माहुलीला सुळक्यांचा गड असेच म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार झालेला एक दुर्गही म्हणता येईल. माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक करणारी वाट आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश करता येतो.
माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड असे उपदुर्ग आहेत.नवरा-नवरी भटोबा शंकर,ब्रह्मा,वजीर,चंदेरी, असे अनेक सुळके म्हणजेच लिंग्या आहेत.या दुर्गावरून शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार चालवला.१६५७ मध्ये शिवाजीमहाराजांनी कोकणातले बरेच दुर्ग जिंकून घेतले.त्यात महुलीही जिंकला.पुरंदरच्या तहात तो मुघलांना द्यावा लागला.
सध्या गडावर जुने अवशेष शिल्लक आहेत.दुर्गाची वाताहत किती आणि कशी होते,त्याचे इतर दुर्गांसारखे महुलीही एक उदाहरण आहे.इ.सन.१६७० मध्ये ऐन पावसाळ्यात या दुर्गावर हल्ला चढवून तो दुर्ग जिंकला.राजांच्या या विजयाने अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.इंग्रजांनी त्याची नोंदही केली आहे.
एका मुघलाने महुलीविषयी लिहिले आहे, "पावसाळ्यात जवळचे काही दिसत नाही.अंधारया रात्री तर हाताला हाताची ओळख पटत नाही ... ही तळकोकणची राजधानीच आहे.किल्ला अतिशय मजबूत आहे..."
गडावर अजूनही रान आणि उंच गावात आहे.रात्री मुक्काम केला,तर जंगली प्राणी दिसतात.पूर्वी तळातील जंगलात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असल्याची नोंद आहे.भव्यता,रौद्रता.जंगल,अफाट पाऊस अशा नैसर्गिक अनेक कारणांनी माहुली अवघड झाला आहे.त्याचे सुळके हे त्या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे आणि त्या सुळक्यांच्या अवघड चढणीचे आवाहन महाराष्ट्रातील युवकांनी पेललेले आहे.
अगदी यशस्वीपणे.वजीर,विष्णू,नवर्याची करवली,भटोबा,असे अतिअवघड सुळके इथले युवक लीलया चढून गेले आहेत.तीन दुर्गांचा मिळून झालेला माहुली त्याच्या बळकटीपणाची साक्ष देत उभा आहे.