शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

हिंदुत्वाचा तेजस्वी अविष्कार ... स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदुस्तानी स्वातंत्र्य युद्धाचे अग्रदूत,देशभक्तांचे अखंड स्फूर्तीस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी

मृत्यूशी अनेकवेळा झुंज  देऊन,त्याचा प्रभाव करून स्वातंत्र्यवीर आयुष्यात अनेकवार मृत्युंजय ठरले.संत ज्ञानेश्वर,तुकोबाराया आदी थोर योग्यांच्या परंपरेनुसार जीवित कार्यप्राप्तीनंतर वीस दिवसाच्या प्रयोपासानेनंतर केवळ पाण्यावर राहून आत्मसमर्पण करून सावरकर अनंतात विलीन झाले.२६ फेब्रुवारी १९६९ रोजी हा महापुरुष काळाच्या पडद्याआड गेला.

जातिभेदाच्या निर्मुलनाकरिता सावरकरांनी जे उपक्रम राबविले,त्यात शाळातून स्पृश्य व अस्पृश्य मुलांना एकत्रित बसविणे,सार्वजनिक पाणवठे,मंदिरे,उपहारगृहे येथे अस्पृश्यांना मुक्त प्रवेश मिळवून देणे,स्पृश्य-अस्पृश्य सहभोजन,तिळगुळ समारंभ इत्यादींचा  समावेश होता. रत्नागिरीमधील 'आखिल हिंदू पतित पावन मंदिर' हे हिंदुस्तानातील त्या काळातील एकमेव मंदिर होते जेथे स्पृश्य-अस्पृश्य यांना मुक्त प्रवेश होता.हिंदू समाजाला पुरोगामी विचारसारणीची व आधुनिक विज्ञाननिष्ठेची बैठक मिळवून देणाऱ्या सावरकरांच्या पुण्यतिथीनिम्मित्त त्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण करूया.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

सचिन ...स्वप्न पूर केलस रे गड्या

लय दिस मनात हुत कि सचिन नि एकदिवसीय सामन्यात २०० कराव्यात कमीत कमी त्या सईद अन्वरच १९४  रेकॉर्ड तरी मोडाव.
२-३ येळा त्यो त्याच्या जवळ बी आला हुता पण काही जमल नव्हत, पण आज त्यो जणू आपल्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा घालायसाठी आलाय अस वाटत हुत.
आन बघता बघता गड्याने रेकॉर्ड मोडल कि हो १९४ च आन २०० बी पुऱ्या केल्या तेबी नाबाद .
नादखुळा गणपतीपुळा
च्यामारी सामना बघताना सचिनच्या १५० झाल्यावर मी एका जाग्यावर बसून हुतु अजाबात हाललु   नाय ती आपली मनाची चलबिचल आता याला कुणी अंधश्रद्धा म्हणू द्या नायतर काय बी म्हणू द्या आमासणी कायबी फरक पडत नाय.म्या अस नाय म्हणणार कि म्या एका जाग्यावर बसलू म्हनून त्याच्या २०० रणा  झाल्या ;)
पण लय दिसाच स्वप्न गड्यान पूर केल
सच्याला नाव ठेवणार्यांनी हि खेळी बगावी आन आपल तोंड काळ कराव
जाऊ द्यात चांगल्या टायमाला वंगाळ नाय बोलत

 

या मराठमोळ्या सचिनला २००*(१४७) खेळीबद्दल मानाचा त्रिवार मुजरा !

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

वसई... चिमाजीअप्पांच्या स्मृती

उल्हास नदी जिथे समुद्राला मिळते,तिथे नदीच्या मुखावर वसईचा दुर्ग बांधलेला आहे.शिवाजीमहाराजांनी कल्याण आणि भिवंडी येथे आपले आरमार बांधावयास काढले.रुय लेन्ताव ह्विअगस आणि फेर्नाव व्हीअगस हे पोर्तुगीज बापलेक जवळ जवळ ४०० लोकांसह शिवाजीमहाराजांचे आरमार बांधत होते.शिवाजीराजांनी वसईच्या कॅप्टन आंतुनियु द मेलू द काश्त्रू याला पाठविलेले एक पत्र मिळाले आहे.त्यात राजांनी म्हंटले आहे,'आमची जहाजे बाहेरून लाकडे घेऊन येतील आणि नंतर उल्हास नदीतूनच आमच्या गुराबा,जहाजे सागरात शिरतील,तरी त्यांच्यावर तोफा दगू नयेत...'
Bassein Fort
वसईच्या कॅप्टन ने हे पत्र गोव्यात पाठवले.तेथे सभा भरून सौम्य शब्दात प्रतिबंध करण्याचे ठरले.ह्विअगस बापलेकांना मुंबईला बोलावून कानपिचक्या दिल्यावर,तेही आपल्या लोकांसह रातोरात पळाले.शेवटी आपल्याच लोकांनी हि जहाजे बांधली आणि अंधाराचा फायदा घेऊन वसईजवळूनच सागरात लोटली.
मूळ भेंगळ्याचा दुर्ग पुढे पोर्तुगीजांनी परत बांधून काढला.उत्तर फिरंगणात वसईच्या दुर्गाचा दबदबा मोठा होता.काही मंदिरे आहेत.आतील 'सिटाडेल' म्हणजे अर्क हेदेखील अभ्यासण्यासारखे आहे.खाडी,सागर आणि दलदल यांनी वेढल्याने वसईचा दुर्ग हा फार बळकट बनला होता.अणजूर गावचे गंगाजी नाईक यांनी पेशव्यांना पोर्तुगीजांच्या अत्याचाराची कल्पना दिल्याने पेशव्यांनी उत्तर फिरंगणात स्वारी केली.वसईलाही वेढा बसला,पण पोर्तुगीजांनी अत्यंत नेटाने किल्ला लढवला.शेवटी चिमाजी अप्पा पेशव्यांच्या आवाहनाने मराठी सेनेने मोठाच एल्गार केला आणि सुरुंग लावून तट उडवला.तुफान मारामारी होऊन ५ मे १७३९ रोजी पोर्तुगीज शरण आले.१२ मे रोजी त्यांनी रूरमार्च काढून बैंड वाजवत ते किल्ल्याला पडलेल्या खिंडारातून बायका मुलांसमवेत बाहेर आले आणि किल्ल्याला वळसा घालून जहाजात बसून गोव्यात गेले.
या वसईच्या दुर्गाच्या सां सेबांशिया बुरजाच्या खाली,एक अत्यर्क गोष्ट आहे.वसईच्या कॅप्टन च्या घराजवळच बुरजाच्या तटाखालून ५५० फुट (१७७ मी.)लांबीचे एक मोठे भुयार काढले आहे.
Enhanced by Zemanta

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१०

मधुकर सरपोतदार कालवश

शिवसेना वाढवण्यासाठी स्वत:ला झोकून देणारे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांनी पक्षावरची निष्ठा आपल्या कृतीतून पावलोपावली दाखवली. अलिकडेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वत:चा मुलगा आणि सून दुसऱ्या राजकीय पक्षातून लढत असताना सरपोतदारांनी मात्र शिवसेनेच्या कामात जराही खंड पडू दिला नाही.रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आंजणारी गावात ३१ जानेवारी १९३४ साली मधुकर सरपोतदार यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉन्सन कंपनीमध्ये पसोर्नेल मॅनेजर या पदावर रूजू झाले. याच काळात त्यांनी अनेक शिवसैनिकांना नोकरला लावले. यातील अनेक पुढे शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या सरपोतदारांचे वक्तृत्वही उत्तम होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या सरपोतदार यांनी पक्षाच्या कामात झोकून दिले. कामगारांविषयी तळमळ असलेल्या सरपोतदारांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या मागण्यांसाठी दत्ताजी साळवी यांची भारतीय कामगार सेना एकीकडे रस्त्यावर उतरायची तर, कॉपोर्रेट क्षेत्रात उत्तम संबंध असलेले आणि फडेर् इंग्रजी बोलणारे सरपोतदार कंपन्यांच्या मालकांशी भांडून कामगारांना न्याय मिळवून देत.

आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या सरपोतदारांनी अनेक खटले स्वत:च्या अंगावर घेतले. मुंबईतील दंगलीदरम्यानचा त्यांचा किस्सा अनेकांच्या लक्षात राहणारा आहे. दंगल उसळली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोन नातवंडे बॉम्बे स्कॉटीश शाळेत होती. बाळासाहेबांची घालमेल सुरू झाली. त्यांच्या सुरक्षेसाठीची जीप नादुरुस्त झाल्याने पोलीस दुसरी जीप आणण्यासाठी गेले होते. अशावेळी सरपोतदार यांनी स्वत:ची गाडी काढली आणि ते बाळासाहेबांसोबत बॉम्बे स्कॉटीशला नातवंडांना आणायला गेले.

सरपोतदार यांचे चिरंजीव अतुल आणि सून शिल्पा यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अलिकडेच झालेली लोकसभा आाणि विधानसभा निवडणूक शिल्पा सरपोतदार यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली. घरात मुलगा आणि सून मनसेचा प्रचार करत असताना सरपोतदार मात्र शिवसेनेच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांच्या प्रचाराची धार कुठेही कमी पडली नाही. 

सौजन्य-मटा
९३ च्या दंगलीत गाडीत शस्त्र सापडल्याच्या आरोपावरून त्यांना १ वर्षाचा कारावास भोगावा लागला होता.

एक निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक स्व.मधुकर सरपोतदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

काश्मीरमधील इस्लामीकरणाला सरकारी आश्रय

Getty Images via Daylife
आद्य शंकराचार्यानी हिन्दू धर्माची घडी मजबूत करण्यासाठी कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत संचार केला .
काश्मीरमध्ये  पर्वतशिखरावर  त्यानी 'शरादंबेचे' मंदिर स्थापन केले तेंव्हापासून हजारो वर्षे त्या  पर्वताचा सर्वत्र उल्लेख  'शंकराचार्य पर्वत' असा होत आला आहे .आता शासकीय पातळीवर फर्मान  काढून या पर्वताचे 'तरन्त-अ -सुलेमान' असे नामांतर करण्यात आले आहे .

गेली ५० वर्ष शेख  अब्दुलांच्या काळापासून  इस्लामिकरणाची  ही प्रक्रिया संथपणे पण अखंडित चालू आहे .

SRINAGAR, KASHMIR, INDIA - DECEMBER 10: Leader...अगदी अलीकडच्या मुफ्ती यांच्या कारकिर्दीत २५० हुन आधिक गावांची हिंदू  नावे बदलून इस्लामी नावे देण्यात आली आहेत .

या सलग होत असनारया नामंताराचा उद्देश  आणि परिणाम याबाबत आधिक भाष्य करण्याची गरज नाही

जो पर्यंत उठ्सुठ  निधार्मिपनाचा जप चालू राहिल आणि तुष्टिकरण हे धोरण चालू राहिल तोपर्यंत ही पुन्यकर्मे अशीच चालू राहणार.
काही उदाहरणे इथे देत आहे.

पूर्वीचे नावे : आताचे नाव
1 बाराइ आँगन : सर्वी आबाद
2 औगिया : अब्दुल्लाबाद
3 खराती : इक्बाल्पोरा
4 श्रीतांजी : दाऊद्पोरा
5 चिचरिपोरा : सैयादाबाद
आणि आता अनंतनागचे इस्लामाबाद झालेसुद्धा आणि  अजुन आपण हातावर हात ठेवून बसलोय .

Reblog this post [with Zemanta]

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक... उमाजी नाईक

हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद  झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले  अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व  सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा  महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.
अशा आद्यक्रांतीकाराचा स्मृतिदिन नुकताच ३ फेब्रुवारी रोजी झाला.परंतु  रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि  उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू  लागले.
क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले  पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाईक असे  उपेक्षित का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या  क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही   खूप कमी आहे.त्यामुळेच ते  उपेक्षित राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या  आद्याक्रांतीकाराबद्दल ....
'मरावे परि क्रांतीरूपे   उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी  नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले  आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले  नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना  म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो  कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी  सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही?
तर टोस म्हणतो,उमाजीपुढे  छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली  नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.
हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती  आखली नसती  तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई  व दादोजी  खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे  झाला.उमाजीचे  सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी  पार  पाडत  होते.त्यामुळेच त्यांना    नाईक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी  हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी  चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता  स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात  घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि  त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व  किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू  घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची  वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी  बेभान  झाला.छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत  माझ्या देशावर  परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी  नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत  जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात  पहिल्या बंडाची गर्जना केली.
इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना  लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत  करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो  भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक  वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने  त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या  कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी   लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ  लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
उमाजीला   पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या  मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या  पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज  सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच  धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५  हजार सैन्य होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या  देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने  ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून   सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता  त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला  पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी  गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण  घेतले होते.
 १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या  सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि  इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना  शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार  आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार  त्यांना शासन  करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला  होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
 या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला  पकडण्यासाठी  युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली  उमाजीच्या  सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण  केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी  उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये   आणि चारशे  बिघे जमीन बक्षीस  म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी  उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना  उमाजीला इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि  पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत  उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर  त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.
आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत  वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत  फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या  बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर  इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
 अशा या धाडसी उमाजीनंतर   तब्बल  १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव  बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८७९ साली इंग्रजांविरुद्ध पहिले बंड  केले..त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.
अशा या आद्याक्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक यांचा आपण विसर न पाडता  त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस त्रिवार अभिवादन करूयात.

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

अर्नाळा... शनिवारवाड्याची प्रतिकृती


वैतरणा नदी जेथे सागराला मिळते तेथे एका वेगळ्या बेटावर एका दुर्गाची बांधणी करण्यात आली आहे.या दुर्गाचे नाव आहे अर्नाळा! ज्या बेटावर हा दुर्ग वसला आहे त्या बेटाचे नावच दुर्गाला देण्यात आले आहे.सिंधुदुर्ग आणि अर्नाळा हे दोन्ही दुर्ग बेटांवर असले तरी त्यांच्या रचनेत मोठा फरक आहे.सिंधुदुर्ग हा संपूर्ण बेत व्यापून राहिला आहे,तर अर्नाळा बेटावरच्या काही भागात बांधला आहे.अर्नाळासंबंधी म्हंटले आहे कि 'त्यास विचार पाहता आर्नालीयासारखी जागा दुसरे कोठे नाही.चहूकडील आरमारास मार्ग,खाडी मनोरे-मांडवीपोवतो गेली आहे.ते स्थल जालिया,दुसरा जंजिरा,फिरंगानदेखील हस्तगत होते.'उत्तर फिरंगानात अर्नाळ्याचा दुर्ग बाजीराव पेशव्यांनी बांधला.बेटावर प्रत्येक बाब किनार्यावरून आणावी लागे.तीनचारशे लोक याच कामास लागले होते.एके ठिकाणी नोंद आहे-'बुरुज तीन. बहिरव,भवानी,बाबा यैसे तीन बुरुज जमिनीपासून उंच.बाबा बुरुज काम दोन गज जाले.दोनही बुरुज पायापासून नव हात जमिनीबरोबर काम आहे....!'

असा अर्नाळा दुर्ग उभा राहिला.अर्नाळा हि पुण्याच्या शनिवारवाड्याची प्रतिकृती आहे.शनिवारवाडा हा नऊबुरुजी कोट आहे,तर अर्नाळा दहाबुरुजी आहे.अर्नाल्याचे प्रवेशद्वार देखणे आहे.द्वारावर चांगली सूचक द्वारशिल्पे आहेत.दरवाजावरच बाजीराव पेशव्यांच्या नावाचा एक शिलालेख आहे.२३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा त्यात उल्लेख आहे.

अर्नाल्याच्या तटाची उंची १० मीटर आहे.तटाची रुंदी तीन मीटर आहे.आत दत्तमंदिर आहे.
एका पोर्तुगीजाने लिहिले आहे-'मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई प्रांत जिंकून घेतल्यावर लगेच वसई व अर्नाळा येथे आपले आरमार उभारले व विजयदुर्ग ताब्यात घेतल्यापासून तीन ठिकाणी मराठ्यांचे आरमारी तळ झाले आहेत.'

अर्नाळ्याचा हा कोट पूर्ण बेटावर बांधला नसल्याने बेटावर शत्रू उतरून कोटाकडे येण्याची शक्यता होती.या बेटावर त्यासाठी टेहालनिसाठी आणि क्वचित तोफांचा मारा करण्यासाठी एकांडा टेहालणी बुरुज बांधलेला आहे.युरोपच्या किनारपट्टीवर असे प्रचंड बुरुज आढळतात.अशा बांधकामाला तिकडे 'मोर्ट्रेलो टोवर' म्हणतात.असे एक आगळेवेगळे बांधकाम अर्नाळा बेटावर आहे.ते अभ्यासण्यासारखेआहे.

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

जीवनात हास्य हे हवच

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.
आता हसायला कुणाला आवडत नाही ? पण इथे वेळ कोणाकडे आहे ? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ.सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे.इथे हसायचे म्हंटले तरी लोकांच्या जीवावर येते काहीना तर हसायचे म्हंटले तर रडायलाच येते!
मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय ह्वावे यासाठी विनोदबुद्धी दिली.
जीवनात सदा सुखी व आनंदी असावे असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु वास्तवात तसे होत नाही आणि वास्तव सुसह्य फक्त 'विनोद'च करू शकतो.कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते.ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद!
 विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात.काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.किंवा एखाद्या विनोदाला आपण 'क्या टायमिंग है बॉस' अशी कॉम्प्लिमेंट   देऊनहि गेलेलो असेल.
 काल्पनिक विनोद असतात ते अधिकतर प्रचारात असतात आणि ते प्रवाही होऊन जातात मात्र त्यांच्या उपत्तीकाराची काही नोंद राहत नाही. काही विनोद सूचक पण चावट असतात.ते सांगनार्याच्या तोंडापेक्षा ऐकणार्याच्या कानात अधिक फुलतात.
ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात  आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात.'विनोद' हे अमर असे साहित्य आहे त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे.
क्रिकेटमध्ये कितीही चांगला बॉल टाकला व तो खेळपट्टीच्या बाहेर पडला व दिशाहीन पडलातर त्याला वाईड बॉल म्हणतात.त्याचप्रमाणे स्थळ ,काळ व वेळ न पाहता केलेला कोणताही विनोद कितीही चांगला असला तरी दाद मिळवू शकत नाही कारण त्याला '
वाईड जोक' म्हणतात.
काही विनोद सोज्वळ हि असतात तर काही विनोद एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर केलेले असतात त्यावर लोक हसले तरी त्याला चांगले विनोद म्हणता येणार नाही.
काही लोकानातर विनोद केलेलेच समजत नाहीत हाही एक मोठा विनोदच आहे म्हणा.विचित्रपणा किंवा विसंगतीमुळे  खूप विनोद होतात आणि अशा विसंगती माणसांच्या जीवनात ठासून भरलेल्या असतात.आजचे जीवन खूपच ताणतणावाचे झाले आहे त्यावर जालीम एकमेव उपाय म्हणजे विनोद.त्याने जीवन  सहज आणि सुंदर बनते.
आयुष्यातील दुखाचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे.ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे 'सर्वश्रेष्ठ विनोद'. हास्यविनोद म्हणजे मोठा मानवधर्म आहे त्यामुळेच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन'
आपल्या जीवनातील हास्याचा जास्तीत जास्त आनंद मिळावा नियती कुणालाही चुकली नाही आणि चुकनारही नाही.
जिथे जिथे तणाव आहे तिथे विनोदाची गरज आहे.विनोदामुळे रक्ताला उसळी मिळते.नसानसातून वीज सळसळते मेंदू तल्लख बनते आणि शरीर व्यवस्था ठीकठाक बनते. देवाने माणसाला ज्या देणग्या दिल्या आहेत त्यातील हास्य एक मौल्यवान देणगी आहे.
कवी मंगेश पाडगावकर म्हणतात 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!' आणि हे फक्त विनोदामुळेच  शक्य आहे.
अशाच एका विनोदी साहित्याची आवड असणार्या आणि लोकांना हसवण्याचा वसा घेतलेल्या एका विनोद्प्रेमीची (शरद अभंग)लेखमाला सध्या वाचनात येत आहे त्यांना हा लेख भेट देत आहे.
तर लोकहो हसा सौख्यभरे !
Some nice quote's

1) Do Not take life so seriously,you will never get out alive.
2) If people could laugh 15 times a day there would be fewer doctors bills.
3) Get more smileage out of your lives.