ruchika लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ruchika लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

हा 'उत्सव' चूक कि बरोबर ?

काही दिवसापूर्वी २६ जानेवारीला A WEDNESDAY हा चित्रपट  परत पाहण्याचा  योग आला थोडासा 'डोंबिवली फास्ट' धाटणीचा  हा सुद्धा, सामान्य माणूस सरकारी यंत्रणेला वैतागल्यावर काय करू शकतो किंवा त्याच्या  भावना काय असू  शकतात याची  उत्तम पद्धतीने मांडणी केलेले हे दोन चित्रपट. परंतु असे खरच होऊ शकते का ? किंवा सामान्य माणूस या पातळीवर उतरू शकतो का ? सामान्य माणसाने असे  काही केलेतर योग्य होईल का ? असे प्रश्न मनामध्ये  येत होते.
 आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज  आली आरुषीचे वडील राजेश तलवार यांच्यावर न्यायालय परिसरात एका माथेफिरूने धारदार  शस्त्राने डोक्यावर वार केले. सुरवातीला वाटले कोणीतरी माथेफिरूच असावा परंतु त्याचे नाव ऐकल्यावर ते ओळखीचे वाटले 'उत्सव शर्मा ' हाच तो ज्याने  या अगोदर असेच कृत्य केले होते. हरयाणाचा  माजी पोलिस महासंचालक एसपीएस राठोड चंडीगढ न्यायालयातून बाहेर येत असतानाच असाच  त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याचा अर्थ हे त्याने जाणून बुजून केले होते.त्याने असे का केले असावे या दोन्ही केसशी त्याचा दुराय्न्वे हि संबंध नाही मग त्याने असे पाऊल का उचलावे ? कोण हा उत्सव शर्मा ?

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन या संस्थेत अॅनिमेशन फिल्म डिझाईनचा विद्याथी असलेला उत्सव शर्मा हा एक हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. हा फक्त तो भावनिक  आहे. परंतु आपल्या देशात एवढ भावनिक राहून चालत का हो ? पण त्याला त्याची जाण नसावी अजून शिकत आहे ना त्यामुळेच. रुचिका प्रकरणावर तो एक डॉक्युमेंटरी बनवत होता त्यावेळी तो या केस शी जोडला गेला. रुचिका गिरहोत्रा या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या आणि तिच्या कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना राहते घर सोडण्यास भाग पाडणाऱ्या राठोडचा १९ वर्षांनीही न्याय झालेला नाही. पोलिस यंत्रणेत उच्चपदावर असलेल्या राठोडला वाचविण्यासाठी अख्खी व्यवस्था कशी कामाला लागली होती. न्यायालय त्याला शिक्षा देण्यास असमर्थ ठरत होते हे पाहूनच उत्सवने त्याच्यावर हल्ला केला होता.
 असाच काही  प्रकार आरुषी-हेमराज खून प्रकरणात झाला आहे. राजेश तलवार यांच्यावर स्वताच्या मुलीच्या खुनाचा आरोप आहे परंतु पुराव्या अभावी हि केस उभी राहू शकत नाही असे कारण देऊन सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.आणि राजेश तलवारची सुटका करण्यात आली आहे.सीबीआयलाही गुन्हा सिद्ध करता येत नाही आणि न्यायालयाला पुरावे हवे आहेत.ज्याच्याकडे पैसा,ताकत,सत्ता आहे तो काहीही करू शकतो आणि सुटू शकतो हे यावरून दिसून येते.
 मग न्याय कुठे आहे आणि सामान्य माणसाला तो कसा मिळणार ? कि पैसेवाले लोकशाहीची चेष्टा करत राहणार आणि सामान्य माणूस फक्त पाहत राहणार ?
 या अशाच घटनांमुळे आपल्या मनात हि चीड निर्माण होते आणि उस्तव सारखे लोक त्या रागाला अशाप्रकारे वाट मोकळी करून देतात त्याची पद्धत चुकीची जरूर असेल परंतु त्या सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत असे तुम्हाला वाटत नाही का ? जश्या त्या वरील २ चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 तलवार यांच्या हल्ल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता  पत्रकारांना तो म्हणाला 'मी भावनाप्रधान आहे.त्यामुळे या हल्ल्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.तुम्ही सर्वजण सध्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहतच आहात.आरुषी खुनाबद्दलही सर्वाना चांगलेच माहिती आहे.मात्र पुरावे नाहीत त्यामुळे इथे न्याय मिळणार नाही.सीबीआय  ने क्लोजर रिपोर्ट दिला आहे त्यामुळे पुढे काहीच होणार नाही.न्याय आपल्या मार्गाने जातो आणि आपण सर्वजण केवळ पाहत बसतो !या केसमध्ये तलवार चुकीचा आहे.रुचिका सारखीच हि केस हि अनेक वर्ष चालेल.मात्र हाती काहीच लागणार नाही. '
 उत्सव माथेफिरू आहे मानसिक रुग्ण आहे फक्त असे सांगून या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याने असे का केले,त्याच्यावर अशी वेळ का आली याचाही विचार होण्याची गरज आहे.आज अनेक गुन्हे करूनही कितीतरी लोक उथळ माथ्याने समाजात फिरत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा न्यायपालीकेवरील विश्वास कमी होत चालला आहे.सीबीआय सारख्या संस्थाही लाचार होत आहेत.त्यामुळे न्यायालयात अन्याय झालेल्याला न्याय मिळतो कि त्याच्यावर अजून अन्याय होतो असा प्रश्न पडायला लागला आहे.
 रोजच्या अशा घटनांमुळे  सामान्य माणसाचे मन मरून गेले आहे त्यांना याचे आता काहीच वाटत नाही आणि ज्याला काही वाटते तो असा 'उस्तव' बनतो.
मलातरी हा उस्तव चूक वाटत नाही तुम्हीच तुमच्या मनाला विचार आणि ठरवा हा 'उत्सव' चूक कि बरोबर.

मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

जेसिका ते रुचिका

…And Justice for All album coverImage via Wikipedia
जवळजवळ दोन दशकांच्या कोर्टकचेरीनंतर ‘सीबीआय’च्या स्पेशल कोर्टाने अवघ्या सहा महिन्यांची कैदेची शिक्षा देऊन लगेच जामिनावर सोडल्यावर हरयाणाचा माजी पोलीस महासंचालक एस.पी.एस. राठोड याच्या चेहऱ्यावर फुललेले खुनशी हास्य बघून बॉलीवूडमधल्या अव्वल खलनायकांनीही लाजेने मान खाली घातली असेल. पोलिसाच्या वर्दीतील कायद्याचा भक्षक बनून कारकीर्द ‘गाजविताना’ राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने राठोडने हिंदूी चित्रपटातील जुलूम आणि दडपशाहीची बीभत्स पटकथा प्रत्यक्षात साकारली. सत्तेचा दुरुपयोग करून कायद्याला पायदळी तुडविणाऱ्या राठोडने नव्वदीच्या दशकातील उदयोन्मुख टेनिसपटू रुचिका गिरहोत्राच्या विनयभंगाने सुरुवात केली आणि तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून ते तिच्या कुटुंबाला देशोधडीला लावेपर्यंत त्याने उसंत घेतली नाही. गेल्या वीस वर्षांत बजावलेल्या या महान ‘कर्तृत्वा’दाखल हरयाणा सरकारने त्याला पोलीस महासंचालकाचे सर्वोच्च पद देऊन गौरविले, तर भारत सरकारने त्याला राष्ट्रपती पदकाने भूषविले. हिंदूी चित्रपटात राठोडसारख्या दुष्टात्म्याचा अंत नायकाच्या हातून होतो. प्रत्यक्षात न्यायासाठी अथक लढा देऊन अल्प कैदेचा का होईना, न्याय पदरी पाडून घेत गिरहोत्रा आणि प्रकाश कुटुंबीयांनी त्याच्या शेवटाची सुरुवात केली. सहा महिन्यांच्या शिक्षेवर सुटलेल्या राठोडच्या चेहऱ्यावरील ते हास्य बघून प्रसिद्धी माध्यमे आणि जनमानसात तीव्र संतापाचा डोंब उसळला. त्या हास्याचा अर्थ प्रकाश आणि गिरहोत्रा कुटुंबीयांना कळत होता. राठोड निवृत्त झाला असला तरी पोलीस प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात त्याचे उपद्रवमूल्य शाबूत असल्यामुळे भविष्यात तो मुस्कटदाबीची नवी मालिका सुरु करू शकतो, याची जाणीव त्यांना झाली होती. त्यांच्या सुदैवाने राठोडच्या गुन्ह्याकडे नरमाईच्या दृष्टीने पाहणाऱ्या व्यवस्थेवर राष्ट्रीय पातळीवर टीकेची झोड उठली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यांनी या राठोडची दुष्कृत्ये आणि त्याला मिळालेल्या सौम्य शिक्षेवर राज्यसभेत ताशेरे ओढले. त्यापाठोपाठ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष गिरिजा व्यास यांनी राठोडवर कारवाईची मागणी केली. गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या आदेशावरून त्याचे निवृत्तिवेतन बंद करण्याची आणि राष्ट्रपती पदक काढून घेण्याची कारवाई सुरु झाली. रुचिकावरील मरणोत्तर अन्यायाच्या विरोधात काही संघटनांनी इंडिया गेटपाशी मेणबत्त्या लावून निषेध नोंदविला. हरयाणातील हुड्डा सरकारने त्याच्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे ठरविले. वीस वर्षांंपासून मेहेरबान असलेले राठोडचे ग्रह अचानक फिरले आणि त्याच्या कृत्यांची झाडाझडती नव्याने सुरु झाली.
१२ ऑगस्ट १९९० रोजी रुचिकाचा हरयाणातील पंचकुलाच्या टेनिस कोर्टावर राठोडने विनयभंग केला. त्याच्याविरोधात रुचिकाने तक्रार नोंदविली आणि तेव्हापासूनच तिच्या आयुष्याला अर्थ राहिला नव्हता. राठोडच्या प्रभावाखाली असलेल्या हरयाणा पोलिसांनी रुचिकाच्या भावाविरुद्ध वर्षभरात चोरीच्या सात तक्रारी दाखल करून त्याला पोलीस ठाण्यात अनेकदा राठोडच्या उपस्थितीतच अनन्वित यातना दिल्या. राठोडच्या दबावाखाली रुचिकाला शाळेतून काढून टाकण्यात आले. तिच्या वडिलांची नोकरीही गेली. आई नसलेल्या रुचिकावर देखरेख ठेवण्यासाठी राठोडच्या इशाऱ्यावरून वीणा नावाची महिला तिच्या घरी ठेवण्यात आली आणि न्यायालयात वीणाची जबानी तिची आई म्हणून नोंदविण्यात आली. रुचिकाच्या विनयभंगाची साक्षीदार ठरलेली तिची मैत्रिण आराधना, तिचे वडील आनंद प्रकाश आणि आई मधु प्रकाश यांनी राठोडने चालविलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरूनच दहा वर्षांंनंतर राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण तोपर्यंत रुचिकाची इहयात्रा संपली होती. हरयाणाचा पोलीस महासंचालक म्हणून राठोडची ओमप्रकाश चौटाला सरकारने पदोन्नती केली होती आणि त्याने केलेल्या ‘उल्लेखनीय’ सेवेदाखल राष्ट्रपती पदकासाठी त्याच्या नावाची शिफारसही केली होती. रुचिकाचा भाऊ पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत अट्टल चोर बनला होता. एक कुटुंब पूर्णपणे विस्कटून गेले होते.
१९९० पासून २००२ साली बढत्यांसह निवृत्त होईपर्यंत एस. पी. एस. राठोडला नेमका कोणत्या मुख्यमंत्र्याचा वरद्हस्त लाभला यावर सध्या वाद सुरु आहे. जनता दलाचे हुकूम सिंह, काँग्रेसचे भजनलाल, हरयाणा विकास पार्टी-भाजपचे बन्सीलाल आणि इंडियन नॅशनल लोकदल-भाजपचे ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री असतानाच्या काळात राठोडची ‘भरभराट’ झाली. देशातील अन्य कोणत्याही राज्याप्रमाणे हरयाणातही राजकीय नेते, त्यांच्या आश्रयावर पोसलेले गुंड आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून दिवसरात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे लचके तोडले जातात. कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबल्याचे दाखवायचे आणि त्यांना पोलिसांच्या मदतीने मोकळे सोडून राजकीय प्रतिस्पध्र्यांचा ‘एन्काऊंटर’ करण्याचीही क्लृप्तीही या राज्यात बिनबोभाट राबविली जाते. कायद्याचा ‘वापर’ करून आपल्या राजकीय विरोधकांना कायमचे वा तात्पुरते गप्प बसविण्यासाठी पोलिसांचा परिणामकारकपणे वापर करता येतो. राजकीय नेते आणि पोलीस एकमेकांना कसे पूरक ठरू शकतात, हे त्यातून दिसून येते. काही नेते गृह मंत्रालयावर जीवापाड प्रेम का करतात, याचेही उत्तर त्यात दडलेले आहे. राज्यकर्त्यांंना पडद्यामागे हिशेब चुकते करण्यासाठी वर्दीतील ‘डर्टी हॅरी’ हवेच असतात आणि राठोडसारखे पोलीस अधिकारी त्यांना उपकृत करण्यासाठी तत्परच असतात. राठोडला पदोन्नती आणि पदक मिळवून देण्यात आपली कोणतीही भूमिका नाही, असे चौटाला निर्लज्जपणे सांगत असले तरी ते वस्तुस्थिती नाकारू शकत नाहीत. ‘बना बनाया डीजीपी’ मिळाल्यानंतर त्याच्याकडून कोणकोणती कामे करून घ्यायची, हे चौटाला आणि त्यांच्या पुत्रांना सांगण्याची गरजच नव्हती.
रुचिका प्रकरणामुळे या सर्व गोष्टींची आता नव्याने चर्चा होऊ लागली आहे. ज्या राज्यात वर्षांनुवर्षे पुरुषी वर्चस्व आहे आणि जिथे जन्मापासूनच मुलींविषयी तिरस्कार बाळगला जातो, अशा दरहजारी ८६१ एवढे देशात सर्वात कमी मुलींचा जन्मदर असलेल्या हरयाणात रुचिकावर झालेल्या अन्यायाबद्दल कुणाला फारसे वावगे वाटत नाही. क्षुल्लक कारणासाठी राठोडला विनाकारण गुंतविण्यात आले, अशीच सर्वसामान्यांची मानसिकता तिथे आहे. पण या निमित्ताने दिल्लीतील प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष दिल्लीबाहेरच्या प्रकरणांकडे वळले आणि त्याचा फटका मस्तीत वागणाऱ्या राठोडला बसला. भविष्यात बडय़ांच्या अन्यायाला बळी पडलेल्या मध्यमवर्गापासून गरिबांचीही दखल घेतली जाईल, अशी आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. १९९९ साली मनु शर्माच्या पिस्तुलाची बळी ठरलेल्या जेसिका लाल प्रकरणी आलेल्या निकालावर क्षुब्ध झालेल्या सर्वसामान्यांचा आवाज प्रसिद्धी माध्यमांनी बुलंद केला होता. इंडिया गेटपाशी स्वयंसेवी संस्थांनी मेणबत्त्या घेऊन केलेल्या मूकआंदोलनाने या आवाजाला धार प्रदान केली होती. त्या प्रवासातील एस. पी. एस. राठोड हा नवा प्रवासी ठरला आहे. त्याची ‘मीडिया ट्रायल’ झाल्याने या प्रकरणात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांच्या मनात दहशत बसविणाऱ्या झगमगत्या लाल बत्तीच्या मस्तवालपणाला मिणमिणत्या मेणबत्तीने पुन्हा एकदा जेरीस आणले आहे. खलनायकी हास्य करणारा राठोड वैयक्तिक जीवनात हिंदूी चित्रपटाच्या पटकथेनुसार वागला, आता हिंदूी चित्रपटांना वास्तवातील खलनायकांची मस्ती उतरविणाऱ्या मेणबत्त्यांची दखल घ्यावी लागणार आहे. जेसिका ते रुचिका प्रकरणांनी हेच दाखवून दिले आहे.
(सौजन्य-लोकसत्ता)
Enhanced by Zemanta