सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

सरकार 'बीओटी' तत्वावर द्यायचे का ?

"किती रुपये ? " आपण
"४५ सुट्टे द्या " तो
"सुट्टे नाहीत हे पन्नास आहेत  " आपण
आणि तो वैतागून एक पावती आणि ५ रुपयांची इक्लेर्स चोकलेट देतो आणि आपण ती गपगुमान घेऊन पुढे चालते होतो.हा रोजचा अनुभव आहे हायवे वरील टोलनाक्यांवरील.
'टोल' या गोष्टीशी कधीही संबंध आला नाही असा माणूस भेटणे आतातरी शक्य नाही असे मला वाटते. टोल प्रकाराने सर्वांनाच त्रस्त केले आहे, माणूस गरीब ,श्रीमंत असो वा वाहतूकदार चालक/मालक सर्वच  या टोल पद्धतीला वैतागले आहेत.'टोल' म्हणजे सरकारच्या परवानगीने दिवसा  दरोडा टाकणे यातला प्रकार झाला आहे सध्यातरी.या टोलनाक्यांवर जनतेची अक्षरशा लुट चालू आहे.
'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा'  या तत्वावर रस्ते,पूल बांधून त्यावर टोल बसवून त्याचा खर्च तेथून  जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य माणसांकडून वसूल करायचा असा हा फंडा आहे. याची  सुरवात साधारण २००२ मध्ये पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वर टोल बसवून करण्यात आली.सामान्य माणसालाही चकचकीत रस्ता सुखकर प्रवास यामुळे टोल द्यायला काही वाटत नव्हते.सामान्य माणसाची हीच मानसिकता ओळखून सरकारने हाच फंडा सर्वत्र वापरण्यास सुरवात केली.परंतु अवाढव्य टोल आणि निष्कृष्ट दर्ज्याचे रस्ते आणि टोल नाक्यांचा अतिरेक यामुळे सामान्य माणूस आता वैतागला आहे. त्यामुळेच या टोल पद्धती  विरुद्ध आंदोलने होऊ लागली आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने १० टोल नाक्यांवरील टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बाकीच्या टोल नाक्यांचे काय ? राज्यात एकून १७५ टोल नाके आहेत असे बोलले जाते मला यापेक्षा जास्त असावेत असे वाटते कारण एकट्या बारामती मध्ये ३ टोलनाके रिंग रोडवर आहेत २-३ किमी च्या प्रवासासाठी २१ रुपये एवढा टोल येथे वसूल केला जातो.बाकी बेंगलोर- मुंबई एक्प्रेस वे यावर किती टोल नाके आहेत हे फक्त मोजत बसावे.पुणे- मुंबई परतीच्या प्रवासासाठी साधारण ५०० रुपये टोल देवा लागतो,अरे हा टोल आहे कि चेष्टा ?
'बांधा वापरा हस्तांतरित करा' या अंतर्गत खाजगीकरणातून  विकास करण्याला विरोध नाही आहे.परंतु हे करताना ते चुकीच्या पद्धतीने किंवा अतिरेक करून करू नये असे मत आहे.एखाद्या कंपनीला त्याचा ठेका दिला तर त्याला ठराविक वर्षासाठी टोल वसुलीचा हक्क दिला जातो . त्यानंतर  तो बंद झाला पाहिजे हि रास्त अपेक्षा असते परंतु त्यांना सरळसोट मुदतवाढ दिली जाते.कारण काय तर राजीकीय वरदहस्त, हो हे लपून नाही राहिले कि टोल नाक्यांचे ठेके घेणारे सगळे राजकीय पुढारी किंवा त्यांचे बागलबच्चे  आहेत.
तसेच टोल वसूल करणार्यांनी  टोल नाक्यांवर काही सुविधा द्यायच्या असतात,रस्त्याची डागडुजी करायची असते या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
 टोल देऊन खचखळग्यातून प्रवास करायचा याला आता सामान्य माणूस वैतागला आहे तसेच अजून किती वर्ष हा टोल द्यायचा असा प्रश्न आहेच.कितीतरी  रस्त्यावरील टोल त्याचा खर्च निघूनही चालू आहे .परत  काही चौकशी करायला गेले तर दादागिरीची भाषा केली जाते काही ठीकानीतर मारहाणीचे प्रकार घडले आहेत.भरपूर ठिकाणी मुदत संपली तरी टोल वसुली  केली जाते आपल्या हडपसर येथील टोल नाक्याचेच उदाहरण घ्या त्याची मुदत संपून जमाना झाला पण वसुली चालूच आहे.
 खूप टोल नाक्यांवर मोठ मोठे घोटाळे होत आहेत जसे कि नकली पावती दिली जाते,वाहनांची संख्या कमी दाखवली जाते मध्ये एका ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या नकली पावत्या  जप्त करण्यात आल्या.हे टोल नाके म्हणजे सामान्य माणसाना लुटण्याचे सरकारी परवानेच आहेत असे मत त्या ठेकेदारांचे झाले आहे.याबाबतच्या तक्रारी सरकार दरबारी जात आहेत परंतु त्याची दखल घेतली जात नाही. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे किती वसुली झाली किती वाहनांनी ये जा केली हे समजणे अगदी सोपे झाले आहे त्याचा वापर करून ठेकेदाराला योग्य तो मोबदला मिळवून देऊन लोकांना या जोखंडातून मुक्त करता येऊ शकते.परंतु हे करण्याची राजकीय इच्छा सरकारच्यात नाही.
याविरुद्ध जोपर्यंत सरकारला जाग येत नाही असे जनआंदोलन उभे राहत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील असे मला वाटते.किंवा  'कधी बंद होणार हे टोलनाके?' असा प्रश्न मनालाच विचारात प्रवास करावा लागेल तोही खड्ड्यातून.
आजकाल ज्याप्रमाणे सरकार चालवले जात आहे, सरकारी अधिकारी वागत आहेत, भ्रष्टाचार गुन्हेगारीकरण वाढले आहे त्यावर उपाय म्हणून सरकारचा हा आवडता फंडाच वापरावा आणि हे सरकार मिलिटरीकडे 'बांधा,वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्वासारखे १५ वर्षासाठी द्यावे म्हणजे ते सुतासारखे सरळ होतील. नाही समजलात ?
म्हणजे कसे आहे ५ वर्षात मिलिटरी सर्व सरकारी बाबू आणि सरकारी योजना यांना योग्य पद्धतीत बांधतील १० वर्ष त्यांचा वापर योग्य होतोय का ते पाहतील आणि नंतर लोकशाहीकडे हस्तांतरित करतील :) कशी आहे आयडिया ?
आणि यासाठी लोक पाहिजे तेवढा टोल स्वखुशीने द्यायला तयार होतील, बघा प्रयोग करून .

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

देवगिरी ... एक मिश्रदुर्ग

देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन   शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या  ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची  राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द  आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
 देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही  आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत.  अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि  आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने  वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची  आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.१४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
 या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.