गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

महागाईमधील स्वस्ताई

मागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यात पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते.तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु मागील १० वर्षात एक गोष्ट महाग झाली नाही याबाबत कोणीही काही बोलत नाही किंवा चर्चाहि करत नाही ती माणसाची सवयच  आहे म्हणा ;) असो तर ती गोष्ट कोणती हे तुमच्या लक्षात आले कि नाही ? तुम्ही म्हणत असाल कि मागील १० वर्षात महाग झाली नाही अशी गोष्ट असणे शक्यच  नाही परंतु तसे आहे. त्या गोष्टीवर सर्व प्रकारच्या भाववाढीचे परिणाम होतात जसे डीझेल,कागद,शाई,मनुष्यबळ या सर्वांचे परिणाम त्या गोष्टीवर होत असतात परंतु तरीही ती मागील काही वर्षात वाढली नाही परंतु काही वेळा ती स्वस्त झाली. तर ती गोष्ट म्हणजे 'वर्तमानपत्र'. यात कधी भाववाढ झालेली तुम्हाला आठवते का? उलट काही वर्षापूर्वी २ रुपयात दिले जाणारे वर्तमानपत्र आता १ रुपयात तेही भरपूर पाने आणि रंगबेरंगी पुरवण्यासहित  मिळत आहे.हे कसे शक्य होत असावे? फक्त जाहिरातींच्या जोरावर ? कि समाजसेवेच्या भावनेतून ते स्वता तोटा सहन करून हे करत आहेत? ज्या गोष्टीला तयार होण्यासाठी किमान ४-५ रुपये खर्च येत असावा परत त्यावर वाहतूक खर्च ,विक्रत्यांचे कमिशन आलेच अशी गोष्ट फक्त १ रुपयात देणारे रोज लाखो रुपये तोटा सहन करून अजून तग धरून कसे काय टिकू शकतात ?
 व्यावसायिक स्पर्धेतून हे होत आहे हे जरी मान्य केले तरी हि वर्तमानपत्र कोणत्याना कोणत्या समूहाची बांधील आहेत आणि ते समूह कोणत्यातरी राजकीय पक्षाशी बांधील आहेत हे लक्षात येईल.त्यामुळेच ते इथे तोटा सहन करून दुसरीकडे कोठेतरी याहून जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असावेत का ? स्वस्तात अंक देऊन ते सर्वसामान्य माणसाला आकर्षित करतात आणि एकदा सवय लागली कि जे त्यांना हवे आहे तेच वाचायला लावतात म्हणजेच ते आपलीच मते लोकांच्या मनावर बिंबवतात !
म.टा. पुण्यात आला त्यावेळी त्याने काय केले आठवा जरा किती रुपयात तो लोकांना दिला गेला.आता विदर्भात 'दिव्य मराठी' येत आहे १९९ रुपयात वर्षभर म्हणजे १ रुपयासुद्धा नाही दिवसाला. काही दिवसापूर्वी वृतपत्र १ रुपयाला देण्यास काही विक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यावेळी 'लोकमत' ने काय केले हेही आठवत असेलच.
जनतेपर्यंत कुठली माहिती कोणत्या स्वरुपात पोहचवायची हा निर्णय वरून घेतला जातो आणि त्याप्रमाणे गलेलठ्ठ पगार घेणारे संपादक, मिंधे झालेले पत्रकार राग आवळतात आणि सामान्य माणूस तेच सत्य आहे याच समजुतीत वाचत राहतो. यात तसा सामान्य माणसाचाही दोष आहेच स्वस्तात मिळणाऱ्या भरपूर पाने असणाऱ्या आणि रंगीत पुरवण्यांच्या मोहात अडकून आपण त्यांच्या आहारी जातो व सत्याचा पाठपुरवठा करणारी पत्रकारिता कचऱ्याच्या टोपलीत जाते.अशी किती तरी चांगली वृतपत्रे मागे पडली किंवा बंद झाली आहेत या स्पर्धेमध्ये हे तुमच्या लक्षात येईल.
 स्वस्तातील दारू,स्वस्तातील औषधे शेवटी प्राणघातक असतात. मग स्वस्तातील वर्तमानपत्र कितीही पानांचे आणि रंगीत असलेतरी ते भेसळयुक्त असणारच ना ? त्यातून खरी,प्रबोधन करणारी माहिती कशी मिळणार ? आपणच विचार करा.
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातून घेतले आहेत)
जय हिंद !
जय महाराष्ट्र !