शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

धर्मनिरपेक्षता आणि धर्मांधता

गुरुचरण दास यांचा हा सुरेख लेख आज सकाळमध्ये वाचनात आला म्हणटले सर्व वाचकांना उपलब्ध करून द्यावा.

एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात माझा जन्म झाला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मी आधुनिक शिक्षण घेतले. हिंदूंमधील सुधारणावादी अशा आर्य समाजाशी माझ्या कुटुंबीयांचा- विशेषतः माझ्या दोन्ही आजोबांचा संबंध होता. माझ्या वडलांनी मात्र वेगळा मार्ग निवडला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांना एक गुरू भेटले. या गुरूंनी त्यांना प्रेरणा दिली आणि उपासनेचा वसा दिला. या गुरूंचे नाव होते राधास्वामी. ते रसाळ प्रवचन करायचे आणि कबीर, नानक, मीराबाई, बुलेश शहा आणि भक्ती व सूफी परंपरेतील अनेक संतांची वचने ते सांगायचे. माझी आजी दर सोमवारी आणि बुधवारी शीख समाजाच्या गुरुद्वारात जायची; मंगळवारी आणि गुरुवारी मंदिरांत जायची, तर शनिवारी-रविवारी ती मुस्लिम पीरांकडे जायची. शिवाय अधूनमधून ती आर्य समाजाच्या कार्यक्रमांना; तसेच बारशांपासून मर्तिकेपर्यंतच्या सर्व घटनांना उपस्थित राहायची. तिच्या खोलीमध्ये अनेक देवतांच्या- विशेषतः राम आणि कृष्ण यांच्या प्रतिमा असायच्या. ""जगात अनेक देवता आहेत; परंतु देव मात्र एकच आहे,'' असे ती म्हणत असे. माझे आजोबा आजीची थट्टा करायचे, तर काका म्हणायचे, की कोणता तरी देव तिचे ऐकत असेल!
अशा या सर्वसमावेशक आणि संमिश्र वातावरणात मी वाढलो. त्यामुळे एक प्रकारचा उदार दृष्टिकोन विकसित झाला. मात्र आता स्वतःला एक उदारमतवादी हिंदू असे म्हणवून घेताना मला काहीसे अस्वस्थ वाटते. असे का व्हावे? मला वाटते, की हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्षतावादी (सेक्‍युलरिस्ट) या दोघांच्या मध्ये माझी कुचंबणा होत आहे. काहीतरी नक्कीच चुकत आहे. हिंदू राष्ट्रवादी हिंदुत्वाला राजकीय चौकट देत आहेत, तर धर्मनिरपेक्षतावादी कोणत्याही श्रद्धेकडे तुच्छतेने पाहत आहेत. माझ्या हिंदू पार्श्‍वभूमीला मी बिलगून असणे धर्मनिरपेक्षतावाद्यांना म्हणूनच अयोग्य वाटते. दुसरीकडे या देशातला मोठा तरुणवर्ग आपल्या प्राचीन वारशाबद्दल एक तर अनभिज्ञ आहे किंवा त्याबद्दल तो काही बोलू इच्छित नाही.
थट्टेचा विषय?
काही वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीला म्हटले, की मला महाभारत पूर्णपणे वाचायचे आहे; समजून घ्यायचे आहे. पाश्‍चिमात्य पुराणकथा मी वाचल्या आहेत; परंतु भारतीय पुराणकथा वाचले नसल्याचे मी तिला सांगितले. तिने माझ्याकडे संशयाने पाहिले. आयुष्याच्या मधल्या टप्प्यावरच्या कोड्यात मी अडकलो असेन, असे तिला वाटले. मग ती माझी थट्टा करू लागली. नंतर बराच काळ विविध समारंभांत, पार्ट्यांत माझ्याबद्दल बोलताना थट्टेचा सूर निघू लागला. लोक म्हणायचे, ""मग काय, तुम्हाला म्हणे पुराणकथा वाचायच्या आहेत?'' बाजारात नवीन पुस्तके नाहीत काय, असा प्रश्‍नही काहींनी विचारला. एका माजी सनदी अधिकाऱ्याने मला विचारले, ""तुम्ही या पुराणकथा वाचून काय करणार आहात?'' त्यानंतर माझ्या उत्तराकडे फारसे लक्ष न देता ते त्यांच्या नव्या मोबाईल फोनमधील फीचर्स पाहत राहिले. तरीही मी म्हणालो, की मी महाभारताचा अभ्यास करतो आहे. त्यावर ते म्हणाले, ""व्वा! पण तुम्हाला हिंदुत्वाची तर बाधा झालेली नाही ना?''
त्यांची ही प्रतिक्रिया कदाचित सहज असेल; त्यांच्या मनात काहीही नसेल. मात्र त्यामुळे मी निराश झालो; अस्वस्थ झालो. पुराणकथा वाचणे, धार्मिक ग्रंथ वाचणे ही कट्टरतेची कृती आहे, असे तर काही "धर्मनिरपेक्षतावाद्यांना' वाटत नाही ना, असा प्रश्‍न मला पडला. तसे असेल तर धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या असहिष्णुतेची मला भीती वाटू लागली. या प्रतिक्रियेने मला चेन्नईतील मला माहीत असलेल्या एका महिलेची गोष्ट आठवली. या महिलांची वेशभूषा पाश्‍चिमात्य आहे. घराजवळच्या शंकराच्या मंदिरात त्या अधूनमधून जात. मात्र त्यांच्या काही धर्मनिरपेक्षतावादी मित्रांनी त्यांच्या या "धार्मिक' वृत्तीची थट्टा सुरू केली. शेवटी आपल्यावर हिंदुत्वाचा शिक्का बसेल की काय, या भीतीने या महिलेने मंदिरात जाण्याचेच बंद केले होते.
हे खरे आहे, की आज धार्मिक मूलतत्त्ववाद जगभर वाढतो आहे. मात्र त्यामुळे धार्मिक आणि धर्मांध यांच्यात फरक करणेच बंद झाले आहे. एखादी व्यक्ती धार्मिक असू शकते. आपल्या श्रद्धा ती जोपासत असते. मात्र अशी व्यक्तीही धार्मिक मूलतत्त्ववादीच आहे, अशी समजूत धर्मनिरपेक्षतावादी करून घेत आहेत. त्यामुळे असे होत आहे, की उदारमतवादी हिंदूही आपला धार्मिकपणा लपवू पाहत आहेत. आपल्या धार्मिकतेचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तर लावला जाणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटते आहे. अन्य देशांतील उदारमतवादी ख्रिश्‍चन आणि उदारमतवादी मुस्लिम यांनाही अशाच प्रकारची भीती वाटते आहे.
भारतात असे का होत असावे? याची काही कारणे संभवतात. एक म्हणजे एके काळी धर्मनिरपेक्षतावादाची बाजू मांडणारी, तो उचलून धरणारी बहुतेक मंडळी मार्क्‍सवादी होती. या मंडळींचा देवावर विश्‍वास नसतो; किंबहुना ते देवाचा द्वेष करतात. त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद धर्माच्या दुसऱ्या बाजूकडेच- म्हणजे अंधश्रद्धा, कट्टरता, धर्मांधता याकडेच पाहत असतो. परंतु धर्माची दुसरी बाजूही आहे. धर्माच्या आधारेच अनेक जण जीवन व्यतीत करीत असतात, दैनंदिन प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात. धर्म हा त्यांच्यासाठी आश्रयस्थान असतो. याकडे दुर्लक्ष करीत धर्मनिरपेक्षतावादी आपले मुद्दे मांडत असतात. मात्र त्यांची भाषा ही येथील सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडची असते. त्यामुळे धर्मांधतेला रोखण्याची त्यांची धडपडही अपुरी पडते. धार्मिक विद्वेषातून होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध करणे, एवढेच त्यांच्या हातात राहते. असा हिंसाचार त्यांना रोखता येत नाही. महात्मा गांधींनी मात्र तो रोखून दाखवला होता. स्वातंत्र्याच्या सुमारास बंगालमध्ये गांधीजींनी ही किमया करून दाखविली.
दुसरे कारण अज्ञानाचे आहे. आपल्याकडील मुले प्राचीन वाङ्‌मय, पुराणकथा यांचे वाचन फारसे करीत नाहीत. पाश्‍चिमात्य देशांतील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत प्राचीन वाङ्‌मयाचा, साहित्याचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, त्याकडे समीक्षात्मक दृष्टिकोनातून पाहतात. आपल्याकडे हे व्यापक प्रमाणावर होत नाही. मुलांना पुराणकथा कळतात त्या आजीने सांगितलेल्या गोष्टींमधून, "अमर चित्रकथा'सारख्या पुस्तकांतून किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून. इटालियन विद्यार्थी दान्तेच्या "डिव्हाईन कॉमेडी'चा अभ्यास करतात, इंग्लिश विद्यार्थी मिल्टन वाचतात आणि ग्रीक मुले इलियाडचा अभ्यासतात. असे असताना "महाभारता'च्या अभ्यासाबाबत "धर्मनिरपेक्षता'वादी द्विधा मनःस्थितीत का असतात? एक खरे आहे, की महाभारतात अनेक देवता आहेत आणि कृष्णासारखी व्यक्तिरेखा आहे- जी एकाच वेळी तत्त्वज्ञान सांगते, चतुराई करते, शिष्टाई करते आणि कारस्थानेही करते. दान्ते, मिल्टन आणि होमर यांच्या वाङ्‌मयातही देव-देवता आहेतच ना?
खऱ्या धर्मनिरपेक्षतेसाठी..
शाळांत महाभारत शिकविण्याबाबत मला पडलेला हा पेच कदाचित गांधीजी समजू शकले असते. या महाग्रंथाच्या भारतीयांच्या जीवनात असलेल्या स्थानाची कल्पना त्यांना होती. महाभारताचे एक भाष्यकार व्ही. एस. सुखटणकर यांनी म्हटले आहे, ""महाभारत हा आपल्या सामूहिक अंतर्मनाचा आशय आहे.. त्यामुळे आपण त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार करायला हवा आणि समतोलपणे तो समजून घ्यायला हवा. मग लक्षात येईल, की महाभारत हा वर्तमानकाळापर्यंत लांबलेला भूतकाळ आहे. तो वर्तमानकाळ म्हणजे आपण स्वतःच.'' गेली सहा वर्षे मी महाभारत वाचतोय आणि त्यातून मला आनंद मिळतोय. रोज तो मला नव्याने भेटतोय. आपल्या संस्कृतीची खोलवर गेलेली ही मुळे आपल्या नव्या पिढीला कळली पाहिजेत. ती जर त्यांनी माहीत करून घेतली नाही, तर या मुळांविनाच वाढतील- आणि मग त्यांना या संस्कृतिवृक्षाची फळेही चाखता येणार नाहीत.
भारतात धर्मनिरपेक्षतावादाची बीजे रोवण्याचे प्रयत्न आपण करतो आहोत. पण या प्रयत्नांत धर्मांधता आणि धर्मनिरपेक्षता यांच्यात देशाचे विभाजन करून चालणार नाही. तसे करणे खूप सोपे ठरेल. सर्वसामान्य भारतीय हे सभ्य आणि मर्यादाशील आहेत. सर्व धर्मांच्या, श्रद्धांच्या आणि नास्तिकतेच्याही प्रती सहिष्णुता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांच्या धार्मिकतेचा लाभ घेत हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे रूपांतर आपल्या मतपेढीत करू नये. धर्मनिरपेक्षतावाद्यांनीही धार्मिकतेचा आदर करायला हवा, तेव्हाच धर्मनिरपेक्ष समाजाची स्थापना होईल.
-गुरुचरण दास

७ टिप्पण्या:

 1. tuza blog pahila..changle vishay nivadtoyas re...chhan lihito aahes..

  -vishal dixit

  उत्तर द्याहटवा
 2. Gurucharan Das ha kahi maza farasa aavdata stambh lekhak nahi. to agadi HLL kinwa Uniliver cha director hota tevha pasun me tyache lekh vachale ahet. Aata Das la e Psuedo-secular lokanche anubhav yetahet tashech tyachyamule baaki lokana ale ahet he Das visartoy.


  baaki hyaveli tyacha mudda barobar ahe.

  उत्तर द्याहटवा
 3. googd rational views expressed
  views of savarakar http://harshadsamant.wordpress.com/2011/02/25/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7/

  उत्तर द्याहटवा