रांग दिसते.सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत.त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे.साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर  यावयास पायवाट आहे.इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.
 इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.या युद्धाचे मोठे रंजक वर्णन बखरीत आले आहे.
'एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला कि  तीन कोश औरस-चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्द जाहले.घोडी,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजीयाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव जाहला.ऐसा कुल सुभा बुडवला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.'



 या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.'भारती जैसा कर्ण तैसा' असे त्याचे वर्णन आले आहे.साल्हेर दुर्गाच्या सालोट्याच्या बाजूस खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी हि अभ्यासण्यासारखी आहेत,पण दुसर्या बाजूकडचे दगडात कोरलेले कठडा असलेले कड्याच्या टोकावरचे जिने आपल्याला थक्क करतात.कोणी केले असेल हे काम ????

बुधवार, ६ जानेवारी, २०१०

लोहगड ... चिरेबंदी वाट

लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड.
F1230014Image by Ankur P via Flickr
लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे.तुंग उर्फ कठीणगडहि येथेच आहे.अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.
लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत.नाना फडणीस यांनी बांधलेली एक विहीर गडावर आहे.नानांचा शिलालेखही त्या विहिरीवर आहे.१०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे.लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे.त्याला थोडी तटबंदी आहे.या माचीचे नाव आहे विंचूकाटा टोक.गडाच्या माचीच्या खाली दात जंगल आहे.
लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या वीसपुरावर मोठी सपाटी आहे.तशीच मोठी दगडी तटबंदी आहे.प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत.ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.
लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट.अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते.लोहगडवाडी पार केली कि हि सर्पाकार वाट सुरु होते.एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला कि मग तो माणूस वर येईस्तो पहारेकर्यांच्या नजरेआड जात नाही.तो व्यवस्थित हेरला जातो.वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत.त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवली जाते.वाटेवर गणेश दरवाजा,दुसरा नारायण,तसरा हनुमान,आणि चौथा महादरवाजा,असे चार दरवाजे आहेत.हनुमान दरवाजा जुना आहे.इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतले आहेत.दुसर्या आणि तिसरया दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत.
लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे.गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो.कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम विचार करावयास लावते.सध्या नवीन इमारती पडतात,मग हे असे बांधकाम अडीचशे तीनशे वर्ष कशामुळे टिकले याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहतनाही.
Enhanced by Zemanta

मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

लिंगाणा... रायगडचा पहारेकरी

लिंगाणा हा रायगडचा उपदुर्ग आहे.माणगड,सोनगड,महिन्द्रगड,लिंगाणा,कोकणदिवा हे दुर्ग रायगडाकडे जाणारया घाटवाटांवर पहारे देतात.कावळ्या,बोचेघोळ,निसनी,बोराटा,सिंगापूर,फडताड,शेवत्या,मढ्या अशी घाटांची नवे आहेत.या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते.बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे.आकाशात उंच गेलेला शिवलींगासारखा सुळका हा प्रस्तरारोहन करणार्यांसाठी मोठे आव्हान आहे.महाराष्ट्रातील युवकांनी ते आव्हान पेललेही आहे.,
मोहरी नावाच्या सह्याद्री माथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ जवळ आहे.हि नाळ
Fort Raigad http://www.madforclicks.Image via Wikipedia
अवघड आहे.इथून जवळच असणार्या रायलिंगहून लिंगान्याच दर्शन घेतलं,तर त्याचा थरार काय आहे याची कल्पना येईल.सिंगापूर या नाळेन जाण सोप आहे.लिंगाण्यावर जायचं तर लींगणमाचीला जायचं.जननी आणि सोमजाईच दर्शन घ्यायचं आणि मग लिंगाण्याकडे निघायचं.
घासार्यावरून जात असताना काही चौक्यांच्या खुणा ध्यानात यावयास लागतात.उजवीकडे पाण्याचे टाके.मग वाट कड्याच्या टोकावरून जाते.इथे खालून येणारी पायरया ढासळलेली वाट आहे.उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे.तिथ एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आल आहे.त्याचाच आधार घेऊन कडा पार करायचा.इथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे.त्याच्या पोटात एक गुहा आहे.हिलाच सदर म्हणतात.एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या.त्या गुहेला लागुनच एक धान्य कोठार.पलीकडे जीभीचा पहारा.तिथून माची पसरत गेली आहे.
या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या वैर्यांना कैदेत ठेवत असत.वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा.इथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होत असे.इथले कैदी खचुअन जात असत.पळून-जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे.
इथे कैदी ठेवण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली माहिती नाही;परंतु ज्याच्या डोक्यात आली त्याचे डोके चांगलेच सुपीक असले पाहिजे.मानसिकदृष्ट्या खचवून टाकणारे असे हे स्थानआहे.
Enhanced by Zemanta

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

रायगड... गड बहुत चखोट

रायगड हा एक विलक्षण दुर्ग आहे.गडपती शिवाजीमहाराजांनी ज्या गडाला आपली राजधानी बनवून राज्याभिषेक केला,तो गड विलक्षण असणारच.चंद्रराव मोरयानी या गडाचा आसरा घेतला असतानाच शिवाजी महाराजांनी त्याला वेढा घातला होता.शिवाजी महाराजांनी स्वतः हा गड न्याहाळला.
Ruins of Fort Raigad, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
एका बखरीत लिहिले आहे.
'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच,पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका.दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.'
शिवप्रभूंचा स्थपती हिरोजी इंदुलकर याने रायगडाचे बांधकाम केले.वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ
,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या.रायगडाला तीन बाजूनी उभे,उत्ताल कडे आहेत.एका बाजूने वर येण्यासाठी वाट केली आहे.त्या वाटेवरही जागोजागी दगडात कोरून पायरया काढल्या आहेत.महादरवाजा हा बालेकील्ल्याखाली सुमारे एक तृतीयांश अंतरावर आहे.शिवाजी महाराजांच्या बांधणीचे हे वैशिष्ट्य आहे.
महादरवाजाखाली दीड-दोनशे फुट अवघड चढ आहे.शत्रू दरवाजापर्यंत येईपर्यंत दमावा,अशी योजना केली आहे.या बाजूला गडाला मोठी तटबंदी आहे,मूळ तटबंदीच्या बाहेर एक वेगळीच तटबंदी बांधून गड फार मजबूत केला आहे.हि तटबंदी पार 'टकमक' टोकापर्यंत पसरत गेली आहे.त्यात एक चोरदरवाजा आहे आणि एक महादरवाजा आहे.महादरवाजा बेचक्यात आहे.दोन प्रचंड बुरुज त्याचे रक्षण करतात.अशा बांधणीला जीभी म्हणतात.
या बांधनिबद्दल रायगडाला इसवी सन १६७३ साली भेट देणारा टोमास निक्ल्सने लिहिले आहे.
'वाटेत पायरया खोदल्या आहेत.दरवाजाजवळ पायरया पक्क्या खडकात खोदल्या आहेत.जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही,तेथे २४ फुट उंचीचा तट बांधला आहे.चाळीस फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे कि,अन्नाचा पुरेसा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल..!'
कड्याच्या टोकावर बांधलेली महादरवाजाची तटबंदी रायगडाला अभेद्य बनवते.शिवाजीराजांनी दुर्गबांधणीची कला आत्मसात केली होती.तटबंदीसाठी निवडलेली जागा अत्यंत उत्तम आहे.काही किलोमीटर्स लांबीची राजगडाची तटबंदी हे त्याचे,तर फक्त दीड-दोनशे मीटर्स लांब रायगडाची तटबंदी हे त्याचे वैशिष्टआहे.
Enhanced by Zemanta

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

आपल्या गडकोटांबद्दल...( 2 )

रामायण व महाभारतातही दुर्गांविषयी चर्चा केली आहे.त्याकाळातही दुर्गांविषयी अभ्यासपूर्ण दाखले आजही आपल्याला अनुभवास येतात.
Purandar FortImage by Himanshu Sarpotdar via Flickr
शांतीपर्वामध्ये भीष्मांनी दुर्गाची महती सांगितलेली आहे.एके ठिकाणी भीष्म म्हणतात'एखादा आपल्यापेक्षा बलवान अशा राजाकडून आपल्याला त्रास होत आहे असे वाटल्यास,सुरक्षेसाठी बुद्धिमान राजाने दुर्गाचा आश्रय करावा...दुर्गाभोवती असणार्या क्षुद्र वृक्षाची मुळे तोडून टाकावीत...अश्वत्थ वृक्षाची मुळे मात्र तोडू नयेत.मोठमोठे वृक्ष असतील तर त्याच्या फांद्या तोडाव्यात.अश्वतथ दुर्गाच्या तटावर,कोण लोक येतात,कशासाठी येतात,त्याच्यासाठी त्यांच्यावर बारीक तेहलनी करण्यासाठी,त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व बाजूस किंवा चोहोबाजूंनी चौक्या ठेवाव्यात व त्यावर अतिशय शूर,चाणाक्ष लोकांचा पहारा असावा.
तटावरच्या लोकांना बाहेरच्या गोष्टी दिसण्याकरता भिंतीला झरोके असावेत.बाहेरून येणाऱ्या लोकांना आपणावर नजर आहे याची जाणीव असणार नाही.व वेळ प्रसंगी याच भोकातून तीर वैगेरेचा मारा करता येईल,अशी व्यवस्था करावी.
दुर्गाच्या भोवतालचा खंदक मासे,नक्र इत्यादींनी परिपूर्ण असावा,किंवा त्यात जागोजागी शूल उभे केलेले असावेत.नगरातल्या लोकांना संकटकाळी बाहेर निघता यावे म्हणून सूक्ष्म दरांची किंवा चोर दरवाजा-गुप्त भूयारांची योजना असावी.या दारावरही चौकी,पहारे असावेत.दुर्गाच्या जवळच किंवा अगदी थोड्या अंतरावर काही अचानक घडल्यास तातडीने सैन्याची कुमक पोचावी म्हणून सैन्याचा तळ असावा.
जेथे चिखल नसेल,पाणी जवळ नसेल,सेतू प्रकारादिकांचे भाग व ढेकळे नसतील अशाच ठिकाणी अश्वभूमी असावी किंवा तयार करावी.रथदलाला मात्र सपाट,चिखल व कुठेही शक्यतो खाचखळगे नसलेली जागा प्रशस्त म्हणजेच योग्य होय.
लहानलहान वृक्ष,अरण्य व जवळ पाणी किंवा हत्तीसाठी पुरेसे व मुबलक पाणी असलेला प्रदेश गजदलासाठी अतिशय योग्य.सभोवती डोंगराळ जागा,अनेक दुर्ग,तसेच कणक आणि देव यांनी प्रदेश युक्त असून,त्याच्या समीप पर्वत,उपवने असतील तर ती जागा पायदलासाठी प्रशस्त होय.सैन्यात पायदळ असणे सर्वदा श्रेयस्कर होय.
रामायणाचा जरी अभ्यास केला तरी त्या काळी दुर्गांची माहिती होती असे आढळून येते.
हनुमान लंकेत जाऊन आल्यावर त्याने लंकेच्या दुर्गाचे वर्णन केलेले आढळून येते गडांची निर्मिती करताना वापरलेले तंत्र,भौगोलिक परिसराचा अभ्यास,गडावर शत्रू पोचू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना,अडचणीच्या वेळी गडावरून सहज निघून जाता यावे म्हणून केलेई विशिष्ट गुप्त वाट तटबंदीवरून शत्रूला हेरण्यासाठी केलेले झरोके इत्यादी गोष्टींचा अभ्यास व त्याकाळातही अतिशय कल्पकतेने निर्मिलेले दुर्ग यांचा सर्व बाजूने विचार करणे २१ व्या शतकातही अतिशय महत्वाचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा गडकोट बांधले मात्र,याच गडकोट दुर्गांच्या जोरावर त्यांनी शत्रूला नामोहरम केले.साल्हेर अहिवंतापासूनते जिंजी तंजावरपर्यंत दुर्गांची शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.
शिवप्रभू एकदा म्हणाले,आज हजरतीस३६० दुर्ग आहेत.खासा आलमगीर एक दिवस दख्खनेत उतरेल.त्यावेळेस माझा एक एक दुर्ग त्यावेळेस एक एक वारूस झुंजवेल.औरंगजेबास अख्खी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षाचे आयुष्य लागेल.
शिवप्रभूंच्या मृतुनंतर औरंगजेब दक्षिणेस पुरया ताकदीनिशी उतरला आणि पुढची २६ वर्ष तो इथेच राहिला.त्या अवधीत त्याने आदिलशाही,कुतुबशाही जिंकली,२०० वर्ष चाललेल्या या शाह्या औरंगजेबाने त्या एका आचमनात गिळल्या.परंतु गडकोटानी भरलेले हे मराठा राज्य काही त्याला जिंकता आले नाही.शेवटी हतबल होऊन हा दिलीन्द्र यमालयाक्षयास गेला ते हे राज्य.
गडकोट किल्ल्याच्या जोरावर मराठी साम्राजाला जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
Enhanced by Zemanta

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

आपल्या गडकोटांबद्दल....

गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.

दुर्गमता हा गडाचा गाभा होता.शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई.नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.
Entrance to Karnala fort, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
तरीही शत्रू बलाढ्य असेल,तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली.मात्र,असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे,परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे.भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
मात्र,हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले.त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले.परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली.वास्तुरचना,स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.
आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते.मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे.त्याचा आशय असा आहे-'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत - १]धनुदुर्ग २] महीदुर्ग ३] अब्ददुर्ग ४] वाक्ष्रदुर्ग ५] नृदुर्ग ६]गिरिदुर्ग
ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही,त्यास 'धनदुर्ग' म्हणतात.
ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे,युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल,ज्याला झरोक्यानीयुक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत,अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.
अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.
तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.
गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.
तर आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.
२१ व्या शतकातील युवा पिढीसाठी या गडकोटांचे महत्व समजावून त्याचा अभ्यास करण्यास उदुय्क्त करण्यासाठी,त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी,गडाची बांधणी करताना तो डोंगर का निवडला,त्या भोवती असलेली साधनसामग्री,तेथे राहणारे लोक,त्या भागात असलेली पाण्याची व्यवस्था,तेथून मिळणारे शेताचे उत्पन्न या गोष्टींचा निश्चितच विचार करून गडांची बांधणी कशी झाली त्यासाठी गडाची एका वेगळ्या माध्यमातून ओळख करून देण्यासाठी हि लेखमाला सुरु करीत आहे.
हि माहिती विविध वर्तमानपत्रातून कात्रणे करून मिळवलेली असून ती माझ्याकडे खूप वर्षापासून आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
जय शिवराय !
Enhanced by Zemanta