रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

एक सूर आशेचा!

मिलिंद कोकजे - मंगळवार, १६ नोव्हेंबर २०१०
(अथश्री दिवाळी अंकावरून साभार)
milindkokje@gmail.com
चौदा वर्षांचा वनवास फक्त भारतवर्षांत आणि रामायणाच्या काळातच रामाला घडतो असे नाही. अगदी आपल्या शेजारी, आजच्या आधुनिक युगातही १४ वर्षे स्थानबध्दतेत, एकांतवासात काढावी लागतात. हा वनवास घडविणारे असतात लष्करी अधिकारी आणि वनवास भोगणारा राम नसतो तर तो भोगणारी असते कमालीची लोकप्रिय, देश पेटविण्याची क्षमता असलेली, लोकशाहीचा आग्रह धरणारी, राजकीय नेतृत्व करणारी एक स्त्री-ब्रह्मदेशमधील (म्यानमार/बर्मा) आँग सॅन सू की. फरक फक्त इतकाच की तिचा हा वनवास अजूनतरी संपलेला नाही आणि किती काळ चालू राहील ते कोणालाच माहीत नाही.

१९८९ साली सर्वप्रथम म्यानमारमधील लष्करी राजवटीने दॉ सूची (दॉ म्हणजे आँटी, काकू - याच नावाने ती म्यानमारमध्ये परिचित आहे) रवानगी स्थानबध्दतेत केली. तिच्याच घरात तिला कैद करण्यात आले. तेव्हापासून सातत्याने ती मध्येच आत तर मध्येच स्वतंत्र अशा अवस्थेत आहे, पण त्यातही आतच जास्त. १४ वर्षे ती तिच्या घरात अटकेत आहे. तिचा गुन्हा एकच आहे, आपल्या देशाची लष्करशाहीच्या विळख्यातून सुटका व्हावी, देशात लोकशाही नांदावी असे तिला मनापासून वाटते आणि तसे मानणाऱ्या प्रचंड लोकांचा तिला पाठिंबा आहे. लष्करशाहीतील तिच्या विरोधकांचा नेमका त्यालाच विरोध आहे आणि म्हणूनच असा लोकशाहीचा विचार मांडणारी व त्याकरता लोकप्रिय असलेली दॉ सू त्यांना खूप धोकादायक वाटते.
पण इतकी वर्षे स्थानबध्दतेत घालवूनही आणि किती घालवावी लागतील याची अनिश्चितता असतानाही तिच्या विचारात काहीच बदल झाला नाही. तिचा लोकशाहीचा आग्रह कायम आहे. त्याला तिचाही नाइलाज आहे. कारण स्वातंत्र्याचे बाळकडूच घेत ती मोठी झाली आहे. तिचे वडील हे स्वत: लष्करी अधिकारी. ब्रह्मदेशचे आधुनिक लष्कर त्यांनी उभे केले. त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मीही तितकीच प्रखर होती. त्यामुळे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचा पुढाकार होता. ते अतिशय लोकप्रिय आणि नव्या स्वतंत्र ब्रह्मदेशचे एक प्रमुख नेते होते. पहिल्या निवडणुकांआधीच, नव्याने स्वातंत्र्य मिळवलेल्या देशाची लोकशाही पध्दतीने नीट घडी बसण्याच्या आतच १९४८ साली हंगामी सरकारची बैठक सुरू असतानाच, त्या बैठकीतच त्यांची इतर आठ जणांसह हत्त्या करण्यात आली. त्या नऊ जणांपैकी सात जण हे ब्रम्हदेशचे महत्वाचे नेते होते. दॉ सू तेव्हा फक्त दोन वर्षांची होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने आँगच्या आईची नेमणूक भारतात राजदूत म्हणून केली. त्यामुळे दॉ सूचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयात झाले. तिचे पुढचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले. (याच विद्यपीठात पुढे १९९०मध्ये तिची ऑनररी फेलो म्हणून निवड झाली.) तेथेच तिची भेट मायकेल एरीस या ब्रिटनस्थित तिबेटी स्कॉलरबरोबर झाली. त्यांचे प्रेम जमले आणि १९७२मध्ये तिने त्याच्याशी लग्नही केले. त्यांना दोन मुलेही झाली.
पुढे मायकेलला कॅन्सर झाला. त्याने स्थानबध्द असलेल्या आपल्या पत्नीला भेटण्याकरता बर्मी सरकारकडे केलेली विनंती मानली गेली नाही. त्याऐवजी दॉ सूने त्याच्याकडे लंडनला जावे, असा सरकारचा आग्रह होता. परंतु आपण एकदा देशाबाहेर गेलो की आपल्याला परत येऊ दिले जाणार नाही, ही खात्री असल्याने दॉ सू अशा परिस्थितीतही देश सोडून गेली नाही. त्या दोघांची भेट १९९५च्या ख्रिसमसमध्ये झाली होती. त्यानंतर साडेतीन वर्षांनी मार्च १९९९मध्ये त्याचे दॉ सूशी भेट न होता निधन झाले.
१९८८ मध्ये म्यानम्यारला परतण्याआधी दॉ सूने संयुक्त राष्ट्रसंघ, क्योटो विद्यापीठाचे ‘सेंटर फॉर साऊथइस्ट एशिया स्टडीज’, भूतान सरकारचे विदेश मंत्रालय या ठिकाणी काम केले. भारतातही सिमला येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडिज्’ येथेही ती फेलो होती. आजारी आईकडे बघण्यासाठी ती १९८८साली बऱ्याच वर्षांनंतर आपल्या देशात परतली. त्याचवेळी म्यानमारमध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या लोकशाहीवादी चळवळीने ती या संघर्षांत खेचली गेली. चळवळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लष्करी राजवटीने अनन्वित अत्त्याचार केले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले गेले त्याचवेळी दॉ सू तेथेच आईची सेवा करत होती. रुग्णालयातील भयानक दृश्य पाहून ती विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेली ती kI could not, as my fatherls daughter, remain indifferent to all that was going onl या भावनेने. तेव्हापासून ती या चळवळीचा महत्वाचा भाग बनली. विद्यार्थ्यांच्या चळवळीचा परिणाम होऊन जनरल ने विनने ‘बर्मा सोश्ॉलिस्ट प्रोग्रॅम पार्टी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एकूणच लोकशाहीवादी चळवळीला जोर चढून ती आणखीनच फोफावली. ‘८-८-८-८ अपरायजिंग’ या नावाने प्रसिध्द असलेली बीएसपीपी सरकारच्या निषेधातील ही चळवळ ८ ऑगस्ट १९८८ साली सुरू झाली. त्यात हजारो लोक मारले गेले.
दॉ सू हळूहळू या चळवळीची प्रमुख कार्यकर्ती झाली. चळवळीचे नेतृत्वच तिच्याकडे आले. रंगूनमधील शेडाँग पॅगोडासमोर तिने २६ ऑगस्ट १९८८ला जाहीर सभा घेतली आणि लोकशाहीवादी सरकार सत्तेत यावे, म्हणून लढा पुकारला. जवळजवळ पाच लाख लोक त्या सभेला हजर होते. तेव्हापासून ते आजपर्यंत सरकारने तिच्याच घरात तिला कैद केले. तरीही जनतेने तिलाच आपले नेतृत्व दिले आहे. परिणामी लष्करी हुकुमशाही राजवटीने प्रयत्न करूनही म्यानमारमधील राजकारण तिच्याभोवतीच फिरत राहिले आहे.
या जाहीर सभेनंतर एक महिन्यातच ‘नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ची स्थापना करण्यात येऊन दॉ सूची त्याच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. त्यानंतर तिच्या आईचे निधन झाले आणि त्यांची अंत्ययात्रा म्हणजे म्यानमारमधील जुलमी, अत्याचारी लष्करी राजवटीचा निषेध करणारी यात्राच ठरली. याचा अपेक्षितच परिणाम झाला आणि २० जुलै १९८९ला दॉ सूला प्रथमच तिच्याच घरात स्थानबध्दतेत ठेवण्यात आले. ती कैदेत असूनही १९९०च्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीने ८२ टक्के जागा जिंकल्या. लष्करशाहीने या निवडणुकांचे निकाल मानण्यासच नकार दिला. तेव्हापासून म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि लोकशाहीवादी नागरिक यांच्यात संघर्ष सुरू आहे. पहिल्या सभेनंतर लष्करी राजवटीने दॉ सूचे सामथ्र्य जाणले आणि तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अगदी शेवटच्या क्षणी एका मेजरने हस्तक्षेप केल्याने तिला मारायला आलेल्या सैनिकांनी तिच्यावर गोळीबार केला नाही व ती वाचली. जीव वाचला तरी आपले स्वातंत्र्य मात्र तिला गमवावे लागले. दॉ सूच्या ६४व्या वाढिदवशी ‘६४ फॉर आँग सॅन सू की’ असे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले. तिच्या स्वातंत्र्याकरता लोकांनी संदेश द्यावेत अशी कल्पना यामागे होती व ती कमालीची यशस्वी झाली. हजारो लोकांनी आपले संदेश पाठवले. तिच्या एका चाहत्याने लिहिले होते, ‘यू विल नेव्हर वॉक अलोन’.
दॉ सूकडे जगाचे लक्ष वळायला मुख्यत: कारणीभूत ठरला तो तिला १९९१मध्ये मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार. कैदेत असताना पुरस्कार मिळालेली ती एकमेव नोबेल पुरस्कार विजेती आहे. नोबेलप्रमाणेच जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार तिला लाभले. १९९०मध्ये ‘साखारोव्ह प्राईज फॉर फ्रीडम ऑफ थॉट,’ ‘न्यूहार्थ फ्री स्पिरीट ऑफ द इयर अवॉर्ड २००३’, भारत सरकारचे ‘जवाहरलाल नेहरू अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडींग’, ‘रॅफ्टो अवॉर्ड ’हे पुरस्कारही तिला मिळाले. तिने नोबेल पुरस्कारासोबत मिळालेल्या १.३ दशलक्ष पौंडांचा बर्मीज लोकांकरता निधी उभारताच सरकारने परदेशात तिने पैसे खर्च केले म्हणून तिची करविषयक चौकशी करायला सुरूवात केली. जागतिक संघटना, महनीय व्यक्ती, संयुक्त राष्ट्रसंघ या सगळ्यांनी आवाहन व प्रयत्न करूनही लष्करी राजवटीने तिला आत्तापर्यंत मुक्त केले नव्हते व करतील याची खात्री नव्हती. क्वचित तिच्यावरची काही बंधने काही काळ थोडीशी हलकी केली गेली आणि परत काहीतरी कारणाने लादली गेली. म्यानमारमधील निवडणुकांकरता कदाचित यावर्षी तिला मुक्त करतील, अशी आशा होती. त्याप्रमाणे निवडणुकांआधी नाही तरी निवडणुका झाल्यावर तिची मुक्तता करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी तिच्या स्थानबध्दतेची मुदत संपत आलेली असतानाच अचानक जॉन यट्टॉ हा अमेरिकन युवक तिच्या घराजवळील तलाव पोहून पार करून तिला भेटायला घरी आला. तो पकडला गेला. अनेकांना असा संशय होता की तिच्या स्थानबध्दतेत वाढ करण्याकरता लष्करी राजवटीनेच त्या तरूणाला पाठवले असावे. काहीही असले तरी त्याचा परिणाम मात्र दॉ सूची स्थानबध्दता वाढण्यात झाली हे खरे.
दॉ सू पक्की बुध्दिस्ट आहे. पण पाश्चिमात्य परंपरा म्यानमारच्या जीवनात आणून तिने स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच बदलले. आपल्या एका कवितेत ती म्हणते
YXA free bird..
which is just freed
used to be caged
now flying with an olive branch
for the place it loves.
A free bird towards a Free Burma.
Why do I have to fight???
तिच्या कवितेतील पक्षी पिंजऱ्यातून मुक्त झाला आहे, पण तिच्या वाटय़ाला हे भाग्य अजून आलेले नाही, केव्हा येईल, माहीत नाही. पण तिचा लढा मात्र अजूनही त्याच जिद्दीने अगदी ६५व्या वर्षीही सुरू आहे. तिच्यात हे बळ कोठून येते याची कल्पना नाही, पण नोबेल पुरस्काराचे एक मानकरी बिशप डेस्मंड टुटु यांनी मात्र तिला नेमके ओळखून, तिचे अचूक वर्णन केले आहे :kIn physical stature she is petite and elegant, but in moral stature she is a giant. Big men are scared of her. Armed to the teeth and they still run scared.l
( सौजन्य- लोकसत्ता  )