गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

महागाईमधील स्वस्ताई

मागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यात पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते.तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु मागील १० वर्षात एक गोष्ट महाग झाली नाही याबाबत कोणीही काही बोलत नाही किंवा चर्चाहि करत नाही ती माणसाची सवयच  आहे म्हणा ;) असो तर ती गोष्ट कोणती हे तुमच्या लक्षात आले कि नाही ? तुम्ही म्हणत असाल कि मागील १० वर्षात महाग झाली नाही अशी गोष्ट असणे शक्यच  नाही परंतु तसे आहे. त्या गोष्टीवर सर्व प्रकारच्या भाववाढीचे परिणाम होतात जसे डीझेल,कागद,शाई,मनुष्यबळ या सर्वांचे परिणाम त्या गोष्टीवर होत असतात परंतु तरीही ती मागील काही वर्षात वाढली नाही परंतु काही वेळा ती स्वस्त झाली. तर ती गोष्ट म्हणजे 'वर्तमानपत्र'. यात कधी भाववाढ झालेली तुम्हाला आठवते का? उलट काही वर्षापूर्वी २ रुपयात दिले जाणारे वर्तमानपत्र आता १ रुपयात तेही भरपूर पाने आणि रंगबेरंगी पुरवण्यासहित  मिळत आहे.हे कसे शक्य होत असावे? फक्त जाहिरातींच्या जोरावर ? कि समाजसेवेच्या भावनेतून ते स्वता तोटा सहन करून हे करत आहेत? ज्या गोष्टीला तयार होण्यासाठी किमान ४-५ रुपये खर्च येत असावा परत त्यावर वाहतूक खर्च ,विक्रत्यांचे कमिशन आलेच अशी गोष्ट फक्त १ रुपयात देणारे रोज लाखो रुपये तोटा सहन करून अजून तग धरून कसे काय टिकू शकतात ?
 व्यावसायिक स्पर्धेतून हे होत आहे हे जरी मान्य केले तरी हि वर्तमानपत्र कोणत्याना कोणत्या समूहाची बांधील आहेत आणि ते समूह कोणत्यातरी राजकीय पक्षाशी बांधील आहेत हे लक्षात येईल.त्यामुळेच ते इथे तोटा सहन करून दुसरीकडे कोठेतरी याहून जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असावेत का ? स्वस्तात अंक देऊन ते सर्वसामान्य माणसाला आकर्षित करतात आणि एकदा सवय लागली कि जे त्यांना हवे आहे तेच वाचायला लावतात म्हणजेच ते आपलीच मते लोकांच्या मनावर बिंबवतात !
म.टा. पुण्यात आला त्यावेळी त्याने काय केले आठवा जरा किती रुपयात तो लोकांना दिला गेला.आता विदर्भात 'दिव्य मराठी' येत आहे १९९ रुपयात वर्षभर म्हणजे १ रुपयासुद्धा नाही दिवसाला. काही दिवसापूर्वी वृतपत्र १ रुपयाला देण्यास काही विक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यावेळी 'लोकमत' ने काय केले हेही आठवत असेलच.
जनतेपर्यंत कुठली माहिती कोणत्या स्वरुपात पोहचवायची हा निर्णय वरून घेतला जातो आणि त्याप्रमाणे गलेलठ्ठ पगार घेणारे संपादक, मिंधे झालेले पत्रकार राग आवळतात आणि सामान्य माणूस तेच सत्य आहे याच समजुतीत वाचत राहतो. यात तसा सामान्य माणसाचाही दोष आहेच स्वस्तात मिळणाऱ्या भरपूर पाने असणाऱ्या आणि रंगीत पुरवण्यांच्या मोहात अडकून आपण त्यांच्या आहारी जातो व सत्याचा पाठपुरवठा करणारी पत्रकारिता कचऱ्याच्या टोपलीत जाते.अशी किती तरी चांगली वृतपत्रे मागे पडली किंवा बंद झाली आहेत या स्पर्धेमध्ये हे तुमच्या लक्षात येईल.
 स्वस्तातील दारू,स्वस्तातील औषधे शेवटी प्राणघातक असतात. मग स्वस्तातील वर्तमानपत्र कितीही पानांचे आणि रंगीत असलेतरी ते भेसळयुक्त असणारच ना ? त्यातून खरी,प्रबोधन करणारी माहिती कशी मिळणार ? आपणच विचार करा.
(या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातून घेतले आहेत)
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

७ टिप्पण्या:

 1. छान लिहिले आहे,
  माझ्या अनुदिनीचा पत्ता: http://prashantredkarsobat.blogspot.com/

  उत्तर द्याहटवा
 2. विक्रम
  खूप दिवसांनी लिखाण आले आहे. छान.
  जरा फ्रिक्वेन्सी वाढवा.
  विषयाबद्दल. वृत्तपत्राना जाहिरातींचे उत्पन्नच इतके अमाप येते की ग्राहकाना फुकट वृत्तपत्र देणे सुद्धा त्याना शक्य आहे. वृत्तपत्रांचा कागद सरकारकडून सवलतींच्या दारात मिळतो. अधिक मिळालेला कागद लहान सहान वृत्तपत्राना बाजारभावाने किंवा ऑन घेऊन विकता येतो. त्यामुळे ग्राहकांवर (वाचकांवर ) वृत्तपत्रे केवळ खपाचे आकडे फुगवून दाखवण्या इतक्याच साठी अवलंबून असतात. जाहिरातदार किंवा राजकीय पिता याना हव्या त्याच गोष्टी मांडायला , प्रसृत करायला ते बांधील असतात. काल शिक्षण मंत्र्यांच्या पीए ला लाच घेताना अटक झाली. "आज का सवाल " मध्ये विषय आला का ?

  उत्तर द्याहटवा
 3. @काका
  जाहिरातींच्या माध्यमातून भरपूर उत्पन्न त्यांना मिळते तसेच बाकी सरकारी सवलती सुद्धा मिळत असतात हे मान्य आहे.परंतु ज्या मोठ्या प्रमाणात जाहिराती पुरवणारे समूह आहेत किंवा सरकारी सवलती मिळवून देण्यासाठी जी राजकीय मदत घेतली जाते .. त्यांचे मिंधे होत नसतील का ?
  जसे तुम्ही दर्डाचे उदाहरण दिले कालचे.
  जर कोणाच्या दबावाखाली हे काम करत नाहीत तर अशा बातम्या दाबल्या कश्या जातात ?

  उत्तर द्याहटवा
 4. सहमत.. कितीही जाहिराती असल्यातरी वृतपत्रे आता "रखेल" आहेतच राजकीय पक्षांची :(

  उत्तर द्याहटवा
 5. बर्‍याच अंशी ही पत्रे आपला अजेंडा लोकांच्या मनावर बिंबवण्यास यशस्वीपण होतात. एकच बातमी(विशेषतः राजकीय महत्त्व असलेली) वेगवेगळ्या पत्रांत वाचणे हा एक मजेशीर अनुभव असतो. पण ह्यामुळे नेमके काय खरे आहे आणि कोणता मुद्दा योग्य मानावा ह्याचा गोंधळ उडालेला असतो.

  उत्तर द्याहटवा