शिवाजीमहाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवाजीमहाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ जुलै, २०१०

क्षमस्व महाराज क्षमस्व....

होय महाराज, आम्हाला उदार  अंतकरणाने  माफ करा; कारण आम्ही कोडगे आणि लाजलज्जा कोळून प्यायलेले बेशरम मराठी लोक आहोत.आम्ही अत्यंत निर्ढावलेले नालायक भारतीय आहोत.आम्हाला तुमचे कर्तुत्व पुढे चालीवता आले नाही;पण तुमच्या त्या महान कर्तबगारीचा सन्मान व प्रतिष्ठा राखणेसुद्धा अशक्य झाले आहे.आम्ही इतके आत्मकेंद्री आणि svarthane गडबडून गेलो आहोत,कि आमचा पूर्वज,आमचे दैवत असलेल्या तुमच्यावर कोणीही गरळ ओकावी इतके आजाराक तुमच्या या हिंदुस्तानात आज माजले आहे.तुम्ही ज्याचा कोथळा बाहेर काढलात त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेला या देशात आज धक्का लागू शकत नाही;पण महाराज आपली प्रतिष्ठा पायदळी तुडविण्याचा मुलभूत अधिकार कोणालाही असू शकतो;कारण तुमचे नाव आता स्वाभिमानाशी ,कर्तव्याशी जोडले नसून स्वार्थासाठी ते चलनी नाणे झाले आहे.कुणासाठी तुम्ही मराठा जातीचे तर कुणासाठी तुम्ही कुणबी असता.कुणासाठी मराठी तर कोणासाठी हिंदू असता.या देशाचा उदगाता  म्हणून तुमची कोणाला ओळख राहिलेली नसावी.नाही तर लेनच्या अधिकारासाठी कोर्टात धावणारे इथे कशाला निपजले असते? मराठा म्हणून सत्तेवर हक्क सांगणारे किंवा शिवाजीवर अधिकार सांगणारे आज आम्हाला न्यायालयाचा सन्मान राखण्याचा सल्ला देत आहेत.महाराष्ट्रात शिवाजीबद्दल अभिमान बाळगणे अथवा त्या राजाच्या अवमानाने प्रक्षुब्ध होणे आक्षेपार्ह ठरिवले जात आहे.त्यावर न्यायालयाची मान्यता मिळवली जात आहे.त्या आम्हा मराठ्यांना वा मराठी माणसाना तुमचे नाव घेण्याचा अधिकार तरी उरतो काय ? महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि त्यात मराठीचा अभिमान बाळगणे गुन्हा आहे.महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि तिथे त्या राष्ट्रपुरुषाचा अवमान ,अप्रीतीष्ठेला विरोध करणे हा अपराध झालेला आहे.मग महाराज, आम्ही कुठल्या तोंडाने तुमचे नाव घ्यायचे ? तुमचा  जयजयकर तरी करायचा अधिकार आम्हाला उरतो काय ?
 पन्नास साठ वर्षात या देशाची वैचारिक व बौद्धिक घसरगुंडी किती झाली असावी ? जे आदर्श आणि अभिमानाच्या खुणा आहेत त्यांचाच गर्व बाळगणे आता गुन्हा झाला आहे.कोणीही यावे आणि आमच्या अभिमानाला,स्वाभिमानाला लाथ मारावी इतकी स्वातंत्र्याची गटारगंगा दुथडी भरून वाहू लागली आहे.ज्या अभिमानाने या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले तीच प्रेरणा आज कवडीमोल झाली आहे.कुठली तरी कंपनी विमानतळाचे पुननिर्माण करते आणि तिथला शिवरायांचा पुतळा अडगळ हलवावी त्याप्रमाणे इतरत्र उचलून नेण्याचे मनसुबे रचते.कुणी अमेरिकन शहाणा इतिहासाचा अभ्यास करायला येतो आणि आमच्या दैवतावर चिखलफेक करून निघून जातो.तुमच्या पराक्रमाचे चित्र फलकावर लावले तर त्याच्यावरही आमचेच राज्यकर्ते bandi घालतात.त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेची कायद्याला च्न्ता आहे.शिवरायांची बदनामी करणार्याच्या अविष्कार स्वातंत्र्याला इथे कायद्याचे संरक्षण आहे;पण ते स्वातंत्र्य कोठून आले.कोणामुळे आले,कुठल्या प्रेरणेने मिळू शकले,याचेही स्मरण कुणाला उरलेले नाही.त्याच स्वातंत्र्याने अविष्कार स्वातंत्र्य राज्य घटनेत समाविष्ट होऊ शकले.आज तेच अविष्कार स्वातंत्र्य वापरून कशावर घाला घातला जातो आहे? शिवराय या नावाच्या एका ज्वलंत राष्ट्रीय प्रेरणेवर हल्ला झाला आहे.ती प्रेरणा मारली गेली,निष्प्रभ झाली तर स्वातंत्र्याला ग्लानी यायला वेळ लागणार नाही.तसे झाले तर मग कुणाला अविष्कार स्वातंत्र्यहि उपभोगता येणार नाही;कारण राष्ट्रीय स्वातंत्र्याला बाधा आणणारे स्वातंत्र्य घातक असते. शिवरायांची बदनामी हा केवळ मराठी -मराठ्यांचा विषय नसून भारतीय स्वातंत्र्याची उपजत प्रेरणा आहे.तिच्यावर हल्ला राष्ट्रविघातक ठरल्याशिवाय राहणार नाही.
  जेम्स लेनचे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर शिवसेना, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनांनी हुल्लड माजवली होती.म्हणून  त्यांच्यापुरता विषय नाही,तो फक्त महाराष्ट्राचा विषय नाही,कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी नावाचा झंझावात उभा राहिला तो महाराष्ट्राला मुक्त करण्यापुरता नव्हता.त्याने अटकेपार झेंडे लावले.तंजावर पासून दिल्लीपर्यंत धडक मारली.त्यामुळेच आज हिंदू किंवा भारतीय म्हणवणारे सन्मानाने जगू शकत आहेत.तेंव्हा शिवाजी या शब्दाशी प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान जोडलेला आहे.तो कायद्याचा किंवा न्यायालयाचा विषय नाही.सरकारने असल्या पुस्तकावर बंदी घालायलाच नको होती.आम्हा भारतीयांच्या भावनाच इतक्या तीव्र हव्यात,कि असे पुस्तक छापण्याची व विकण्याची कोणाला हिम्मत होता कामा नये.ज्यांनी चार वर्षापूर्वी याप्रकरणी रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले त्यांनी एक अतिशय गंभीर चूक केली होती.सरकारने त्यावर बंदी घालण्याची अपेक्षा चूक होती आणि न्यायालाने ती चूक ठरवली आहे.लोकांच्या भावना व श्रद्धा हा सरकार व कायद्याचा विषय नसतो आणि असता कामा नये.तो सामान्य माणसाने स्वताच निकालात काढायला हवा.आम्हा शिवप्रेमी,शिवभक्तांच्या भावना इतक्या प्रखर हव्यात ,कि कुणा पुस्तकाच्या दुकानदार,विक्रेत्याला असे पुस्तक जवळ बाळगण्याची भीती वाटायला हवी.हे सत्य शिवप्रेमी म्हणून मिरवणारे विसरून गेले.तिथेच सगळी गफलत  झाली आहे.शिवरायांनी दिल्लीश्वराकडे न्याय मागितला नव्हता.त्यांनी न्याय मिळवला होता.आपली ताकद अशी सिद्ध केली ,कि अन्याय करू पाहणार्याची हिम्मत खचली होती.शिवाजी या नावाबद्दल,व्यक्ती व कर्तुवाबद्दल आस्था असलेले ती ताकद दाखवणार आहेत काय ?तरच त्यांना व आम्हा भारतीयांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार असेल.तो अधिकार आपण सिद्ध करणार काय ????
 जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली गेली त्यानंतर  ४-५ दिवस त्यावर चर्चा झाल्या, निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम झाला परत सर्व शांत सर्वजण  आपापल्या कामात दंग झालेआहेत परंतु हा तोरसेकरांचा  लेख माझ्या मनाला  अस्वस्थ करून गेला आहे.मी फक्त एवढेच म्हणू शकेल क्षमस्व महाराज क्षमस्व.

शनिवार, २७ मार्च, २०१०

साल्हेर ... एक बुलंद किल्ला

साल्हेरचा बुलंद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे.त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३ मीटर्स आहे.त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे.तो साल्हेरचा उपदुर्ग आहे.एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक ठरतो,म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात.साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या,रतनगड (नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात.पश्चिमेला अजंटा-सातमाळा रांग दिसते.सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत.त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे.साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर  यावयास पायवाट आहे.इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.
 इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.या युद्धाचे मोठे रंजक वर्णन बखरीत आले आहे.
'एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला कि  तीन कोश औरस-चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्द जाहले.घोडी,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजीयाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव जाहला.ऐसा कुल सुभा बुडवला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.'



 या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.'भारती जैसा कर्ण तैसा' असे त्याचे वर्णन आले आहे.साल्हेर दुर्गाच्या सालोट्याच्या बाजूस खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी हि अभ्यासण्यासारखी आहेत,पण दुसर्या बाजूकडचे दगडात कोरलेले कठडा असलेले कड्याच्या टोकावरचे जिने आपल्याला थक्क करतात.कोणी केले असेल हे काम ????

बुधवार, ३ मार्च, २०१०

सध्याचे तरुण शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श घेतील का ?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज ३८० वी जयंती . तसे पाहण्यास गेलेतर १९ फेब्रुवारीला तारखेनुसार किंवा शासकीय शिवजयंती नुकतीच झाली परंतु त्याचा शासनालाच विसर पडला होता ते जाऊ द्यात. आम्ही दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करतो ती म्हणजे फाल्गुन कृष्ण तृतीयेला, जसे आम्ही आमचे हिंदू  सण,उत्सव  साजरे करतो तसे. शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच आहेत आणि राहतील असो ...
हिंदू धर्म व हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असताना लहानवयात 'स्वराज्य व स्वधर्म' याची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा शिवरायांनी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांचे कार्य समस्त देशाला प्रेरणा देणारे आहे.परंतु खरच हिंदुस्तानातील लोकांनी विशेषता तरुणानी महाराजांकडून प्रेरणा घेतली का ?
ज्या शिवाजी महाराजांनी मुठभर तरुणांना हाताशी घेऊन इस्लामी राजवट नेस्तनाबूत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणत्या बळावर याचा विचार केला पाहिजे.हाताशी अपुरे संख्याबळ,अपुरी शस्त्रसामुग्री ,अपुरा पैसा असताना बलाढ्य असणार्या मुघलांचा मुकाबला केला.आपला गनिमी कावा,कल्पक डावपेच,निर्भयता याच बरोबर हिंदू धर्माचे बळ आणि तेज मोघालाना दाखवले.
हे बळ त्यांना कुलदैवत आई जगदंब तुळजाभवानी यांच्या कृपेने आणि माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आले होते.कुलदेवतेची उपासना आणि आईचे मार्गदर्शन हि एक मोठी शक्ती आहे हे महाराजांनी जाणले होते परंतु आपण हे आता विसरलो आहोत.
 आजच्या तरुणांसमोर योग्य मार्गदर्शन नसल्याने तरुण पिढी वैयक्तिक स्वार्थात गुंतलेली दिसत आहे.करियर च्या नावाखाली झटपट पैसा मिळवणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सध्याची तरुण पिढी रममाण आहे. आपल्या राष्ट्रात घडत असलेल्या गैरकृत्याविरुद्ध विचार व कृती करण्याची तसदी घेणारे तरुण सध्या दुर्मिळ झाले आहेत.
तसेच सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आत्मबळाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे तरुण आत्महत्यासारख्या दृष्टचक्रात ओढले जात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणासारखा राष्ट्राभिमान आणि धर्मभिमान सध्याच्या तरुणात दिसत नाही.कारण आजची निधर्मी बोलली जाणारी शिक्षणपद्धती आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे नवीन पिढी बुद्धीने हुशार;परंतु मानाने दुबळी व स्वार्थी बनली आहे.
देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे.शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरशांचे आदर्श तरुणांसमोर हवेत.परंतु आजच्या तरुण पिधेचे आदर्श हे अभिनेते,खेळाडू यांच्यापर्यंत सीमित झाले आहेत. हे आदर्श योग्य आहेत का ?
हे चुकीचे आदर्श आपल्याला शेजारील शत्रूराष्ट्राशी,अतिरेक्यांशी लढण्याचे बळ देणार आहेत का ? अशा चुकीच्या आदर्शामुळे जम्मू काश्मीर चा भाग गिळंकृत करणारा देशात स्पोट घडवणारा पाकिस्तान,पूर्व भारताकडे वक्रदृष्टीने पाहणारा चीन आणि घुसखोरी करणारा बांगलादेश यांच्यापासून सध्याचे तरुण अनभिज्ञ राहत आहेत.
त्यामुळे तरुणांना योग्य आदर्श दाखवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
तरुणांनी आपल्यातील सुप्त सामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसे केल्यानेच शिवाजी महाराज बालवयात बलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकले. माता जिजाऊ यांनी त्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम यांच्यासारखे आदर्श ठेवले होते आणि धर्मनिष्ठेचे बाळकडू पाजले होते.आजच्या तरुणांनीही आपले शिवतेज जागृत केले पाहिजे आपले आध्यात्मिक बळ वाढीवले पाहिजे. आपल्या सण-उत्सवाचे पावित्र्य थाळू न देता सह्स्त्रानुसार साजरे करायला हवेत.आपल्यातील मानसिक दुर्बलता कमी करून राष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा  अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार,त्यातून मिळणारी प्रेरणा व तेज फक्त तरुणानंच नाह्वेतर समस्त देशाला जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकते.जो आमचा जगण्याचा अधिकार हे राष्ट्रद्रोही व पाकडे अतिरेकी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजच्या शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करूयात आणि एक सामर्थ्यशाली हिंदुस्तान बनवण्याचा निश्चय करूयात.


निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !