मंगळवार, २१ जून, २०११

प्रत्येकालाच वेगळा कायदा करायचा का ?

समाजात लोकोपयोगी  कार्य,व्यवसाय,व्यवहार करणारे फक्त पत्रकारच आहेत का ? डॉक्टर,वकील,शिक्षक,दुकानदार,संशोधक,इतिहासकार,कलाकार,पत्रकार  इत्यादी असे अनेक पेशे आहेत जे लोकोपयोगी कार्य करत असतात.त्यातल्या प्रत्येकालाच कधीना कधी समाजाच्या रोषाला या न त्या कारणाने सामोरे जावे लागते.त्यातल्या प्रत्येकालाच जमावाने कधीतरी झोडपलेले असते.कारण सामान्य  माणूस  त्यांच्यावर  जेवढे  प्रेम  करतो  तेवढाच  काही  प्रसंगी  संतप्तही होतो.अशा प्रसंगाला व्यावसायिक धोका असे म्हणतात.त्यात पत्रकारसुद्धा येतात मग त्यांना खास संरक्षण किंवा कायदा  याची गरज का असावी ?
 पत्रकारितेवरील हल्ला आणि पत्रकारावरील हल्ला यात फरक आहे.मिड डे चे पत्रकार जे.डे आणि निखील वागळे यांच्यावरील झालेले एखाद्या संघटनेचे हल्ले यात फरक आहे.डे यांनी समाजातील अपप्रवृत्ती आणि गुन्हेगारी यांचा मुखवटा फाडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांच्यावर समाजातील खरया गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.त्यामुळे अशा हल्ल्यांकडे गुन्हा म्हणून पाहण्यास हवे.परंतु एखाद्या  व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला लक्ष बनवून हेतुपूर्वक हैराण किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न लिखाणातून होतो तेंव्हा होणारा हल्ला हा त्याची प्रतिक्रियाच असते.त्यामुळे त्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे असते.
पत्रकारिता आणि पक्षीय राजकारण यातील रेषा धूसर असते आणि ती पत्रकाने ओलांडू नये.अलीकडे काही लोकांकडून त्याचे भान न ठेवले गेल्याने अशे हल्ले वाढले आहेत.
 तसेच आजकाल पत्रकारांच्या सुरक्षेसाठी किंवा होणार्या हल्ल्यासंदर्भात खास कायदा करण्याची मागणी होत आहे.विशेष म्हणजे समतेचे पुरस्कार करणारे विचारवंत आणि पत्रकार यासाठी आग्रही आहेत.एकीकडे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या समतेचे डोस पाजायचे आणि दुसरीकडे अशा कायद्याने सामान्य माणूस आणि पत्रकार अशी दरी निर्माण करायची हे मोठे चमत्कारिक आहे. हा विरोधाभास नाही  का ?
 समता म्हणजे सर्व समान किंवा सर्वांसाठी समान.मग तो कायदा असो न्याय असो किंवा वागणूक.पूर्वीच्या काळी असे
होते उच्चवर्णीय,सत्ताधारी लोकांना वेगळी आणि पिडीत शोषित लोकांना वेगळी वागणूक दिली जात असे.त्यामुळेच पूर्वीच्या काळी वर्णवाद,वर्णवर्चस्ववाद फोफावला होता.त्या लोकांना आम्ही श्रेष्ठ,विचारवंत,बुद्धिवंत म्हणून खास वागणूक मिळाली होती आणि व्यवहारी श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते आणि कनिष्ठ,शोषित यांना दुय्यम ठरवण्यात आले होते.आणि त्याच विषमतेला संपवण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर यांनी त्यांची पूर्ण हयात घालवली होती.हि विषमता मोडून पुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी शेकडो लढे द्यावे लागले कितीतरी वर्ष खर्च करावी लागली.आणि आता पुन्हा अशीच वेगळ्या प्रकारची विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 पत्रकार हा समाजाचा घटक नाही का ? तोही देशाचा एक सामान्य नागरिकच आहे.त्यावरील हल्ला आणि सामान्य नागरिकावरील हल्ला यात फरक का असावा ? पत्रकारांना विशेष कायदा करण्याचा अर्थ सामान्य माणसाला दुय्यम ठरवणे नाही का ? असेच असेलतर लोकोपयोगी  व्यवहार  करणाऱ्या बाकी लोकांनीही अशाच  वेगळ्या कायद्याची मागणी करायची का ? कारण त्यांच्यावरही असे हल्ले झालेले आहेत.

पत्रकार खूप मोठे समाजकार्य करतो असे मानायची गरज नाही.तो लोकोपयोगी सेवा पुरवणारा एक घटक आहे.परंतु त्यांचा समाजात जो दबदबा असतो त्याचा गैरवापर करणारे हि भरपूर आहेत.खंडण्या उखळनारे ,हप्ते मागणारे काही पत्रकार नाहीत का ? २ जी स्पेक्ट्रम मध्ये सौदेबाजी करण्यात काही लोक पुढे होतेच ना ? अशा प्रकरणात पत्रकार सापडल्यावर त्यांच्यावर  कारवाई करावी म्हणून कोणती पत्रकार संघटना कधी पुढे येत का? जर पत्रकारांनी प्रामाणिकपणे अलिप्त राहून काम केले तर असे हल्ले होणार नाहीत.
 डे यांच्यावरील हल्ल्याचा तपास पोलीस त्यांच्या पद्धतीने करतीलच परंतु त्यांच्या आडून पत्रकारांनी त्यांच्यासाठी वेगळ्या कायद्याची मागणी लाऊन
धरू नये.त्यामुळे समाजात विषमता निर्माण होईल आणि मी पत्रकार म्हणजे वेगळा कोणी व सामान्य  माणूस म्हणजे दुय्यम अशी भावना वाढीस लागेल.
जय हिंद !
जय महाराष्ट्र !
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातील आहेत )

६ टिप्पण्या:

 1. खडा सवाल!
  बर्‍याच दिवसांनी पण मस्त पोस्ट.

  उत्तर द्याहटवा
 2. पोस्ट आवडली ... प्रत्येकाला सामान्य नागरिक समजल्यावर प्रत्येक जण आपोआप असामान्य होईल ...

  उत्तर द्याहटवा
 3. मुद्दे पटले. अशा भेदाने समस्या अजूनच वाढत राहतील.

  पोस्ट आवडली.

  उत्तर द्याहटवा
 4. @अभिषेक
  आपले स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

  प्रत्येकाला सामान्य नागरिक समजल्यावर प्रत्येक जण आपोआप असामान्य होईल ... +1

  उत्तर द्याहटवा
 5. @भानस
  हे खरे आहे अशाने समस्या अजून वाढतीलच कारण त्यांना 'अजामीनपात्र गुन्हा' हवा आहे :)

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  उत्तर द्याहटवा